नातू, मनमोहन

Natu, Manmohan

उत्कट भावगीतकार आणि बंडखोर कवी म्हणून जनसामान्यांच्या मनावर मोहिनी घालणारे लोककवी मनमोहन नातू यांचे मूळ नाव गोपाळ नरहर नातू. पण ‘लोककवी मनमोहन’ या नावानेच ते महाराष्ट्राला माहीत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव या गावी दि. ११ नोव्हेंबर १९११ साली त्यांचा जन्म झाला. शब्दांच्या गोडव्याने गीताला मधाळ करणारा हा कवी. सहज साधे शब्द, मनाला आनंद देणारी आणि जीभेवर रेंगाळत ठेवणारी त्यांची गाणी आजही ऐकायला ताजीतवानी वाटतात. ‘मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला’ हे त्यांचं अतिशय गाजलेलं गाणं आजही नववधूला लाजवते. ‘राधे तुझा सैल आंबाडा’, ‘बापूजींची प्राणज्योती…’ ह्या त्यांच्या गाजलेल्या रचना. अतिशय साधं रहाणीमान असलेला हा कवी आपल्या कवितेत मनातील प्रतिबिब उभं करतो. ते लिहितात, ‘‘राजकीय पुरुषांची कीर्ती, मुळीच मजला मत्सर नाही । आज हुमायुन बाबरापेक्षा, गलिब हृदये वेधित राही ।’’ युगायुगांचे सहप्रवासी, ‘अफुच्या गोळ्या’, ‘उद्धार’, ‘शिवशिल्पांजली’ हे त्यांच्या नावावर असलेले काव्यसंग्रह. सर्व विषयांना आपल्या कवितेत स्पर्श करणारा हा लोककवी पत्नीच्या निधनानंतर आपल्या भावना शब्दबद्ध करताना दिसतो. ‘वृंदावनातील तुळस जळाली, मागे उरल्या दगडविटा’, तर स्वतःबद्दलच्या भावना हृदयस्पर्शी शब्दात व्यत्त* करताना ते दिसतात. ‘शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतची होता । फुले त्यावरी उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतची होता ।’
या लोककवीचे दि. ७ मे १९९१ ला निधन झाले.

मनमोहन नातू यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

लोककवी मनमोहन नातू (8-May-2017)

लोककवी मनमोहन नातू (1-Jun-2019)