पं. जितेंद्र अभिषेकी

सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार 

Pandit Jitendra Abhisheki

मराठीसृष्टीचे लेखक श्री जगदीश पटवर्धन यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांची करुन दिलेली ही एक ओळख


प्रत्येक घरामध्ये चित्रकला शिल्पकला नाटयकला आणि संगीतापैकी कुठल्यातरी एका कलेची उपासना आणि जोपासना होताना दिसते. कोकणातील लोकगीते लग्नगीते नृत्यगीते कथा कहाण्या आदी प्रकारही सतत सादर होत असतात. पावसाळयात सोन्या चांदीच्या धारा वाहतात तर वसंतात चांदणे माहेराला येते. उंच उंच ताडामाडाची झाडं विविधतेने नटलेल्या वेली पानफुलांची पखरण घालतात उंच सखल दिसणारे डोंगर सदैव हिरवळीच लेणं घेऊन उभे असतात. इथली मंदिरे वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.

गोमंतक प्रदेश निसर्गाबरोबरच संगीत कलेसाठीही प्रसिद्ध आहे. इथला माणूस जन्मताच स्वर व लय आपल्या बरोबर घेऊन येतो असे मानले जाते आणि त्याला आपल्या लाडक्या गंपूचा अपवाद असूच शकत नाही.

गंपूचे पिताश्री भिकाजी त्यांना बाळूबुवा म्हणत. बाळूबुवा स्वतः किर्तनकार होते. बाळूबुवा अतिशय देखणं व्यक्तीमत्व. डोक्यावर पगडी कमरेला उपरणं बांधलेलं पांढरं शुभ्र धोतर, कुर्ता, उभेगंध, हातात चिपळया कधी झांजही वाजवीत. साथील गंपू. एक आदर्श कीर्तनकार. लागोपाठ वीस वर्ष रत्गागिरीस व राजापूरला येऊन त्यांनी त्यांच्या हयातीत किर्तने केली. आदर्श किर्तनकार म्हणून दत्तो वामन पोतदारांनी बाळूबुवांना सुवर्णपदक दिलं होतं. बाळूबुवांनी किर्तनाची संथा घेतली होती फक्त नाही म्हणायला ३०० ४०० चीजा त्यांना पाठ होत्या.

संगीताला व्यवसायाच्या दृष्टीने त्या काळात मान्यता नव्हती. संगीतातले सगळे छंदीफंदी असतात अशी एक प्रतिमा त्या काळात होती. आपल्या घराण्यात गाण्याकडे वळणारा मुलगा असावा ही इच्छा बाळूबुवांच्या मनात होती.

अगदी लहानपणापासूनच गणेशचे उर्फ गंपूचे उर्फ जितेंद्राचे कान संगीताचे सूर ऐकले की टवकारायचे. संगीत एकलं की तो रडणं थांबवायचा. अशा संगीताचा वारसा लाभलेला गंपू हळूहळू लहानाचा मोठा होऊ लागला. संगीतातील स्वर आणि तबल्यावरचे बोल हेच त्याचे सवंगडी बनले.

स्व.पं.जितेंद्र अभिषेकींचे वडील मात्र किर्तनकार असले तरी केवळ किर्तनापुरतेच त्यांचे संगीताचे ज्ञान नव्हते. त्यांचा शास्त्रीय संगीताचा अभ्यास होता. गोव्याच्या शंकरबुबा गोखले यांच्याकडे त्यांनी शिक्षण (तालीम) घेतली होती. शंकरबुवा गोखले यांना पं.वझेबुबा यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळाली होती आणि तो वारसा स्व.पं.जितेंद्र अभिषेकींना वडिलांकडून मिळाला.

पं.जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म १४ सप्टेंबर १९३३ साली गोव्यात झाला. मध्य पूर्वेकडील अरबी चेहेर्याशी साधर्म्य दाखवणारा भरभक्कम शरीरयष्टीचा गोरटेला मध्यम उंचीचा गुढ गंभीर भावमुद्रा असणारा खुले गाणारा लयकारीच्या बद्धीप्रचुर गाण्यात मुसलमानी दर्दचे हुंकार व उद्गारचिन्हे वापरणारा ‘शास्त्रीय’ प्रमाणे ‘लाइट क्लासिकलं’ व ‘क्लासिकल’ देखील सुलभ जाणिवेने पेश करून मैफिल गाजवणारा.

