कोल्हापूर जिल्हा

ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती,मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे. येथील मसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघरच मानले जाते. या जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात. कोल्हापुरातील मुख्य उद्योग शेती आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय होत. कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेली कोल्हापूर नगरी करवीर नगरी किंवा दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. त्यातील कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मी हे पूर्णपीठ. अनेक कलांच्या विकासामुळे कोल्हापूरला ’कलापूर’ ही म्हटले जाते. राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक म्हणजे राजर्षी शाहू महाराज. कोल्हापूर संस्थानला राजर्षी शाहूंसारखा ‘रयतेचा राजा’ लाभला. समाजसुधारणा, शिक्षण, उद्योग, शेती, पाणी नियोजन, कला-क्रीडा आणि लोकशाही या सर्वच क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व अशी पायाभरणी राजर्षी शाहू महाराजांनी करून ठेवली आहे. राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.