आजचा विषय दोडका

कीस बाई कीस, दोडका कीस..
दोडक्याची फोड लागते गोड..
आणिक तोड बाई आणिक तोड……

हे गाणे म्हणत आपण शाळेत एक खेळ खेळत असु. या गाण्यात म्हणल्याप्रमाणे दोडका कधी ‘गोड’ लागला नाही.
दोडका, शिराळे, कोशातकी या विविध नावांनी ओळखला जातो. ही भाजी अनेकांना आवडत नाही म्हणूनच याला दोडका हे नाव पडलं असावं. पचायला अतिशय हलकी असलेली ही भाजी पथ्याची समजली जाते, कारण त्यात फॅट खूपच कमी असते आणि कॅलरीज जवळजवळ नसतातच. दोडका ही भाजी हिरवी गार असून त्यावर रेषा असतात. हिची साल जाड असून आतील गर हा पांढऱ्या रंगाचा असतो. तसंच त्यात बिया असतात. भाजीची निवडताना तिचा हिरवा रंग आणि न वाकणारा निवडावा. तसंच त्यावर कोणत्याही प्रकारचे डाग नसावेत. पूर्णत: गडद असावा. ही भाजी प्रामुख्याने आंध्र प्रदेशात लोकप्रिय असली तरी महाराष्ट्रातही ती भाजीच्या स्वरूपात खाल्ली जाते. यात ‘क’ जीवनसत्त्व, झिंक, लोह, मॅग्नेशिअम आणि मॅगनीज असल्याने हिच्यात भरपूर गुणधर्म आहेत. फार पूर्वी पासून रानावनात वेलीवर मिळणाऱ्या दोडक्यांचा आयुर्वेदात मोठा वापर, उलटी व जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे. या दोडक्यांची चव कडू असते. बियांचा औषधी उपयोग आहे. दमा, खोकला, कप, अम्लपित्त, पोटदुखी, पोटफुगी या विकारात या बियांचे चूर्ण किंवा काढा उपयुक्त आहे. त्यामुळे प्रथम उलटी होते किंवा नंतर जुलाबाद्वारे कफ बाहेर पडतो.

दोडक्याची सालं म्हणजे शिरा फेकू नयेत. कोवळ्या असतील तर बारीक चिरून, शिजवून भाजी करावी किंवा परतून चटणी करावी. नाहीतर एका दोडक्याची सालं आणि एक टोमॅटो उकडून मिक्सरमधून काढून गाळावं आणि त्याचं सार किंवा सूप करावं.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काही पदार्थ दोडक्याचे
भरला दोडका
साहित्य :- पाव किलो कोवळे दोडके, पाव वाटी दाण्याचे कूट, दोन-तीन चमचे भाजलेल्या तिळाची पूड, वाटीभर बारीक चिरलेला टोमॅटो, चवीप्रमाणे गूळ, मीठ, चमचाभर कांदा-लसूण मसाला, दोन चमचे गोडा मसाला, दोन चमचे धने-जिरे पूड, तेल चार चमचे, ओले खोबरे अर्धी वाटी, कोथिंबीर.
कृती :- दोडक्या च्या शिरा काढून दीड ते दोन इंचाचे तुकडे करावेत व भरल्या वांग्याप्रमाणे चिरा द्याव्यात. टोमॅटो व मसाले, तिळाचे व दाण्याचे कूट, धने-जिरे पूड, मीठ, चिरलेला गूळ, थोडे ओले खोबरे, कोथिंबीर एकत्र करावे. त्यात दोन चमचे तेल घालून कालवावे. हा मसाला दोडक्याेत भरावा. कढईत तेल मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी.
भरलेले दोडके व उरलेला मसाला घालून हलवावे. रसाच्या आवश्य कतेप्रमाणे पाणी घालून मंद गॅसवर झाकण ठेवून भाजी शिजवावी. खोबरे-कोथिंबिरीने सजवावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

दोडक्याची चटणी
साहित्य:- १ मध्यम आकाराचा दोडका, १-२ लसुण पाकळ्या, १-२ टेबल्स्पून खिसलेले कोरडे खोबरे मुठभर शेंगदाणे, ३-४ हिरव्या मिरच्या, १ कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, एक चमचा तेल.
कॄती – दोडका स्वच्छ धुवून १/२ सेंटीमीटर जाडीच्या चकत्या करुन घ्याव्यात. शेंगदाणे आणि खोबरे वेगवेगळे कोरडे भाजुन घ्यावेत. कढईत तेल तापवून त्यात मिरच्या आणि लसुण घालावा. किंचीत परतून त्यावर दोडक्याच्या फोडी घालाव्यात. नीट खरपूस भाजुन घ्यावे. दोडक्याच्या फोडी थोड्या गुलबट दिसु लागतील. त्यात खोबरे, दाणे, कोथिंबीर, मीठ घालुन मिक्सरमधुन थोडे जाडसर वाटुन घ्यावे.
टीप – एखादा दोडका थोडा जून निघतो अशावेळी त्याची साल थोडी तासुन टाकून उरलेल्या दोडक्याची चटणी करता येते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

दोडके भात
साहित्य:- ३ वाटय़ा दोडक्याचा कीस, १ वाटी तांदूळ, २ वाटय़ा पाणी, चवीला मीठ, १ चमचा गोडा मसाला, फोडणीसाठी १ मोठा चमचा तेल, मोहरी, िहग, हळद, सात-आठ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं, कोिथबीर.
कृती: तांदूळ धुऊन ठेवावेत, तेलाची फोडणी करून त्यात लसूण मिरच्यांचे तुकडे परतावे, तांदूळ आणि दोडक्याचा कीस परतावा, मीठ, मसाला, गरम पाणी घालून भात शिजू द्यावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

दोडक्याचे सूप
साहित्य : कोवळे दोडके तीन ते चार २५० ग्रॅम , जीरा पावडर १/२ चमचे , काळी मिरी पावडर १/२ चमचे , मीठ १/२ चमचे, आले : छोटा तुकडा , लोणी चार चमचे.
तूप दोन चमचे, १/२ चमचे जिरे.
कृती : दोडका चिरून घ्यावा. कुकर मध्ये चिरलेला दोडका आणि आले, दोन वाट्या पाणी घालून ३ ते ४ मिनिटे शिजवून घ्या. थंड झाल्यावर कुकर मधून दोडका तुकडे काढून मिक्सर मधून मध्ये थोड थंड पाणी घालून वाटून घ्या व मिश्रण एक चाळणी मधून एका भांडया मध्ये गाळून घ्या. कुकर मध्ये उरलेलं पाणी ही त्यात मिसळा. जीरा पावडर , काळी मिरी पावडर व मीठ घालुन त्याला एक उकळी येऊ ध्या. आपले सूप तयार. कपात एक चमचा लोणी घालून सूप सर्व करा.
टीप : लोणी नसल्यास, तूप व जिर्याची फोडणी ही दिली तरी चालते. स्वादात काहीही फरक पडणार नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*