पाटणकरबुवा मराठेबुवा मास्टर नवरंग्ा गिरीजाबाई केळेकर अझ्मतहुसेन्ा जगन्नाथबुवा परोहित निवृत्तीबुवा सरनाईक जसदनवाला.. अशा सारख्यांकडून संगीत घेणारा एरवी ‘चांगले ते हेरले जे हेरले ते उचलले’ अशा वृत्तीचा. स्वतःच्या शैलीने गाऊन स्वतःची वेगळी वाट चोखाळणारा… स्वतः कोण व्हायचे हे ठरविल्यावर त्यासाठी जिवाचे रान करणारा आणि ‘श्रेय’ गवसल्यावर ‘मी अमुक आहे’ असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने ‘अॅसर्ट‘ करणारा गाण्याचे भान राखताना स्वतःचे भान न विसरणारा.

उत्तम गायक हे उत्तम तालिये असल्याशिवाय गायनात त्यांना प्रभुत्व संपादन करता येत नाही. ताल हे गानकि्रयेचे प्राणतत्व मानले आहे. गणेशाने टाळ वाजवतावाजवता ताल आत्मसात केला. किर्तन परंपरेनुसार विचार करता त्यामध्ये झंपा धुमाळी तेवरा दादरा एकताल इ. ताल तसेच पारंपारिक प्रसंग सांगण्यासाठी धृपदसदृष्य अशी गीते आपल्याला आढळतात. पंचपदी गाताना पाच वेगवेगळया तालात गाण्याची व पाच रागात म्हणण्याची प्रथा दिसून येते. बालमनावर किर्तनातील अभंग आपोआप संस्कार करतात. इथूनच पंडितजींच्या संगीताची झडण घडण व्हायला सुरूवात झाली. ही तालीम साधारण ५ते ७ वर्षे चालली. वयाच्या १३र् १४ व्या वर्षापर्यंत त्यांना ही तालीम वडिलांकडून मिळाली. किर्तनाव्यतीरिक्त शास्त्रीय संगीत शिकवायला पंडितजींना घेऊन बसत. दुर्गा, देस, काफी, खमाज अशा रागांच्या चिजा वडिलांनी पंडितजींना शिकविल्या त्यामुळे मूळ रागांची तोंडओळख पंडितजींना लहानपणीच झाली.

पंडितजींच्या संगीताच्या शिक्षणाबरोबरच वडिलांचे त्यांच्या शालेय शिक्षणाकडेही विशेष लक्ष होते. त्यावेळी गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य होते. पोर्तुगीज शाळेत प्राथमिक शिक्षणाची चार वर्षे झाल्यानंतर लगेच कॉलेजमध्ये प्रवेश मिळत असे. चार, दोन असे सहा वर्षे पोर्तुगीज शाळेत शिक्षण झाले होते. हायस्कूलनंतर म्हापश्याला पोर्तुगीज कॉलेजमध्ये ते दोन वर्ष शिकले. त्यावेळेस ख्रिस्ती संगीताचे संस्कार कळत नकळत झाले. लहानपणी स्वतः नाटकात काम करीत असत.

पंडितजी प्रथम गिरीजाबाई केळेकरांकडे शिकण्यासाठी जात असत. शिक्षण व्यवस्थित चालले होते. परंतू त्यांचे मन रमत नव्हते त्यांना अजून उच्च संगीत शिकावयाचे होते. गिरिजाबाईंनी ४ ते ५ वर्षे पंडितजींना गायन शिकविले. पुण्यास पुढील शिक्षणासाठी जाणार असशील तर तुझ्या शिकविण्याची व्यवस्था पुण्यास करतो” असे वडिलांनी त्यांना सांगितले. संगीताच्या तिव्र ओढीमुळे ते पुण्यात दाखल झाले.

पुण्याच्या वस्तव्यात कमीत कमी तीन गुरूंकडे संगीताचे धडे घेतले. गोविंदराव देसाई यांच्याकडे शिकत होते. गोविंदराव पं.विष्णु दिगंबर पलुस्कारांचे शिष्य होते. लोकमान्य टिळकांचेही भक्त होते.

