चंद्रकांत कामत

संगीतातील लय ही एक अत्यंत प्रतिभावान संकल्पना आहे. स्वरांना लयीच्या आकृतीमध्ये बांधून ठेवण्याची ही कल्पना ज्या कुणाला सुचली, त्याचे या पृथ्वीवरील समस्त मानवजातीवर अनंत उपकार आहेत. संगीताला या लयीमुळे एक प्रकारचा चुस्तपणा, बंदिस्तपणा आला. या बांधीव मांडणीमुळे संगीताच्या सौंदर्याच्या कल्पनेतही बदल झाले. मैफलीत कोणत्याही गायक वा वादकाबरोबर तबल्याची संगत करणाऱ्या वादकाला मुळात गाणे कळणे अत्यंत आवश्यक असते.

गाणे कळणे आणि त्यावर नितांत प्रेम करणे हे गुणधर्म असलेला तबलावादकच कलावंताला अप्रतिम साथ करू शकतो. आयुष्यभर अनेक दिग्गजांबरोबर अशी लयीची संगत करणारे पंडित चंद्रकांत कामत यांचे निधन म्हणजे एका लयदार व्यक्तिमत्त्वाची अखेर आहे. अतिशय शांत आणि कमी बोलणारे कामत जेव्हा तबला आणि डग्ग्यासमोर बसायचे, तेव्हा त्यांना ब्रह्मांडाचाच साक्षात्कार होत असला पाहिजे. तबला आणि डग्गा या दोन वाद्यांमधून येणाऱ्या वेगवेगळय़ा ध्वनींचा एकरूपतेने आविष्कार करणाऱ्या तबलानवाजांची एक परंपराच भारतीय संगीतात आहे.

चंद्रकांत कामत हे स्वत: उत्तम तबलावादक असले तरीही त्यांनी आपले सारे कलाआयुष्य तबल्यावर साथसंगत करण्यात घालवले. कलावंताबरोबर साथ करणे ही काही केवळ तांत्रिक आणि यांत्रिक गोष्ट नसते. प्रत्येक कलावंताची प्रतिभा वेगळी, त्याची मांडणी वेगळी, स्वभावाचे कंगोरे वेगळे आणि प्रत्यक्ष मैफलीत त्याला फुटणारे निर्मितीचे धुमारेही वेगळे! या सगळय़ाची जाणीव ठेवून साथ करणारा कलाकार हा तेवढय़ाच उंचीचा असतो. पंडित चंद्रकांत कामत यांनी ती उंची गाठली होती. पंडित भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गजाबरोबर अनेक वर्षे साथ करण्याचे भाग्य त्यांना लाभले. गायक आणि संगतकार यांच्यात अद्वैत निर्माण झाल्याशिवाय गाणे खुलत नाही.भीमसेनजींच्या अनेक अजरामर मैफलींमध्ये हे अद्वैत हजारो रसिकांनी अनुभवले आहे.

भारतातील अनेक मोठय़ा कलावंतांबरोबर तबल्यावर साथ करण्याची संधी कामतांना मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले. तबल्यावर लय धरताना कलावंताचा मूड समजून घेणे आवश्यक असते. कलावंताला नवे काही सुचण्यासाठी साथीदार तयारीचा असावा लागतो. केवळ लय पकडून ठेवली म्हणजे गाणे रंगते असे होत नाही. कलावंताला त्या स्वरांमध्ये चिंबवण्यासाठी लयीचे कोंदण मिळवून देणे तेवढेच महत्त्वाचे असते. कामतांच्या तबलावादनात या सगळय़ा गोष्टी होत्या. आजकाल मैफलीत साथ करणारे वादक काहीवेळा आगाऊपणा करतात. कलावंतापेक्षा आपणच काकणभर सरस कसे आहोत, ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. तसा सोस कामत यांनी कधी केला नाही. त्यामुळेच भावगीतापासून ते अभिजात शास्त्रीय संगीतापर्यंत सगळय़ा संगीत प्रकारात त्यांनी आपली मुद्रा उमटवली.

लहानपणी वडील आणि गायकनट मास्टर शांताराम कामत यांच्याबरोबर त्यांनी बालनट म्हणून काम करायला सुरुवात केली तरी त्याच वयात तबला शिकण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली. नाटक कंपनी बंद पडल्यामुळे कामत पुण्यात आले आणि त्यांनी कथक कलाकार रोहिणी भाटे यांना तबल्याची साथसंगत करण्यास सुरुवात केली. भाटे यांना तब्बल पंधरा वर्षे त्यांनी तबलासंगत केली. याच काळात आकाशवाणीमध्ये तबलावादक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि सुमारे पस्तीस वर्षे आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक श्रेष्ठ कलाकारांबरोबरच नव्या कलाकारांनाही संगत करण्याचे काम त्यांनी केले. या काळात जी. एल. सामंत यांच्यासारख्या कसलेल्या गुरूकडून आणि सामताप्रसाद यांच्यासारख्या दिग्गजाकडून तबलावादनातील अनेक नवे धडे घेण्यात कामत यांना जराही कमीपणा वाटला नाही. सवाई गंधर्व संगीत महोत्सवामधील त्यांची हजेरी कलावंत आणि रसिक या दोघांसाठीही आश्वासक असे. त्यांच्या कलाजीवनात त्यांना ‘संगतकार पुरस्कार’, ‘स्व. वसुंधरा पंडित पुरस्कार’ तर मिळालेच, पण पुणे महापालिकेकडून गौरव करण्यात आला. भरत आणि सुभाष या त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचा हा कलेचा वारसा सुरू ठेवला आहे, हे कलावंतासाठी भाग्याचेच म्हटले पाहिजे.

चंद्रकांत कामत यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत (11-Jul-2017)

ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत (26-Nov-2018)

VV

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*