राजदत्त

राजदत्त – सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी चित्रपट माध्यमाचा विलक्षण सर्जनशीलतेने वापर करणारे ‘दिग्दर्शक’ व्यक्तिमत्त्व. राजदत्त यांचा जन्म २१ जानेवारी १९३२ रोजी झाला.

या व्यक्तिमत्त्वाने ‘चित्रपट’ दिग्दर्शनाला श्रेष्ठतम मूल्य प्राप्त करून दिले, असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

आपल्याला परिचित असणारे राजदत्त चित्रपटसृष्टीत ‘दत्ताजी’ या नावाने ओळखले जातात. पण त्यांचे पाळण्यातले नाव ‘दत्तात्रेय’. विदर्भातील धामणगाव या लहानशा गावात जन्मलेल्या दत्तात्रेय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त यांच्या आईचे नाव प्रभावती. वडील अंबादास मायाळू रेल्वेत नोकरी करत असल्यामुळे लहानग्या दत्ताजींचे शालेय शिक्षण अनेक गावांतून पार पडले.

महाविद्यालयात असतानाच त्यांनी नाटके, मेळे यांच्यामध्ये आवड म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती, तेव्हा पुढे आपण या क्षेत्रात आपली कारकीर्द घडवू, अशी पुसटशी कल्पनाही त्यांना आली नाही. शालेय जीवनापासूनच ग.त्र्यं. माडखोलकर यांच्यामुळे पत्रकारितेशी जवळून परिचय आलेल्या दत्ताजींनी महाविद्यालयीन शिक्षण संपताच पुण्यातील दैनिक भारतमध्ये नोकरी करण्यास प्रारंभ केला.

चित्रीकरणादरम्यान निर्माण झालेल्या जिव्हाळ्यातून चित्रीकरण संपताच राजाभाऊ व दत्ताजी दोघेही एकत्रच पुण्यात दाखल झाले आणि राजाभाऊंनी ‘जगाच्या पाठीवर’(१९६०) या चित्रपटात साहाय्यक दिग्दर्शक म्हणून दत्ताजींना संधी दिली.

स्वभावात मुळातच असणाऱ्या चिकित्सक वृत्तीने दत्ताजींनी या क्षेत्राकडे पाहण्यास सुरुवात केली व त्यातील सूक्ष्मातिसूक्ष्म बारकावे हेरले व ते आत्मसात केले. हे बारकावे आत्मसात करताना त्यांनी केवळ अंधानुकरण न करता ‘दिग्दर्शन’ या क्षेत्राविषयी स्वत:च स्वत:ची दृष्टी घडवली.

सामाजिक बांधिलकी जपणे हा राजदत्त यांच्या दिग्दर्शनाचा गाभा आहे. सामाजिक प्रवृत्तीवर प्रहार करण्यासाठी ते चित्रपट माध्यमाचा यथोचित वापर करतात, त्यामुळेच २१ व्या शतकातही हुंडा पद्धती आपल्याकडे कालबाह्य ठरत नाही या भानातून त्यांनी ‘हेच माझे माहेर’ (१९८३) हा चित्रपट दिग्दर्शित केला.

राहण्या-वागण्या-बोलण्यातील साधेपणा, समाजात घडणाऱ्या व सामान्य माणूस म्हणून दुखवणाऱ्या, तरी तारतम्य भावाने विचार करायला लावणाऱ्या घटना सूक्ष्म निरीक्षणांद्वारे शोधणे, त्या घटनांना अभिव्यक्त करतील अशा कथानकांचा शोध घेणे, आपल्या दिग्दर्शीय दृष्टिकोनातून त्या लालित्यपूर्ण पण सामाजिक आशय संप्रेषित करणाऱ्या बनवणे व त्या प्रेक्षकांसमोर ठेवणे अशी अनेक पातळीवरची कसरत राजदत्त यांनी आपल्या कारकिर्दीत सातत्याने व यशस्वीपणे केलेली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*