राजहंस, नारायण श्रीपाद (बालगंधर्व)

Rajhans, Narayan Shripad (Balgandharva)

बालगंधर्व या टोपणनावाने ओळखले जाणारे नारायण श्रीपाद राजहंस हे मराठी गायक-अभिनेते होते. संगीतनाटकांतील गायन व अभिनयासाठी – विशेषकरून स्त्री-पात्रांच्या अभिनयातील कामासाठी त्यांची ख्याती होती. ते पं भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. बालगंधर्व ही पदवी बाळ गंगाधर टिळकांनी दिली.

जन्म 26 जून 1888 साली. संगीत रंगभुमीचा बहुमोल अंलकार. मूळ नाव नारायण श्रीपाद राजहंस असे होते. लोकमान्य टिळकांकडून वयाच्या 11 व्या वर्षी बालगंधर्व म्हणून कौतुक. किर्लोस्कर नाटक मंडळीत शारदेची पहिली स्त्री भुमिका केली. गंधर्व नाटक मंडळीची स्थापना. प्रभात कंपनीच्या धर्मात्मा बोलपटात एकनाथाची भुमिका 1929 पुणे येथील 24 व्या नाटयसंमेलनाचे अध्यक्ष होते. बालगंधर्वांनी सिंधु, रूक्मिनी, शारदा या प्रमुख स्त्री भुमिका केलेल्या होत्या. पद्मभुषणाने सन्मानित. त्यांचा मृत्यु 15 जुलै 1967 साली झाली.

मराठी रंगभूमीवरील एक अव्दितीय गायक नट. पुर्ण नाव नारायण श्रीपाद राजहंस 1906 ते 1955 या पन्नास वर्षाच्या कालखंडात स्त्रीभूमीका आणि नंतर पुरूष भूमीकाही करून बालगंधर्वांनी रसिकांना संतूष्ट केले व मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि कलासंपन्न केली. जन्म पुणे येथे. वडीलांचे पुर्ण नाव श्रीपाद कृष्णाजी राजहंस व आईचे नाव अन्नपुर्णाबाई असून पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांच्याशी बालगंधर्वाचा विवाह 1907 साली झाला होता. त्यांना पाच आपत्य झाली. पुढे लक्ष्मीबाईंच्या निधनानंतर 1940 बालगंधर्वांनी प्रसिद्ध गायिका गोहराबाईंशी नोंदणी पद्धतीने 1952 च्या सुमारास विवाह केला. गोहराबाईंशी त्यांचा परिचय 1937 मध्येच झाला होता. नारायणरावांचे शिक्षण इंग्रजी दुसर्‍या इयत्तेपर्यंतच झाले. अतिशय मोहक आणि भावदर्शी चेहरा व गंधर्वतुल्य आवाज, या देणग्या त्यांना जन्मतच लाभल्या होत्या 1898 साली लोकमान्य टिळकांनी त्यांचे गाणे प्रथमच ऐकले; `हा तर बालगंधर्व आहे` असे सहजस्फूर्त उद्गार त्यांनी काढले, असा प्रवाद आहे. पुढे नारायणराव `बालगंधर्व` म्हणूनच ओळखले जाऊ लागले.

त्यांच्या अंगातील उपजत गुणांचे चीज व्हायचे असेल, तर त्यांनी नटाचा व्यवसाय करावा असे त्यांच्या काही निकटवर्तियांना वाटत होते. किर्लोस्कर नाटक मंडळी ही त्या काळातली अग्रेसर संगीत नाटयसंस्था होती. तिचे संस्थापक अण्णासाहेब किर्लोस्कर आणि तिला उत्कर्षाच्या शिखरावर नेऊन बसविणारे गायक नट भाऊराव कोल्हटकर यांनी निर्माण केलेली थोर परंपरा महाराष्ट्राच्या परिचयाची होती. लोकमान्य टिळक आणि कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांचा आशिर्वाद घेऊन, 1905 सालच्या गुरूव्दादशीला बालगंधर्वांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. 1906 सालच्या सुरूवातीला बालगंधर्वांनी अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल नाटकातील शंकुतलेची भूमिका केली. ती पाहून भाऊराव कोल्हटकर यांच्याबरोबर अस्तंगत झालेले किर्लोस्कर नाटक मंडळीचे सौभाग्य आज तिला परत लाभले, असे तत्कालीन नाटय रसिकांना वाटले. त्यावेळी नारायण दत्तात्रेय तथा नानासाहेब जोगळेकर हे किर्लोस्कर नाटक मंडळीचे अर्ध्वयू होते.

