ताम्हणे, गणेश बाळकृष्ण

ठाणे शहरातील विख्यात लेखक व कवी अशी ख्याती असलेल्या गणेश ताम्हणे यांचा अलिबाग सारख्या निसर्गरम्य गावी जन्मल्यामुळे निसर्गाबद्दल विशेषतः कोकणातील फुललेल्या निसर्गाबद्दल त्यांना वाटणारी अभिरूची त्यांच्या लेखनातून वाचकांच्या मनात उत्तमरित्या उमटलेली आहे. त्यांनी आजवर नियतकालिकांमधून व मासिकांमधून विपूल प्रमाणात लेखन केले असून “सुमन”, “भारत सेवक” अशा प्रथितयश मासिकांचे सहसंपादकपद, तसेच “बालविश्व” या लहान मुलांच्या नाजुक भावविश्वावरती अलगद प्रकाश टाकणार्‍या मासिकाचे संपादकपद त्यांनी भुषविलेले आहे. “भग्न बासरी”, “रेंगाळणारे सुगंध”,“कोकणाची पाऊलवाट” अश्या निरनिराळ्या विषयांवरती अत्यंत रोचक व लक्षवेधी शैलीने लिखाण केल्यामुळे ते रसिकांच्या साहित्य आठवणींमध्ये ते कायमचे कोंदले गेलेले आहेत. कोकणाची “पाऊलवाट” हे त्यांचे थेट कोकणातल्या दाट वनराईमध्ये वाचकांना घेवून जाणारे व साधेपणाच्या एका वेगळ्याच विश्वाची सफर करून आणणारे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक, विशेष गाजले होते. कोकण संस्कृतीमध्ये, पुस्तक वाचून झाल्यानंतरही सर्वांना आणखी काही क्षण रेंगाळायला लावणार्‍या या पुस्तकामध्ये आपल्याला त्यांचे बालपण, ए.सी.सी. कंपनीमध्ये नोकरी करत असताना त्यांना आलेले अनुभव, भारताचा स्वातंत्र्यलढा, जीवनविषयक त्यांचा ऐकुण दृष्टीकोन, १९२२ पासूनचे ठाणे, आदींचा तपशील संदर्भवार स्पष्ट होतो. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हणे यांनी देखील आपल्या वडिलांकडून म्हणजेच गणेश ताम्हणें कडून देशासाठीच्या योगदाना बद्दलचे मोलाचे धडे घेतले असल्यामुळे ते देखील सामाजिक कार्यात यशस्वी होऊ शकले . ठाण्यातील मराठी साहित्यपरंपरेचे नियोजनबध्द संवर्धन करण्याच्या हेतूने स्थापन झालेले शारदा मंडळ, मराठी ग्रंथसंग्रहालय, कथामाला मध्यवर्ती मंडळ आणि राष्ट्र सेवा दल अशा संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून त्यांनी बहुमूल्य योगदान दिले होते. ठाणे पालिकेचे दोन वेळा निर्वाचित सदस्य म्हणून ते निवडून आल्यामुळे त्यांच्या व्यक्तित्वाला राजकीय किनारदेखील लाभलेली होती. पण मूळचा पिंड साहित्यिकाचा असल्यामुळे राजकारणात ते विशेष रमू शकले नाहीत.

दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*