वैती, अशोक

ठाणे महापालिकेचे माजी महापौर अशोक वैती यांच्या दमदार व खमक्या राजकीय नेतृत्वामुळे त्यांच्या कार्यकाळात ठाण्याचा झपाट्याने विकास झाला.

महापौरपदी विराजमान झाल्यानंतर, या शहराचा आधुनिक व अद्ययावत पायाभुत सुविधांनी चौफेर विकास करण्याचा विडा उचललेल्या वैती यांनी एकामागोमाग एक अशा कल्पक व कलात्मक योजना आखून व सर्वसामान्य चाकरदार जनतेला अग्रस्थानी ठेवून या शहराचा चेहरामोहराच बदलवून टाकला. चांगले रस्ते व पदपथ, सायकल ट्रॅकची आदर्श रचना, आरोग्य सेवेच्या प्रगत सुविधा, उच्चस्तरीय शिक्षण व मुबलक पाणी पुरवठा या मुलभूत घटकांना पुरेसा न्याय देणारा शास्त्रशुध्द विकास आराखडा त्यांच्या अधिपत्याखाली साकारला गेल्याने, हे शहर वेगाने आता एका सस्टेनेबल विकासाचे उत्कृष्ठ असे द्योतक ठरत चालले आहे.

हरित विकास प्रकल्प, हरित जनपथ प्रकल्प अशा पर्यावरणीय समतोलाशी आपलं नातं सांगणार्‍या प्रकल्पांच्या सामावेशामुळे, हा आराखडा पर्यावरणाशी सौहार्दपुर्ण संबंध प्रस्थापित करेल याची वैती यांनी पुरेशी दक्षता घेतली. त्यामुळे पर्यावरणमित्रांकडून देखील या उपक्रमाला हिरवा कंदिल मिळालेला.

घनकचर्‍याचे शास्त्रोक्त पध्दतींनी विघटन करण्याकरिता बायोमिटोनायझेशन प्रकल्प, घरोघरी कचरा संकलन, तसेच सामाजिक पायाभुत सुविधांअंतर्गत प्रभाग कार्यालये बांधणे, भाजी मंडया उभारणे, मिनी स्टेडियमच्या रचना साकारणे, क्रिडा संकुलांची उभारणी करणे अशा अनेक सार्वजनिक बांधकाम योजनांमुळे ठाणेकरांना दिलासा मिळाला. या सर्व योजनांची आखणी व त्यांच्या समर्थ अंमलबजावणीचे श्रेय अर्थात अशोक वैती यांना जाते. त्यांनी ठाणे शहरातील रस्ते वाहतुकीच्या विकासासाठी दिलेले योगदानदेखील केवळ अतुलनीय असेच म्हणावे लागेल. रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, पुलांचे रूंदीकरण, नव्या उड्डाणपुलांची रचना व या शहरातील अतिशय निकडीच्या बनत चाललेल्या अशा पार्किंग सुविधेच्या प्रश्नाचा निकाल लावण्याकरिता त्यांनी केलेली, विविध महापालिका वाहन तळांची निर्मिती, त्यांच्या दुरदृष्टीची व सामाजिक तळमळीची साक्ष देते. महापालिकेतर्फे मोक्यांच्या जागांवर ट्रक टर्मिनसची बांधणी, ही योजना देखील त्यांनीच लढवलेल्या एका कल्पक शक्कलीची परिणीती आहे.

केंद्र शासनाच्या उर्जा मंत्रालयाच्या अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ठाणे शहराची निवड सौर शहरांच्या यादीमध्ये झाल्यामुळे येथे सौर उर्जेवर चालणार्‍या अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांची नांदी झाली. अशा प्रकल्पांना आर्थिक पाठबळ देण्यामध्ये मोलाची भुमिका त्यांनी बजावली आहे. तसेच ठाण्यामधील ऐतिहासिक अशा मासुंदा तलावावर लेझर शोची अभिनव रचना साकारण्यामागेदेखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

क्रीडा क्षेत्रातील हिरे पारखून त्यांना विनामुल्य प्रशिक्षण शिबीरे, व तज्ज्ञ प्रशिक्षकांचा सहवास लाभण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अगदी वाखाणण्याजोगे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*