दरेकर, गोविंद त्र्यंबक (कवी गोविंद)

Darekar, Govind Trambak (Kavi Govind)

अभिनव भारत या क्रांतिकारक संस्थेच्या कार्यात सावरकरांना जे सहकारी मिळाले त्यात आणि पुढील काळात सावरकरांनी ज्यांना ‘स्वातंत्र्यशाहीर’ या बिरूदाने गौरविले ते म्हणजे कवी गोविद त्र्यंबक दरेकर. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाचे स्वातंत्र्य हा विषय केंद्रीभूत मानून काव्य करणे, स्वातंत्र्य प्रेमाची सुक्ते आणि वीरतेची सुभाषिते गाणारे कवी गोविद यांचा उल्लेख स्वातंत्र्य शहरी म्हणून यथार्थ वाटतो. कवी गोविद यांचा जन्म. ९ फेब्रुवारी १८७४ सालचा. ते मूळचे नगर जिल्ह्यातील कण्हेर पोखरी या खेडेगावातील रहिवाशी. त्यांचे वडील नाशिकमध्ये गवंड्याचे काम करीत असत. वयाच्या पाचव्या वर्षी कवी गोविदांचे पितृछत्र हरपले आणि आठव्या-नवव्या वर्षी मोठे दुखणे झाले. त्यातून ते वाचले पण या दुखण्यामुळे त्यांचे हात व कमरेपासून पाय लुळे पडले. अशा पंगू अवस्थेत त्यांच्या मातोश्री आनंदीबाई यांनी त्यांचा सांभाळ केला. पंगूपणामुळे शिक्षण पूर्ण झाले नाही. पुढे ते नाशिक येथे तीळभांडेश्वर गल्लीत रहायला आले आणि तेथेच त्यांना सावरकर बंधूंचा सहवास लाभला. सावरकरांच्या सहवासात आल्यावर त्यांचे पूर्वीचे आयुष्यच बदलून गेले. त्यातून स्फूर्ती घेऊन ते काव्य करू लागले. ‘बाजीप्रभूचा पोवाडा’, ‘अफजलखानाचा पोवाडा’, ‘शिवाजी व मावळे यांचा संवाद’ यासारखी त्यांची कवने गाजू लागली. कवी गोविदांनी वेळोवेळी रचलेली पद्ये ‘लघुअभिनव मालेची पुष्पे’ म्हणून प्रसिद्ध झाली. कवी गोविदांनी लिहिलेली काव्य,

पोवाडे बाबाराव सावरकरांनी प्रकाशक म्हणून प्रकाशित केली. याचे निमित्त करून बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. याची तीव्र खंत वाटून कवी गोविदांची कविता काही काळ मूक झाली होती. परंतु १९१४ साली टिळकांची सुटका झाल्यानंतर त्यांच्या प्रतिभेला पुन्हा पालवी फुटली. टिळकांना शिक्षा झाली असता ‘अमुचा वसंत कोणी नेला’ ही कविता त्यांना स्फुरली होती. तर ते सुटून आल्यावर ‘जय जय टिळका अपर समर्था…प्रभू’, ‘टिळक नव्हे हे श्री गीतेचे हृदय प्रकट जाहले’, ‘मूक्या मनाने किती उधळावे

शब्दांचे बुडबुडे । तुझे पवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे ।।’ तर ‘नमने वाहुनि स्तवने उधळा, जयजय करा’ आणि ‘त्या ज्ञानाहून जगात सुंदर एकच परमेश्वर’ इ. अनेक काव्यांबरोबर ही सरस्वतीची भूपाळीही कवी गोविदांनी लिहिली. ‘रणविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ असा सवाल करणार्‍या त्यांच्या तेजस्वी कवितेने पुढील काळात थोडे अध्यात्मिक वळण घेतलेले दिसते. शरीराने इतके अपंग असतानाही क्रांतिकारकांच्या घरातील कर्तेपुरुष तुरुंगात असताना त्यांच्या कुटुंबाला आधार होता तो कवी गोविद दरेकर यांचा. शरीराने पंगू पण मनाने देशभक्तीने, स्वातंत्र्य प्रीतीने भारावलेले या कवीचे २८ फेब्रुवारी १९२६ ला निधन झाले. पण त्यापूर्वी पंधराच दिवस आधी त्यांनी ‘सुंदर मी होणार’ ही अतिशय गाजलेली कविता रचलेली होती. ‘जुनी इंद्रिये, जुना पिसारा सर्व सर्व झडणार हो । न तनुचे, नव्या शक्तीचे पंख मला फुटणार हो, सुंदर मी होणार, उडत उडत मग, रडत रडत मग, प्रभूपाशी जाणार, स्वतंत्र तिजला (मातृभूमीला) करा म्हणोनि तच्चरणी पडणार हो ।।’’ अगदी शेवटच्या क्षणीही हे देशप्रेम व्यक्त करणार्‍या कवीला त्रिवार वंदन !

 

6 Comments on दरेकर, गोविंद त्र्यंबक (कवी गोविंद)

  1. स्वातंत्र्य कवी गोविंद दरेकर यांच्या विषयी अजून काही माहिती आपणाजवळ जर असेल तर कृपया ती आम्हाला म्हणजे स्वातंत्र्य कवी गोविंद दरेकर सेवाभावी संस्था यांना द्या हि संस्था सर्व माहिती संकलित करीत आहे कृपया मदत करा अधिक माहिती साठी संपर्क ९५९५०७८०४८०

    • Abhinav Bharat mandir Nashik sashastra krantikarakanche smarak yethe Kavi govind yanchya kavitanche pustak upalabdha aahe(8975051175)

  2. सुंदर मी होणार ही संपूर्ण कविता मला हवी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*