संत नानामहाराज – श्रीगोंदेकर

Sant Nanamaharaj - Shrigondekar

 

जन्म : १० सप्टेंबर १८७६, मृत्यू : २० जुलै १९५२
श्री नानामहाराज यांचे मूळ नाव नारायण बळवंत नाचणे. त्यांचा जन्म मरूड-जंजिरा येथे झाला. श्री गणपती हे त्यांचे उपास्यदैवत होते.

आई वडिलांच्या मृत्यूनंतर ते व त्यांचे बंधू मुंबईस आले. त्यांचे बंधू काही कालाने मृत्यू पावले. त्यामुळे विरक्ती उत्पन्न होऊन नारायणराव परमार्थाकडे वळले. पुणे येथे त्यांची व श्रीकृष्णानंद महाराज श्री गोंदेकर महाराज यांची भेट घेऊन नारायणराव यांनी त्यांचे शिष्यत्व स्विकारले. तेव्हांपासून श्रीकृष्णानंदांबरोबर राहून ते त्यांची सेवा करु लागले. ज्ञानेश्वरीवर प्रवचन करण्यात श्रीकृष्णानंदांची विशेष ख्याती होती. त्यांच्याकडून नारायणराव यांनी ज्ञानेश्वरीचे धडे घेतले. त्या काळात संस्कृतचे अध्ययन चालू ठेवले. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ते शिंपीकाम करत. त्यांना ज्योतिषशास्त्राचेही ज्ञान होते.

श्री कृष्णानंदांच्या निर्वाणानंतर श्री नानामहाराज हेच त्यांचे आध्यात्मिक वारस झाले. ज्या चां.का.प्रभू ज्ञातीत आपला जन्म झाला, त्या ज्ञातीकरता काहीतरी करावे या कर्तव्यबुद्धीने त्यांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर प्रवास करुन, सधन व सामान्य माणसांना भेटून ज्ञतीकरता फंड उभा करण्याचे कार्य केले. ज्ञतीतील गरीब विद्यार्थ्यांस जीवनोपयोगी शिक्षण देऊन त्यांस सज्ञान व समर्थ करण्यासाठी त्या फंडाचा विनियोग करावा अशी त्यांची इच्छा; पण ती ताबडतोब फलद्रूप झाली नाही. कालांतराने त्या फंडातून ज्ञतीतील मुलांना उच्च शिक्षणासाठी मदत देणारी अशी संस्था काढण्यात आली.

त्यानंतर कठोर परिश्रम घेऊन त्यांनी ३५० एकर शेती घेऊन विठ्ठल नगर, जि. पुणे येथे “श्रीकृष्णानंद राममारूती विद्याश्रम” ही संस्था स्थापन केली. या संस्थेमुळे बर्‍याच अनाथ मुलांच्या मोफत शिक्षणाची व अन्नवस्त्राची सोय झाली. ज्ञातीच्या दुर्दैवाने १९४२ सालापासून हे कार्य स्थगित करावे लागले. ही संस्था स्थापन करण्यात नानामहाराज यांचे शिक्षणविषयक अद्ययावत विचार दिसून येतात. शिक्षणाची जीवनापासून फारकत हा हल्लीच्या शिक्षणाचा दोष, विठ्ठलनगर येथील आश्रमीय शिक्षणपद्धतीत दिसून येत नसे. समाजसेवक श्री. द्वारकानाथ वैद्य हे श्री. नानामहाराजांचे चाहते. त्यांनी काढलेल्या विठ्ठलनगर येथील स्कूलकरता घरातून बाळासाहेबांनी पेटीभर भांडी संस्थेस दिली. इतकेच नव्हे तर त्या शाळेत प्रथम मुले हवीत म्हणून आपले दोन चिरंजीव चंद्रकांत व मनोहर यांनाही त्यांनी त्या शाळेत घातले.

प्रसिद्ध कामगार पुढारी श्री. सूर्यकांत वढावकर, ठाणे, आणि इतर ज्ञातिबंधूंनी ह्या संस्थेचे पुनरूज्जीवन करण्यात पुढाकार घेतला आहे. सर्व ३५० एकर शेती संस्थेने घेऊन परत शेती व्यवसाय सुरू केला आहे. महाराजांचा पुतळाही तयार करून झाला आहे. महाराजांचे कार्य ज्ञतिबांधवांनी पुढे चालू ठेवले आहे.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*