मारुती माने

गोष्ट आहे, ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातली. आजच्यासारखी प्रसारमाध्यमे तेव्हा फोफावलेली नव्हती. अशा काळात सांगली शहरानजीकच्या कवठेपिरान या अस्सल खेडेगावातील मारुती माने या युवकाने कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च असा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावला आणि तो महाराष्ट्रात टारझन व रॉबिनहूडसारखा दंतकथेचा विषय बनला. त्यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९२७ रोजी सांगली जवळच्या कवठेपिरान (ता. मिरज) या छोट्याशा गावात झाला. त्या काळात रेडिओ व वृत्तपत्रे ही दोनच बातम्यांची माध्यमे होती. वृत्तपत्रांच्या छपाईत आजच्यासारखी आधुनिकता नव्हती. एखाद्याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यासाठी त्या छायाचित्रावरून ब्लॉक बनवावा लागत असे.

मारुती माने अल्पावधीत देशातील कानाकोपऱ्यात पोहोचले. प्रत्येक मराठी माणसाची मान ताठ व्हावी, असा पराक्रम त्यांनी केला होता. मारुती माने ‘हिंदकेसरी’ झाल्यानंतर पाच ते दहा वर्षे ग्रामीण व निमशहरी भागात पहिलवान बनण्याची लाटच आली होती. एखाद्या गावी ते गेले, तर त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत असे. कोणालाही हेवा वाटेल, असे वलय मारुती माने या नावाभोवती निर्माण झाले होते. खेडेगावात एखादा तरुण मुलगा तालमीत जाऊ लागल्यानंतर दोन-चार महिन्यांनी छाती पुढे काढून चालू लागत असे. त्यावेळी गावातील बुजुर्ग त्याला बोलावून ‘मारुती माने लागून गेलास काय लेका’ असे म्हणायचे. कारण या दंतकथेला शोभेल अशी शरीरयष्टी मारुती माने यांनी संपादन केली होती.

बलदंड देह आणि भरपूर उंची अशा व्यक्तिमत्त्वाचे मारुती माने त्या काळातील पहिलवानांचे आदर्श बनले नसते तरच नवल! क्रीडा, सांस्कृतिक, साहित्य आणि कला क्षेत्रात महाराष्ट्राची ध्वजा फडकविणाऱ्या अनेक मंडळींमध्ये मारुती माने यांचा समावेश केला गेला पाहिजे. मारुती माने मल्ल म्हणून जेवढे श्रेष्ठ होते, तेवढेच माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते. कोणतेही आडवळण त्यांच्या स्वभावात नव्हते. मात्र आता भारतीय आणि विशेषत: महाराष्ट्रीय कुस्ती क्षेत्रातील मारुती माने यांच्या निधनाने एक महान पर्व संपले आहे.

सहा फूट दोन इंच उंची, वर्ण गोरा व सुमारे ११० किलो वजनाची भरदार शरीरयष्टी लाभल्याने मारुती माने यांना ‘वज्रदेही मल्ल’ म्हणून ओळखले जायचे. महाराष्ट्रात अनेक दिग्गज मल्ल लाल मातीतील कुस्तीत इतिहास रचत असताना मारुती माने यांनी तत्कालीन बहुतांशी मल्लांना अस्मान दाखवून या इतिहासात आपले नाव सोनेरी अक्षरांनी कोरले. पश्चिम महाराष्ट्रातील गल्लीबोळात तेव्हा शड्डूचे आवाज घुमायचे. कमरेला लुंगी व अंगात झब्बा घालून मल्लांचे तांडेच्या तांडे गावोगावी दिसायचे.

विष्णुपंत सावर्डेकर-पाटील, गणपत आंदळकर व पहिले ‘हिंदकेसरी’ श्रीपती खंचनाळे यांसारख्या दिग्गज मल्लांच्या पंक्तीत मारुती माने यांचे नाव १९६२ च्या सुमारास दाखल झाले. १९६४ ला मेहेरदीन याला पराभूत करून ‘हिंदकेसरी’ किताब पटकावलेल्या मारुती माने यांनी त्यानंतरच्या दशकात अनेक दिग्गजांशी कुस्त्या केल्या. त्यात मास्टर चंदगीराम, सादिक पंजाबी, विष्णुपंत सावर्डेकर-पाटील आणि बसलिंग करजगी आदींचा समावेश होता. सांगली येथील सरकारी तालमीत दररोज अडीच ते तीन हजार जोर व तीन हजार बैठका असा भीमकाय व्यायाम करणाऱ्या मारुती माने यांची शरीरयष्टी विलक्षण होती. सुरुवातीच्या काळात केवळ नारळ स्वीकारून कुस्ती करणारे मारुती माने १९६० ते ७० या दशकात सर्वाधिक मानधन घेणारे मल्ल ठरले होते.

एकेकाळी कोल्हापूर जिल्हय़ाचा कुस्ती क्षेत्रावर असलेला दबदबा कमी करीत मारुती माने यांनी सांगलीचे नाव उज्ज्वल केले होते. सुमारे आठ वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर संगणक पदविकेचे शिक्षण घेतलेल्या; परंतु त्यांच्या कुस्ती क्षेत्रावर फिदा असलेल्या एका युवतीशी त्यांनी विवाह केला होता. हा विवाह करताना सर्व सहकारी व नातेवाइकांशी त्यांनी दीर्घ काळ चर्चा केली होती. आपल्याकडे बघायला आपल्या हक्काचा माणूस असावा, असा विचार त्यांनी या विवाहावेळी केला होता. कुस्ती क्षेत्राप्रमाणेच त्यांना संगीताचीही आवड होती. ते बासरीवादनही सुरेख करायचे. त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

मारुती माने यांचे २७ जुलै २०१० रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*