चव्हाण, शंकरराव

Chavan, Shankarrao

 

महाराष्ट्र राज्याचे चौथे मुख्यमंत्री.
शेतकरी कुटूंबात पैठण येथे जन्म. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापिठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. 1945 मध्ये त्यांनी वकिलाची सनद मिळवली. पण रामानंदतिर्थ यांच्या सल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद होते. 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तुत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.

 

1948-49 मध्ये नांदेड जिल्हा कॉंग्रेसचे ते सरचिटणीस झाले. 1952 च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे नगराध्यक्ष (1956), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बॅंकेचे संचालक इ. विविध पदे त्यानी भूषविली. 1956 मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे 1960 मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर 1972 पासून फेब्रूवारी 1975 पर्यंत ते कृषिमंत्री होते. 21 फेब्रूवारी 1975 रोजी ते महराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
पाटबंधारे मंत्री महणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांव्दारा मराठवाडयाचा विकास घडवून आणला. जायकवाडी धरण हा शंकररावजींच्याच प्रयत्नाचे मोठे फळ आहे.

 

कोणताही राजकीय प्रश्न ते समझोत्याने सोडवित. राज्य सरकारी कर्मचाऱयांचा मे 1975 मधील संप ज्या पध्दतीने त्यांनी हाताळला, त्यावरून हे सिध्द होते. ते रामानंदतीर्थ व गोविंद श्रॉफ यांना राजकीय गुरू मानत. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुणविशेष. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्यांचे सुपुत्र.चारित्र्यसंपन्न आणि शिस्तशीर मुख्यमंत्री म्हणून शंकरराव चव्हाण यांची ओळख आहे. एक गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शंकररावांनी अदम्य इच्छाशक्ती आणि खडतर परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्मण केले. कायद्याचे पदवीधर असलेल्या शंकरराव चव्हाण यांनी प्रारंभी जुलमी निजामी राजवटी विरुद्धच्या संघर्षात सक्रिय सहभाग घेतला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सहवासात त्यांच्या राष्ट्रीय विचारांना गती मिळाली. राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. जायकवाडी हा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प. शंकररावांच्या विकासविषयक दृष्टीकोनाचे मानचिन्ह. विष्णुपुरी हा आशिया खंडातील सर्वात उपसा जलसिंचन प्रकल्प. हा प्रकल्प उभारुन शंकररावांनी आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले. याशिवाय उजनी, इसापूर, पैनगंगा, अप्पर मांजरा अशी प्रकल्पांची मालिकाच निर्माण करण्यात आली. पाण्याचे शास्त्रशुद्ध नियोजन करण्याकरीता सिंचन आयोग स्थपण्यात आला. बागायती पिकांना पाटाचे पाणी फक्त आठ महिने देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील ओलिताखालील जमिनीचे क्षेत्र वाढले. याशिवाय कापूस एकाधिकार योजना, घरकूल योजना, उर्दू अकादमीची स्थापना, गृहनिर्माण मंडळ, आदिवासी आश्रमशाळा, रेल्वे रुंदीकरण यांसारखे कार्यक्रम राबविण्यात आले. शंकरराव यांची दूरदृष्टी, अभ्यासूपणा व ग्रामीण भागाविषयी निष्ठा असलेला नेता अशी ओळख आहे. नैतिक मूल्ये हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. म्हणूनच त्यांच्या कार्याला नैतिकतेचे अधिष्ठान लाभले होते.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*