बापू लिमये

मूळचे अमरावतीचे असलेले बापू लिमये यांनी गेली सहा दशके मराठी हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर रंगकर्मी, नेपथ्य आरेखन, रचना करण्याचे काम केले. कारकिर्दीच्या सुरूवातीला त्यांनी मध्य रेल्वेत महसूल विभागात हिंदी अधीक्षक म्हणून नोकरी केली.

साधे सुती कपडे आणि खांद्याला झोळी अशा अवतारातले बापू जिथे नाटक असेल तिथे जात आणि चाललेल्या गोष्टींचे बारीक अवलोकन करत. ते फार बोलत नसत, परंतु सर्वत्र असत. नव्या रंगकर्मींची राज्य नाट्य स्पर्धेतली नाटके न चुकता बघत. त्यांना सूचना करत. त्यांनी नाटकाच्या दिग्दर्शनापासून अभिनय आणि नेपथ्य-प्रकाश योजनादी तंत्रांच्या हाताळणी पर्यंत सर्व घटकांत रस घेतला. पण नेपथ्यरचनेत ते विशेष रमले.

जेव्हा डॉ. श्रीराम लागू विजय तेंडुलकरांचे ‘गिधाडे’ हे नाटक दिग्दर्शित करत होते. त्यांनी बापूंकडे या नाटकाच्या नेपथ्याची धुरा सोपवली. ‘गिधाडे’ हे तसे उग्र प्रकृतीचे नाटक. तेंडुलकरांनी त्यात माणसांमधल्या गिधाडांचे दर्शन घडवले होते. बापू लिमयेंनी नाटकातील हिंसक प्रवृत्तीच्या माणसांच्या घरालाच गिधाडांच्या ढोलीचा आकार दिला. घरातील फर्निचर हे ओबड धोबड, वृक्षांच्या कापलेल्या ओंडक्यांप्रमाणे होते. नेपथ्यातला रासवटपणा नाटकाची प्रकृती अधोरेखित करील हे त्यांनी पाहिले. त्यांचे हे अतिवास्तववादी नेपथ्य त्याकाळात खूप गाजले.

बापूंना हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवावासा वाटायचा. केवळ इतिहासच नव्हे तर नेपथ्याचे तंत्र आणि मंत्र नव्या रंगकर्मींना सांगावेसे वाटत. त्यांनी ‘गोष्ट नेपथ्याची’ हे तीन भागांतले पुस्तक लिहिले.

हौशी रंगमंच संघटनेचे ते माजी अध्यक्ष, रंगमंच कलाकार संघटनेचे ते माजी अध्यक्ष, कार्यकर्ते होते. त्यांनी ९७ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूकही त्यांनी लढवली होती. नाट्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*