१९४९ साली पंडीतजी एस्.एस्.सी. झाले. पुण्यातील नरहरबुवा पाटणकर यांच्याकडे वर्षभर संगीताचे शिक्षण घेतले. नरहरबुवा पाटणकर हे पं.भास्करबुवा बखल्यांचे शिष्य होते. पंडीतजींना ग्वाल्हेर गायकीची विशीष्ट पद्धत कळली. त्यांनी यशवंतबुबा मराठे यांच्याकडेही गायनाचे धडे घेतले. यशवंतबुवा संस्कृतचे मोठे अभ्यासक होते. तिथे संस्कृतचे पाठांतर चर्चा आणि काही बंदिशींचे शिक्षण चालत असे.

पुण्यातील वास्तव्यानंतर पं.अभिषेकी बेळगावला गेले.तिथे राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये शिकत होते. १९५० चा तो काळ होता. पंडीतजींच्या अधून मधून घरगुती स्वरूपाच्या मैफिली होत असत. पंडीतजी बेळगावात डॉ. केतकरांकडे राहात होते तेथेच त्यांना मोठमोठाले कलाकार ऐकायला व बघायला मिळत.

१९५२-५३ सालातली गोष्ट असावी असं पु.ल. देशापांडे यांनी एका ठिकाणी सांगितली ज्यावेळी ते बेळगावात प्राध्यापकी करत होते. त्यांना पंडितजींचे गाण ऐकण्याचा योग आला आणि ते म्हणाले “कुणीतरी उद्याचा ‘बुवा’ आज तरूण वयात गात आहे” इतकं ते गायन परिपक्व अस त्यांना वाटे.

पंडीतजी त्यानंतर पुढील गाण शिकण्यासाठी मुंबईत गिगावात त्यांच्या थोरल्या भावाकडे राहावयास आले आणि त्यांनी भवन्स् कॉलेज मधून संस्कृत घेऊन बी.ए.केलं. संगीताच्या अभ्यासासठी त्यांना दिल्ली सरकारची स्कॉलरशीपही मिळाली होती. मास्टर नवरंगांच्याकडे शिकण्या अगोदर स्वतः पंडितजी इंग्रजी व पोर्तुगीज भाषेच्या शिकविण्या घेत असत. त्यांच दहावी पर्यंतच शिक्षण पोर्तुगीज भाषेतूनच झालं होतं. शिकवणीचे १५ रूपये मिळत असत. त्याच वेळी त्यांना टाटा स्कॉलरशिपही मिळाली. महिना रू.२५०/- यातून कॉलेज व शिकवणी इ.चा खर्च भागत असे आणि वरखर्च प्रफुल्ला डहाणूकर देत असत.

सकाळी ५.३० ते ६.३० खर्जातले स्वर लाऊन बसणे ७ ते ८ पेपर वाचन चहा अंघोळ इ. ८ ते १०.३० प्रभाकर कारेकर राजेश्वर बोबडे मोहनदास नार्वेकर हे शिष्यवर येऊन त्यांच्याबरोबर तालीम घ्यायचे.

मुंबई मुक्कामात त्यांनी मुंबई आकाशवाणीवर कोकणी विभागात काम केलं. आकाशवाणीवर काम करतांना त्यांची पु.लंशी ओळख वाढली. त्याच काळात मुंबईत दाखल झालेले गुणीदास (पं.जगन्नाथबुवा पुरोहित) त्यांच्याकडे त्यांनी गायनाचे धडे घेतले. आकाशवाणीवर कामकरताना बातम्या व त्याचे भाषांतर करणे गाण्यांना चाली देणे नाटके बसवीणे डबिंग करणे गीतांचे गायन करणे ही सर्व कामे करावी लागत. याचा असा फायदा झाला की त्यामुळे चौफेर शिकायला मिळाले. मोठमोठया गायकांच्या रेकॉर्डस् ऐकणे जुन्या लेकांची गाणी ऐकणे व त्यावर विचार करणे त्यामुळे साहित्य वाचनाची गोडी उत्पन झाली. व्यक्तीमत्वाला तेजयुक्त धार आली.

