इक्वेडोर

इक्वेडोरचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República del Ecuador; अर्थ: विषुववृत्तावरील प्रजासत्ताक) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्य भागातील एक देश आहे. इक्वेडोरच्या उत्तरेला कोलंबिया, पूर्व व दक्षिणेला पेरू तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहेत. प्रशांत महासागरामधील गालापागोस द्वीपसमूह इक्वेडोरच्याच अधिपत्याखाली आहे. ब्राझिल देशासोबत सीमा नसणारा इक्वेडोर हा चिली व्यतिरिक्त दक्षिण अमेरिकेतील एकमेव देश आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले क्वितो हे इक्वेडोरचे राजधानीचे तर ग्वायाकिल हे सर्वात मोठे शहर आहे.

लॅटिन अमेरिकेमधील अनेक देशांप्रमाणे स्पेनची वसाहत असलेल्या इक्वेडोरला १८२२ साली स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर अल्प काळाकरिता ग्रान कोलंबियाचा भाग असलेला इक्वेडोर १८३० साली पूर्णपणे स्वतंत्र देश बनला.

स्पॅनिश लोक दाखल होण्याआधी येथे स्थानिक अमेरिकन व इंका जमातीचे लोक वास्तव्यास होते. १५व्या शतकाच्या उत्तरार्धामधील अंतर्गत कलहामुळे इंका साम्राज्य डळमळीत झाले होते. इ.स. १५३१ साली फ्रांसिस्को पिझारो ह्या भागात पोचला व स्पेनने हळूहळू आपले अस्तित्व वाढवण्यास सुरूवात केली. लवकरच इक्वेडोर प्रदेश पेरूची व्हॉईसरॉयशाही ह्या वसाहतीमध्ये विलिन करण्यात आला व १५६३ साली क्वितोला प्रशासकीय जिल्हा बनवण्यात आले.

सुमारे ३ शतके स्पेनच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर १८२० साली ग्वायाकिल हे स्वातंत्र्य मिळवणारे इक्वेडोरमधील पहिले शहर होते. त्यानंतर २४ मे १८२२ रोजी आंतोनियो होजे दे सुक्रच्या सैन्याने येथील स्पॅनिश राजवटीचा पराभव केला व इक्वेडोरला स्वातंत्र्य लाभले. स्वातंत्र्यानंतर लगेचच इक्वेडोर सिमोन बॉलिव्हारने स्थापन केलेल्या ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक ह्या राष्ट्रात सामील झाला. १८३१ साली ग्रान कोलंबिया कोलमडुन पडला व त्यामधून व्हेनेझुएला, इक्वेडोर व नवीन ग्रानादा हे तीन स्वतंत्र देश निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे इक्वेडोर व पेरूदरम्यान भूभागांबद्दल वाद सुरू होते. १९७२ ते १९७९ दरम्यान इक्वेडोरमध्ये लष्करी राजवट होती. १९७९ सालापासून मात्र येथे लोकशाही असून रफायेल कोरेया हा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे.

२,८३,५६० चौरस किमी इतके क्षेत्रफळ असणारा इक्वेडोर हा दक्षिण अमेरिकेमधील लहान देशांपैकी एक आहे. पश्चिमेस इक्वेडोरला २,३३७ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून पूर्वेकडील भाग घनदाट ॲमेझॉन जंगलाने व्यापला आहे. आन्देस पर्वतरांग इक्वेडोरच्या मध्यभागामधून उत्तर-दक्षिण धावते.

ऑण्ड्रिज पर्वताच्या दोन रांगा या देशातून उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे जातात. यामुळे हा देश समुद्रकिनाऱ्याकडील भाग, पर्वतीय भाग आणि पूर्व भाग अशा तीन क्षेत्रात विभागला गेला आहे.

इन्का लोकांनी १४५० मध्ये इक्वाडोरवर विजय मिळविला. त्यानंतर स्पेनचे काही काळ येथे राज्य होते. १७४० मध्ये इक्वाडोरवर पेरुच्या व्हॉईसरॉयचे अधिकार होते. १८३० मध्ये इक्वाडोर राजसत्ताक राज्य बनले. १९४१ मध्ये इक्वाडोर आणि पेरुमध्ये सीमेवरुन युध्द झाले. सत्तरच्या दशकात पेट्रोलियममधील नफ्यामुळे आर्थिक प्रगती झाली. १९७९ मध्ये नवीन संविधान लागू करण्यात आले. ९०च्या दशकात इक्वाडोरमध्ये अनेक सत्ताबदल झाले.

राजधानी : क्वितो
सर्वात मोठे शहर : ग्वायाकिल
अधिकृत भाषा : स्पॅनिश, किशुआ
स्वातंत्र्य दिवस : (स्पेनपासून) मे २४, १८२२ (ग्रान कोलंबियापासून) मे १३, १८३०)
राष्ट्रीय चलन : अमेरिकन डॉलर (USD)

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*