पुरुषोत्तम दारव्हेकर

प्रथितयश नाटककार, दिग्दर्शक, एकांकिकाकार असलेले पुरुषोत्तम व्यंकटेश दारव्हेकर हे नाटयक्षेत्रातले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व. १ जून १९२६ रोजी दारव्हेकरांचा जन्म झाला. एम.ए. एल. एल. बी. आणि बी. टी. इ. पदव्या प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही काळ हडस हायस्कूल, सुळे हायस्कूल इत्यादी ठिकाणी अध्यापनाचे कार्य केले. त्यानंतर मात्र १९५४ ते ६० या काळात त्यांनी नागपूर आकाशवाणी केंद्रावर विविध पदे भूषविली. सुरुवातीला त्यांनी स्क्रिप्ट रायटर म्हणून काम बघितले. त्यानंतर आकाशवाणीच्या असिस्टंट प्रोडयूसर या पदावर ते होते. दारव्हेकरांना लहानपणापासून नाटकाचे अतिशय वेड होते. त्यामुळे लहानमुलांसाठी १९५० मध्ये त्यांनी नागपूर येथे रंजन कला मंदिर‘ ही संस्था स्थापन केली. या संस्थेसाठी ते लहानमुलांसाठी स्वतः नाटकं लिहीत असत.

‘झिमझिम‘ ‘उपाशी राक्षस, कोरा कागद‘ ही त्यांची बालनाटय त्यांनी बर्‍याच एकांकिका सुध्दा लिहिल्या. त्यापैकी १९६४ मध्ये लिहिलेली ‘अबोल झाली सतार‘ ही एकांकिका अतिशय गाजली. ‘कल्पनेचा खेळ‘ व इतर एकांकिका यांचेही लेखन त्यांनीच केले होते. त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी लिहिलेल्या बर्‍याच नाटकांचे पदार्पण झाले. त्यापैकी ‘चंद्र नभीचा ढळला‘, ‘वर्‍हाडी माणूस‘ पृथ्वी गोल आहे, अष्टपैलू अग्रणी, नयन तुझे जादूगार, घनश्याम नयनी आला‘ आणि कटयार काळजात घुसली‘ ही त्यांची गाजलेली नाटके. त्यांनी एकंदर अकरा नाटके लिहिली. त्यांचे कटयार काळजात घुसली‘ हे संगीत नाटक त्यातील नाटयगीतांमुळे खूपच गाजले आणि एकंदरच नाटककार म्हणून ‘दारव्हेकर श्रेष्ठच होते. पंरतु लोकांना जास्त भावले ते दिग्दर्शक पुरुषोत्तम दरव्हेकर यांची पावती म्हणजे वसंत कानेटकरांचे ‘अश्रूंची झाली फुले‘ हे नाटक त्यांनी दिग्दर्शित केले आणि कायम लोकांच्या स्मरणात राहिले. त्यांनंतर वि. वा. शिरवाडकर यांचे ‘नटसम्राट‘ हे नाटक नाटयसंपदातर्फे रंगभूमीवर आले या नाटकाचे दिग्दर्शनसुध्दा पुरुषोत्तम दारव्हेकर यांनीच केले होते.

नटसम्राट‘ हे नाटक रंगभूमीवर उभं राहण्यासाठी सर्व दृष्टीकोनातून अवघड होते. परंतु हे शिवधनुष्य दारव्हेकरांनी पेलले आणि ते प्रभावीपणे यशस्वी ठरले. नाटयक्षेत्रातील तंत्रांची दारव्हेकरांची जाण ही वाखाणण्यासारखी होती. संगीत, नाटय आणि काव्य हे त्यांच्या नाटकातून अतिशय चपखलपणे बसविले असे रंगभूमीचे नेपथ्य, अभिनय, संगीत प्रकाशयोजना इत्यादी अंग खास दारव्हेकर पध्दतीने रंगभूमीवर उमलत असत. त्यामुळे त्यांनी दिग्दर्शित केलेले नाटक सर्वांगाने प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत असे.

अशा या दिग्दर्शक आणि समृध्द नाटय लेखकाचे २० सप्टेंबर १९९९ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*