पंडीतजींनी नऊ ते साडेनऊ वर्षे आकाशवाणीवर नोकरी केल्याने दृष्टी व्यापक झाली. संत कबीर यांचे दोहे तसेच भजन व नानक मीरा रामदास इ.संतांच्या रचना त्यांनी स्वरबद्ध केल्या आहेत. पं. अभिषेकींची स्वरसाथ मराठी संतांचे अभंग त्यात दुर्लक्षीत केलेले संत त्यांना पहिले महत्व त्यांनी दिले. संत चोखामेळा सोहिरा जनाबाइर् निवृत्तीनाथ इ. रचना पंडीतजींनी लोकांसमोर आणल्या. आवडते कवी गदीमा बा.भ.बोरकर शांता शेळके किशोर पाठक आणि रामाणी. या कवींच्या गीतरचना त्यांनी अजरामर केल्या. आकाशवाणीवर पंडीतजींना मोठमोठे गायक वादक भेटले त्यात पं.रामनाथकर उस्ताद अल्लारखॉसाहेब अझमत हुसेन खॉ कवि बा.भ.बोरकर मंगेश पाडगांवकर. मराठी तसेच उर्दु गझल फार चांगल्या तयार केल्या होत्या. पंडीतजी गवैये तसे खवैयेही होते. एखादी गोष्ट आवडली की ते त्याचा मनमुराद आनंद लुटत. एकदा तर त्यांनी ४०र्५० पाणीपुर्या खाल्या होत्या त्यांच्यात पहेलवानी मस्ती सुद्धा होती. कोकणी नाटकात काम करीत. अधून मधून पं. अभिषेकी बोरकर संपादित ‘पोरजेचो आवज’ या नियतकालिकात लेखन करीत असत. ‘वैशाख वणवा’ या चित्रपटासाठी चित्रपटाचे लेखन पं.महादेवशास्त्री जोशी यांच्या शिफारशीनुसार पंडीतजीनी ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’ हे कोकणी नाखवा गीत गायले होते त्याला संगीत दिगदर्शन दत्ता डावजेकारांचे होते.

पं.अभिषेकींना उ.अजमत हुसेन खाँ यांनी तालीम देण्याचे मान्य केले. गाण्याचे खरे कष्ट उपसले ते येथेच. सकाळी ६ वाजता खर्जाची मेहनत असे आणि ती दोन अडीच तास चालत असे. आवाजाचा लगाव खाँ साहेबांनीच तयार करून घेतलेला दिसतो. त्यांना फिरकीची तान तसेच सच्छ आणि नैसर्गिक आवाजात गाणे कसे असते याची समज आली. संगीताची व्यापकता लक्षात आली व खरी घरंदाज गायकीचे शिक्षण मिळाले.

पं.अभिषेकींनी पं.जगन्नाथबुवा पुरोहितांकडे १९५३-५४ सालापासून जवळ जवळ ९ वर्षे गाणं शिकले. पं.जगन्नाथबुवा अत्यंत साधे व प्रेमळ होते. शिकविण्याची कलाही उत्तम होती. पंडितजींच्या आवाजातील भावभिव्यक्ती वजनदारपणा आणि कुश्याग्र बुद्धीचापल्यामुळे ते बुवांचे लाडके शिष्य झाले. गाण्याबरोंबरच बुवांच्या राहाणीमानाचा प्रवाभ पंडितजींवर झाला.

कलाकार आपल्या कलेतच मग्न असतो म्हणून सांसारिक जीवनाकडे दुर्लक्ष होते. आपल्या मुलीचे वैवाहिक जीवन सुखी व्हावे यासाठी प्रत्येक पालक आपल्या मुलीचे लग्न करताना हा विचार करतच असतात. असाच विचार पंडितजींच्या सासरेबुवांनी म्हणजे चॅरिटी कमिशनर श्री.गोडसे यांनी त्यांच्या मुलीचे विद्याचे लग्न करताना केला. पंडितजींचा विवाह १९६९साली झाला. लग्नाला सगळया थरातील दिग्गज मंडळी हजर होती.

पं.अभिषेकींनी आपल्या आयुष्यात गाणं विविध घराण्यांच शिकण्यासाठी त्यांनी दत्तात्रयांसारखे गुरू केले असावेत. गुछछुभाई जस्दनवाला यांच्याकडून साधारण १९७८ सालच्या सुमारास जयपूर घराण्याची तालीम मिळाली.