त्या काळात नाटकांमध्ये स्त्रियांनी काम करणं निषिध्द मानलं जाई. त्यामुळे स्त्रीभूमिकाही पुरुषच करत असत. बालगंधर्वांच्या स्त्री-भूमिकांमध्ये विविधता होती. अचूक निरीक्षण व सौंदर्यदृष्टी यांमुळे अस्सल स्त्री भूमिका साकारण्यात बालगंधर्व यशस्वी होत. त्यांच्या भूमिकांमधील वेष व केशभूषेचं अनुकरण त्या काळातील स्त्रियाही करत असत. बालगंधर्व या भूमिकांशी तदरुप होऊन जात असत. त्यामुळे आपण या स्त्रीभूमिकांमध्ये एका पुरुषाला पाहात आहोत, अशी पुसटशी जाणीव देखील प्रेक्षकांना होत नसे. बालगंधर्वाच्या अभिनयाचा हा एक वैशिष्टयपूर्ण पैलू होता.

1913 मध्ये बालगंधर्वांनी गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्याबरोबर भागीदारीमध्ये गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली. पुढे टेंबे आणि बोडस या भागीदारीतून निवृत्त झाल्यानंतर बालगंधर्व या कंपनीचे एकटे मालक झाले. संगीत रंगभूमीचा तो सुवर्णकाळच होता. अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, राम गणेश गडकरी असे श्रेष्ठ नाटककार या काळात झाले. बालगंधर्वांनी `शाकुंतल` मध्ये शकुंतला, सौभद मध्ये सुभदा, मृच्छकटिक मध्ये वसंतसेना, `मानापमान`मध्ये भामिनी, `संशयकल्लोळ` मध्ये रेवती, शारदा मध्ये शारदा, मूकनायक मध्ये सरोजिनी, स्वयंवर मध्ये सिंधू ही स्त्री पात्रं रंगवली . 4 जून 1955 रोजी त्यांनी ’एकच प्याला’ नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका. त्यांनंतर त्यांनी रंगभूमीवरुन निवृत्ती स्वीकारली. रंगभूमीवरील यशस्वी कारकीर्द व रसिकांचं भरभरुन मिळालेलं प्रेम यामुळे संगीत नाटक अकादमीतर्फे राष्ट्रपतीपदक देऊन तर पुढे पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.

1933 च्या सुमारास भारतात बोलपटाचं युग सुरु झालं. त्यामूळे रंगभूमीकडे येणार्‍या प्रेक्षकांना ओहोटी लागली. बालगंधर्वही काही काळ चित्रपंटांकडे वळले. 1935 मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या `धर्मात्मा` या चित्रपटांत त्यांनी संत एकनाथांची भूमिका केली. मात्र बालगंधर्व चित्रपटांत रमले नाहीत. त्यांच्या ओढा रंगभूमिकडेच होता. म्हणूनच 1936 मध्ये ते पुन्हा रंगभूमीकडे परतले. 1939 पासून त्यांनी नाटकांमधून पुरुष भूमिका सादर करायला सुरुवात केली. `मानापमान` मध्ये धैर्यधराची आणि `मृच्छकटिक`मध्ये चारुदत्ताची भूमिका ते करु लागले. पण प्रेक्षकांना त्यांच्या स्त्री भूमिकाच अधिक प्रिय होत्या.

बालगंधर्व हे गायक-नट होते. त्यांची शास्त्रीय संगीताची बैठक उत्तम होती. भास्करबुवा बखले यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे घेतले होते. ख्याल, नाटकांमधील त्यांची अनेक पदं गाजली. शास्त्राचा बाज राखून अभिनयाला अनुकूल असं गाणं त्यांनी गायलं. त्यांची गाणी घराघरांमध्ये पोहोचली. नाटयसंगीताची अभिरुची निर्माण करण्याचं महत्वपूर्ण कार्य करणार्‍या बालगंधर्वाचा 1967 साली मृत्यू झाला.

बालगंधर्वांचे मराठीसृष्टीवरील लेख.

नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व (27-Jun-2017)

नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व (17-Jul-2017)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*