मालडी : कोकणातील एक आखीव-रेखीव गाव

Maladi in Sindhudurga District

कोकणातील अनेक गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासात डोकावण्याची आवड असणार्‍या पर्यटकांनी गावांचा-पर्यटनस्थळांचा मागोवा घ्यायचा म्हटला तर सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील मालडी या सुंदर गावाला अवश्य भेट द्यायला हवी. मालडी हे मोजकीच आणि टुमदार घरं, विस्तीर्ण अंगणांनी सजलेले, शांत असं आखीव-रेखीव गाव आहे. वाहनांची वर्दळ नाही, आवाज गोंगाट, प्रदूषण नाही.

कणकवली ते आचरे मार्गावरील आडवली तिठी (नाका) इथपर्यंत रिक्षा किंवा एसटीनं उतरावं, गावात जायला पक्की सडक असल्यामुळे रमतगमत चालतं जाता येतं. गावात प्रवेश करताच ग्रामदेवता भावईदेवीचं दर्शन घडतं. आंगणेवाडीची भराडीदेवी, रेवंडी गावची भद्रकाली माता, मुणगे येथील भगवतीदेवी, मालडीची भावईदेवी या विष्णूशक्तीच्या देवता आहेत.

भावई दक्षिणामुख पदमासनस्थ बसलेली आहे. या मंदिरालगत चौधुरी देवालय आहे. चौधुरी म्हणजे चौधरी. आडवली, मालडी, भटवाडी या गावांच्या चार सीमेचा अधिकारी असा त्याचा अर्थ होतो. यांचं दर्शन घेऊन रस्त्याच्या विरुध्द दिशेस सतीची थडगी दृष्टीपथात येतात. सुबक चिरेबंदी चौथऱ्यावर पाषाण असून ओळीनं सात थडगी आहेत. मात्र ती कोणाची आहेत याचा उल्लेख सापडत नाही.

इथून मालडी बंदराकडे जाता येत. बंदरावर पोहचताच गड नदीचं दर्शन घडतं. पावसाळ्यात उग्र भासणाऱ्या, पूर सदृश्य वातावरण निर्माण करणाऱ्या पण आता संथ वाहणाऱ्या नदीचं हे रूप मनाला भावतं. हिरवागार परिसर, उजवीकडे भिंतीसारखा उंचच उंच असा दरडीचा डोंगर. समोरच्या दक्षिण दिशेस लाल दगडांच्या कापीसमान डोंगर रांगा. दरडीच्या डोंगरावर चुनखडी व अभ्रक सापडतो. हे त्याचं वेगळं वैशिष्ट्य. एका बाजूला आडवली गावाची सीमा व शेजारी भटवाडी. समोरच्या किनाऱ्यावर थांबलेल्या होडीवाल्याला साद घालून, होडीत बसून कापीचा डोंगर व दरडीचा डोंगर अगदी जवळून पाहून जलपर्यटनाचा आनंद घ्यावा.

या गावावर आदिलशाहीचा अंमल होता. त्यावेळी काही घटना घडल्या. त्याचं अस्तित्व म्हणजे मालडीमधील मळ्यातला पीर आणि गाव मुकादम ही स्थळ आवर्जून पहावीत. त्यानंतर सोन्याची तड (तड म्हणजे ठिकाण) हा रम्य परिसर आकर्षित करतो. येथील छोटी-छोटी घरं, शेजारच्या परसात भाजीपाला, फळफळावळ, शेती यांनी बहरलेले कुणगे, जवळूनच वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्याचा खळखळाट, ओढ्यांवर असणारा साकव (पुल). या साकवावरून दिसणारा आजूबाजूचा नेत्रसुखद नजारा डोळयांची पारण फेडतो.

ज्यानं दूरदृष्टीनं इथ वस्ती वसवली, त्या सोन्या नामक पूर्वजाचं नाव या विभागाला पडलेलं आहे. गाव पाहून, चालून थकवा आला असल्यास या खळाळणाऱ्या पाण्याच्या ओढ्यातील एखादा ऐसपैस दगड हेरुन त्यावर बसून. थकलेले पाय पाण्यात सोडताच शरीराला जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो.झॅकुझी मसाज पध्दतीनं हे पाणी आपल्याला स्पर्श करतं. त्यामुळे सर्व थकवा भरकन निघून जातो.

मालवण एवढेच मालडी गावालाही शिवशाहीत महत्व प्राप्त झालं होत. परकीय शक्तीशी दोन हात करायचे असतील तर आपले प्रबळ सागरी आरमार हवेच, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी डच, पोर्तुगीज, अरब, इंग्रजांचे आक्रमण थोपवण्यासाठी, स्वराज्य बळकट करण्याकरिता इ.स. १६५९ च्या दरम्यान आरमाराची स्थापना केली.

अरबी समुद्रामार्गे गडनदीतून व्यापारी जहाजे मालडी बंदरापर्यंत येत. त्यांचं रक्षण करण्यासाठी कोळंब आणि तळाशिल गावाच्या मुखाशी सर्जेकोट बांधला गेला. त्या पुढे भगवंतगड व समोरील मसुरे गावात भरतगड आणि मालडी गावापासून चार कि.मी अंतरावर कणकवलीच्या दिशेस रामगडाची निर्मिती केल्याचे दिसून येईल. एकाच नदीच्या काठावर ठिकठिकाणी चार गडकोट बांधले गेले आहेत. म्हणजे या भागातून किती मोठ्या प्रमाणात व्यापार होत असे याचा अंदाज बांधता येतो.

शिवाजी महाराजांनी ८ फेब्रुवारी १६६५ रोजी मालडी बंदरातून ८४ मध्यम व ३ मोठ्या लढाऊ गलबतांसह जाऊन बेदनुर (दक्षिण कर्नाटक) राज्यातील बसरूर बंदरावर स्वारी फत्ते केली होती.

तर असं हे विविधांगी नटलेलं सुंदर, अतिशय शांत, रोमहर्षक घटनांची साक्ष देणारं, उर्मी आणणारं मालडी गाव एकदा तरी पाहिलंच पाहिजे. कणकवली, देवगड, मालवण येथून आचरे गावामार्गे जाणाऱ्या भरपूर एसटी बसेस व रिक्षा आहेत. रहाण्या-जेवणाची व्यवस्था नाही. त्यासाठी आचऱ्यालाचं यावं लागतं.

`महान्यूज’ वरुन साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*