पंडितजींना पं.रत्नाकर पै यांनी १९८१ पासून आत्रौली घरण्याचे गाणं शिकविण्यास सुरूवात केली ते १९८५ पर्यंत शिकले. उ.अझिजुद्दीन खाँ साहेबांकडे सुद्धा पंडितजी काही काळ शिकले. तसेच पं.निवृत्तीबुवा सरनाईक हेही गुरू होते. पंडितजी मुळात बुद्धीमान असल्यामुळे त्यांनी वेगवेगळया गोष्टींचा आपल्या गायकीमध्ये वापर केलेला दिसून येतो. जसे जयपूर घराण्यातील एकारात स्वरलगाव वेगळया ढंगदार पद्धतीने केलेला दिसून येतो. आकारयुक्त आलापी आग्रा घराण्यातून घेतली. जयपूर घराण्याचे तानांचे पॅटर्न किराणा घराण्याची आलापी मेरखंड पद्धतीने कशी करतात ते तंत्र आत्मसात केले. त्याच संदर्भात उ.अमीरखाँ यांच्या गायन शैलीचा मोठा प्रभाव त्यांच्या गायनावर दिसन येतो. उ.बडे गुलामअली खाँ यांच्या गायनातून चपलता मृदूता भावुकता इ.गुण घेतले. ठुमरी पेशकारी ही प्रामुख्याने पतियाळा घराण्याची घेतली.

१९६४ च्या सुमारास पंडितजींनी लोणावळयास गुरूकुल पद्धतीने शिष्यांना शिकविण्यास सुरूवात केली. शिष्याच्या आवाजाची देण, पट्टी त्याची बौद्धिक आकलनक्षमता त्याच्यातील उणीवा कमी करून त्याचे गुणवर्धन याकडे लक्ष देतानाच्ा उच्चारशास्त्र व आवश्यक ते वर्ज्य शब्द याकडे ते लक्ष देत. सकाळच्या प्रहरी रियाज करण्यावर भर असे. सकाळी मन, शरीर ताजेतवाने असल्याने एकाग्रते बरोबरच आवाजास गहिराई येते. थेरी पेक्षा प्रॅक्टिकलडेच भर असे. त्या पैकी काही शिष्य उदा. प्रभाकर कारेकर, अजित कडकडे, राजा काळे, विजय कोपरकर, बोबडे नाईक दरेकर यांचा उल्लेख करता येईल.

पं.अभिषेकी यांचे संगीतातील स्थान एक गायक म्हणून संगीतकार म्हणून वरच्या दर्जाचे आहे. वाग्गेयकार म्हणूनही ते लोकांना सुपरिचीत आहेत. परंतू त्याही पेक्षा ते संगीत तत्वचिंतक आहेत. गाण्याचा विचार एकांगीपणे करणारे अनेक गायक वादक आपल्याला दिसून येतात परंतू सर्वांग परिपूर्ण विचार करणारे गायक फार थोडेच दिसतात. गुरू परंपरेला धक्का लागू नये म्हणून गुरूने सांगितलेल्या सगळयाच गोष्टी जशाच्या तशा उचलणे आणि त्याच मांडत बसणे यामध्ये बरेच वेळा तोच तोचपणा येण्याची शक्यता असते. आपण जी शैली गाता तशीच शैली आपल्या शिष्यांनी गायली पाहिजे असे दुराग्रही गुरूदेखील संगीत कलेच्या समृद्धीसाठी भविष्यात उपकारक ठरत नाहीत असे त्यांचे मत असे. जसे ज्ञान मिळेल ते आत्मसात करण्यावर त्यांचा मोठा भर होता. ते ज्ञान स्वतःपुरते न ठेवता त्यांनी त्याच्यावर स्वतःच्या विचारांचे रोपण केले आणि त्यातून नवीन प्रकारची पालवी अंकुरीत केली. चिंतनशील स्वभावामुळे त्यांनी कोणाच्याही आवाजाची नक्कल केली नाही. राग किती तास मिनिटे गायला यापेक्षा तो किती आकर्षक गायला आणि श्रोत्यांपर्यंत कसा पोचला यावर त्यांचा अधिक भर होता. त्या काळात पं.वसंतराव देशापांडे पं.भिमसेन जोशी, पं.जसराज हे समकालीन गायक लोकप्रिय होते. त्यांच्या गाण्यातील चांगल त्यांनी वेचलं ते आपल गाणं बदलण्यासाठी नाही तर समृद्ध करण्यासाठी. अशा प्रकारे विविध मार्गांतून त्यांना मिळालेले जे ज्ञान होते त्याचे त्यांनी सुंदर रसायन तयार करून पुढच्या पिढीला दिले.

पंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत अभंग भावगीत हिन्दी भजन यांना लावलेल्या चालींची संख्या १०० ते १५०च्या दरम्यान जाईल. ‘मत्स्यगंधा’ हे पंडितजीनी संगीत दिग्दर्शन केलेले ना टक १ मे १९६४ रोजी रंगभूमीवर आले आणि खूप गाजलं. त्याच नाटकातील सुरूवातीची नांदी ही पंडितजींची शब्दरचना व चाल होय. एकाच गाण्यात अनेक राग व ताल हा एक वेगळा प्रयोग त्यांनी ‘कटयार’ मधील ‘सुरत पियाकी’ या रागमालेत केलेला दिसतो. ‘घेई छंद मकरंद’ या पदासाठी दोन घराण्यातील गायन शैली तर दिग्दर्शन ही एक ईश्वरी देणगीच आहे हे ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या पदावरून प्रत्ययास येते. हे पद म्हणजे नाटयसंगीतातील पसायदान होय. ‘काटा रूते कुणाला’ ‘रती रंगी’ ‘कैवल्याच्या’ ‘हे सुरांनो’ ‘हे बंध रेशमाचे’ ‘साद देती हिमशिखरे’ इ.अनेक प्रासादिक रचना त्यांनी केल्या. पंडितजींनी ‘मत्स्यगंधा’ ते ‘महानंदा’ मराठी संगीत नाटकांचे ‘अभिषेकी युग’ त्यांनी तयार केले व गाजवले आणि मोठी क्रांती घडवून आणली. जवळजवळ १७ नाटकांचे दिग्दर्शन केले.

पं. अभिषेकी १९७० साली पं.रविशंकर यांचे बरोबर प्रथम अमेरिकेस गेले. तेथे विद्यादानाचे काम केले. त्यामध्ये संगीत देवनागरी लीपी भारतीय भाषा हेही शिकवीले. दोन वर्षांनी स्वतंत्रपणे अमेरिकेत कार्यक्रम केले. पहिली ध्वनिमुदि्रका १९६० साली निघाली. काश्मीर ते कन्याकुमारी, कच्छपासून, कोलकत्यापर्यंत सतत आणि अगणित संगीत मैफिली गाजविल्या. इंग्लड, यूरोप, अमेरिका, कॅनडा, आखाती देश, अफ्रिका, रशिया असे अर्ध्याहून अधिक जग त्यांनी मैफलींच्या निमित्ताने पाहिले.

१९९५ मध्ये ७६ व्या नाटय संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. पंडितजी १९८६ च्या दरम्यान पुण्यात स्थायीक झाले. १९८६ ते १९९५ पर्यंत त्यांनी सवाई गंर्धव महोत्सवात गायन केले. षष्ट्यब्दिपूर्ति निमित्ताने सवाई गंधर्व महोत्सवात पं.भीमसेन जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘गोवा कला अकादमी’च्या व ‘संगीत नाटक अकादमी’च्या जनरल कौन्सिलचे ते मेंबर होते.

पं.अभिषेकी हे शरीर रूपाने आज नाहीत. पण त्यांच्या सांगीतिक कार्यामुळे आपल्यात राहून ते अजरामर झाले आहेत. त्यांनी निर्मिलेल्या स्वर अमृताचा अभिषेक रसीकजनांवर अखंडपणे होत आहे. एक आदर्श गुरू एक आदर्श शिष्य संगीत दिग्दर्शक थोर विचारवंत व माणूस म्हणूनही थोर. मन मोहवणारे भावसंगीत जुन्या सुरांना नवा ताज देऊन जिवंत केलेली नाटयसंगीताची परंपरा हे सर्व हातचं राखून न ठेवता मुक्तहस्ताने वाटणारे त्यांच्या शिष्यांचे गूरू त्यांच्या शिष्यांचे आज जीवन गाणे बनले आहेत आणि अशीच चुटपूट लावून सर्व श्रोत्यांना चाहत्यांना कुटुंबीयांना ७ नोव्हेंबर १९९८ रोजी हा इहलोक व संगीताचा नसंपणारा खजीन सोडून आपल्यातून गेले आहेत.

जगदीश पटवर्धन


## Pandit Jitendra Abhisheki

 

1 Comment on पं. जितेंद्र अभिषेकी

Leave a Reply

Your email address will not be published.


*