साहित्य: ८ ब्रेड स्लाईस, दिड कप बटाट्याची तिखट भाजी (३ ते ४ मध्यम बटाटे), १ कप बेसन, २ टेस्पून तांदूळ पिठ, १ कप पाणी, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून जिरे, चिमुटभर खायचा सोडा, चवीपुरते मिठ, तळण्यासाठी तेल.
कृती: बटाटे शिजवल्यावर लगेचच भाजी बनवावी म्हणजे बटाटे चांगल्याप्रकारे मॅश होतात आणि गुठळ्या राहात नाही. बटाट्याची भाजी जरा तिखट असावी नाहीतर भजी तळल्यावर तिखटपणा कमी लागतो. वाडग्यात बेसन आणि तांदूळ पिठ एकत्र मिक्स करावे त्यात पाणी घालून पिठ भिजवावे. हे पिठ पातळही नसावे आणि एकदम घट्ट सुद्धा नसावे. त्यात हळद, खायचा सोडा आणि चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे. ब्रेड स्लाईसच्या कडा काढून टाकाव्यात. एक ब्रेडचा स्लाईस घेऊन त्यावर २ ते ३ चमचे भाजी एकसमान पसरवावी. त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवावा. सुरीने आवडीनुसार कापून तुकडे करावेत. प्रत्येक तुकड्यावर पावाच्या दोन्ही बाजूंवर ३ ते ४ थेंब पाणी शिंपडून हलकेच प्रेस करावे. तळण्यासाठी तेल गरम करत ठेवावे. बटाटा भाजी घातलेले पावाचे तुकडे भिजवलेल्या पिठात घोळवून मिडीयम हाय गॅसवर गोल्डन रंगावर तळून घ्यावेत. सर्व्ह करताना पुदीना चटणी, चिंचेची चटणी, किंवा टोमॅटो केचपबरोबर द्यावे. ज्यांना एक्स्ट्रा स्पाईसी खायला आवडत असेल त्यांनी शेजवान सॉसबरोबर हे पकोडे ट्राय करून पाहावेत.
Leave a Reply