भंडारा जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

भंडारा जिल्ह्यात गाडेगाव व तुमसर येथे औद्योगिक वसाहती असून जवाहरनगर येथे युद्धसाहित्य निर्मितीचा कारखाना आहे. भंडारा जिल्ह्यातील अतिशय जुने उद्योग म्हणजे तेंदूच्या पानांपासून विड्या बनविणे ,धातुंची व तांब्या-पितळ्याची उपयुक्त भांडी बनवणे व त्या भांड्यांवरील कलाकुसरही वाखाणण्याजोगी असते. जिल्ह्यातील नद्या व तळ्यांमधील मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. जंगलांमुळे लाकूड कटाई, बांबूपासून टोपल्या व चटई तयार करणे असे उद्योग ही चालतात.
कोसा या प्रकारचे रेशीम तयार करून कापड तयार करण्याचा व्यवसाय प्रसिध्द आहे. कौले व विटा तयार करणे, हातमागावर कापड विणणे असेही व्यवसायचालतात. भात गिरण्या किंवा धान गिरण्या जिल्ह्यात सर्वत्र विखुरलेल्या आहेत. जिल्ह्यात मोहाडी तालुक्यात देव्हाडा येथे वैनगंगा सहकारी साखर कारखाना आहे, तर तुमसर रोड येथे कागद निर्मिती कारखाना आहे. मँगनीज शुध्दीकरण, पोलाद उद्योग असे महत्त्वाचे उद्योगही जिल्ह्यात चालतात. गेल्या दशकात पोलाद उद्योगासाठी,अनेक मोठ्या कंपन्या जिल्ह्यात स्थापन झाल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*