पौष्टिक गव्हाचा चिवडा

लागणारे जिन्नस: स्वच्छ निवडलेले गहु: १ किलो, मीठः रुचेल तेवढे, पापडखारः मीठाच्या प्रमाणात, शेंगदाणे: मुठभर, कढीपत्ता
फोडणीसाठी: हळद,चिवडा मसाला , लाल तिखट/ हिरवी मिरचीआवडीप्रमाणे.

कृती: प्रथम १ किलो स्वच्छ निवडलेला गहु एक रात्रभर भिजवावा. दुसर्‍या दिवशी सकाळी, तो गहु उपसुन कुकरमधे पाण्यात ४-५ शिट्ट्या घेउन शिजवावा. यात काळजी एकच घ्यायचीये की गहु जास्त शिजवायचा नाही. फक्त त्याची तोंडं उलुन येइपर्यंत शिजवायचा आहे. कुकर थंड झाला की गहु १/२ वेळेस थंड पाण्यातुन काढावा म्हणजे एकेक दाणा मोकळा होईल. नंतर गव्हातील उरले सुरले पाणी काढुन टाकावे व त्याला आपल्याला रुचेल इतके मीठ व पापडखार चोळुन ठेवावा. नंतर हे गहु कपड्यावर पसरवुन कडक उन्हात वाळवावे. वाळवल्यावर कोरड्या केलेल्या स्वच्छ डब्यात भरुन ठेवावेत. हे असे वर्षभर राहु शकतात. नंतर लागेल तेव्हा, थोडे थोडे काढुन कोरड्या कढईत (तेलात नाही) भाजुन घ्यावेत. आख्खे शेंगदाणे थोडे लालसर तळुन घ्यावेत. आवडत असल्यास लसूण बारीक चिरुन पण तोही खरपुस तळुन घ्यावा.
हिरवी मिरची बारीक चिरुन तळुन घ्यावी. यानंतर एका कढईत फोडणी साठी तेल ठेउन त्यात कढीपत्ता, थोडे हिंग, हळद, लाल तिखट चिवडा मसाला व चवीनुसार मीठ टाकुन त्यात हे भाजलेले गहु परतुन घ्यावेत. झाला गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा तयार! हा चिवडा लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडतो. हा चिवडा मी माझ्या गुजराती मैत्रिणी कडे खाल्ला होता. तेव्हा अतिशय आवडला याला कोणत्याही प्रकारचा बुटका गहु वापरावा , साधारण एप्रिल मे मधे गव्हा वर प्रक्रीया करून ठेवावी पुढे वर्षभर जेव्हा हवा तेव्हा भाजून चिवडा तयार करता येतो , अतिशय कमी तेलावर होणारा रूचकर व पौष्टीक पदार्थ आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*