पुणे जिल्हा

पुणे ही महाराष्ट्रची संस्कृतीक राजधानी व ऑक्सफर्ड ऑफ इस्ट अर्थात शिक्षणाचे माहेरघर समजली जाते.अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणा-या संत ज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणा-या संत तुकारामांची, पुणे जिल्हा ही जन्म व कर्मभूमी होती.दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारक-यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.

शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणा-या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे.ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.

पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हटले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे.