ढोकळा

साहित्य: १ कप बेसन, ३ टेस्पून रवा, १/२ कप दही, फेटलेले, १/२ कप पाणी (कदाचित १/४ कप पाणी जास्त लागू शकेल), १/२ टीस्पून किसलेले आले, १/२ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, चिमटीभर सायट्रिक आम्ल (टीप २), चवीपुरते मीठ, १/२ टीस्पून बेकिंग सोडा, फोडणी आणि साखर-लिंबाचे पाणी, २ टीस्पून तेल, १/२ टीस्पून मोहोरी, १/४ टीस्पून हळद, १/८ टीस्पून हिंग, २ टेस्पून साखर, १/४ कप पाणी, १ लिंबाचा रस.

कृती: एक खोलगट मध्यम आकाराचे बोल घ्यावे. त्यात पाणी आणि दही घालून मिक्स करावे. बेसन आणि रवा घालून गुठळी न होता मिक्स करावे. दाटसर मिश्रण बनवावे. (कंसीस्टन्सी वडे-भाजीच्या पिठापेक्षा थोडे दाट हवे.) हे भांडे झाकून उबदार ठिकाणी ठेवावे. मिश्रण किमान १० ते १२ तास आंबू द्यावे.(थंडीमध्ये पीठ आंबायला जास्त वेळ लागतो. माझ्याघरी पीठ आंबायला साधारण २० तास लागले.) पीठ आंबले कि त्यात किसलेले आले, मिरची पेस्ट, मीठ आणि चिमटीभर सायट्रिक आम्ल घालावे. मिक्स करावे. ढोकळा वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी गरम करावे. पाण्याची पातळी तळापासून २ इंच ठेवावी. ढोकळा प्लेट्सना आतून आणि कडेला तेलाचा हात लावून घ्यावा. पाणी उकळायला लागले कि ढोकळा मिश्रणात बेकिंग सोडा घालावा आणि ढवळावे. मिश्रण फसफसेल. लगेच मिश्रण ग्रीस केलेल्या प्लेट्समध्ये घालावे. ढोकळा स्टॅंड स्टीमरमध्ये ठेवावा. झाकण लावून मोठ्या आचेवर १० ते १२ मिनिटे स्टीम करावा.
गॅस बंद करून  ७ ते ८ मिनिटे कुकरची वाफ जिरू द्यावी. कुकर उघडून ढोकळा थोडा गार होईस्तोवर ठेवावा. कडेने सुरी फिरवून घ्यावी. आणि अलगद ढोकळा थाळीमध्ये काढावा. लहान कढले घ्यावे. त्यात तेल गरम करून मोहोरी, हिंग आणि हळद घालून फोडणी करावी. हि फोडणी एका मध्यम वाटीत काढून ठेवावी. त्यात १/४ कप पाणी, लिंबू रस, आणि साखर घालून मिक्स करावे. थोडे मीठही घालावे. मिश्रण थोडे गोड झाले पाहिजे. त्यानुसार वाटल्यास थोडी साखर घालावी. ढोकळा गार झाला कि त्यावर फोडणीचे साखर-लिंबाचे पाणी घालावे. हे पाणी ढोकळ्यात काही मिनिटे मुरू द्यावे. ढोकळ्यावर चिरलेली कोथिंबीर आणि ताजा खोवलेला नारळ घालून सजवावे. ढोकळा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*