नाचणे, कुमुद

Nachane, Kumud

कुमुद ही ठाण्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर कै.बाळासाहेब गुप्ते ह्यांची कन्या.

१९४२ चा तो काळ हिंदुस्थान स्वतंत्र व्हावा म्हणून सर्वजण एकाच ध्येयाने पेटलेले. ब्रिटीशांच्या विरुद्ध कसा लढा देता येईल ह्या प्रेरणेने आपले पुढारी प्रयत्न करीत होते. ब्रिटीशांच्या विरुद्ध बुलेटीन्स काढण्यात येत होती. सरकारी नोकरांच्या हाती पडू नयेत म्हणून ती लपून छपून वाटण्यात येत होती. ही कामगिरी शाळा सांभाळून विद्यार्थी वर्ग करीत असे. कुमुदच्या घरात ह्या कामाला विरोध नव्हता पण अभ्यासही झालाच पाहिजे असेही नव्हते.

दिवसेंदिवस स्वातंत्र्य चळळीत सर्वच हिरीरीने भाग घेऊ लागले. हातात तिरंगा घेऊन प्रभात फेर्‍या सुरु झाल्या. पोलीसांचा लाठीमार खावून पुन: दुसर्‍या दिवशी प्रभात फेरी काढण्यास सज्ज ! ह्यात कुमुदचा मोठा सहभाग असे.

कुमुद व तिच्या काही मैत्रिणींनी १५ ऑगस्टला कलेक्टर ऑफिसवर तिरंगी झेंडा लावायचा असे ठरविले. पोलीसांचा लाठीमार खात काही जणी तिरंगा घेऊन कलेक्टर ऑफीस पर्यंत पोहोचल्या. कुमुद गुप्ते, नलिनी प्रधान, सुमन नाडकर्णी व भानु नाडकर्णी ह्यांचा पुढाकार होता. पोलिसांच्या लाठीमाराने बाकीच्यांची पांगापांग झाली व ह्या चौघींना पकडून तुरुंगात टाकले. काही महिन्यांनी ह्यांची मुक्तता झाली. नंतरही काही मुलींना तुरुंगात टाकले.

कै. यशोदाबाई कोतवाल, सुशिला बाई नाडकर्णी, यांनी चौका चौकातून विदेशी मालाची होळी करण्यास सुरुवात केली. ह्यातही कुमूदचा भाग असे. घरोघरी फिरुन परदेशी माल गोळा करुन होळीत टाकण्यात येत असे.

कुमुद बरोबर आणखी काही मुली होत्या. त्यातली एक मुलगी दिसायला सुंदर होती. ह्या मुलींच्या वर देखरेख करण्यासाठी एक मराठी पोलीस इन्स्पेक्टर होते. इंग्रज पोलीस ऑफिसरला ही मुलगी दिसली त्याने इन्स्पेक्टरना “आज या मुलीला रात्री बंगल्यावर आणा”, असे फर्मान सोडले. ही बातमी सगळ्या मुलींना कळली. त्यांच्यात रडारड सुरु झाली. जर कोणी हिला न्यायला आले तर त्यांच्याशी कसा मुकाबला करावयाचा हे सर्वजणी ठरवू लागल्या. तेवढ्यात ते इन्स्पेक्टर आले. त्या मुलींना वाटलं की तीला न्यायलाच आले. पण त्यांनी मुलींना धीर दिला, “नोकरी गेली तरी बेहत्तर पण मी ह्या मुलीला बंगल्यावर नेणार नाही. आम्हालाही आमच्या आया बहिणींचे प्रेम आहे नं. “सगळ्या मुलींना धीर आला तरी रात्री कोणीही झोपल्या नाहीत. असा तिने एक अविस्मरणीय प्रसंग सांगितला.

कै. कुमुदने समाजवादी महिला सभेचे काम पुष्कळ वर्षे केले. १८ फेब्रुवारी २००० मध्ये किडणीच्या विकाराने त्यांचा अंत झाला.

(संदर्भ : सी.के.पी. समाजाचा इतिहास)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*