डॉ. जगदीश सामंत

कुष्ठरोगाचं निर्मूलन व्हावं, कुष्ठरोग्याला समाजात मानाचं स्थान मिळावं ही महात्मा गांधींची इच्छा होती. डॉ. सामंत यांनी गांधीजींचा हा संदेश आपल्या कामात उतरवला. त्यांच्या कामाचा भारतीयांना गर्व असेल,’ हे उद्गार आहेत, भारताचे उपराष्ट्रपती अन्सारी यांचे. डॉ. जगदीश सामंत यांना मानाच्या अशा, ‘ गांधी इंटरनॅशनल अवॉर्ड ‘ ने गौरवण्यात आलं आहे.

डॉक्टरांना अनेक किताब मिळाले असले, तरी त्यांची वाटचाल सोपी नव्हती. आगशीच्या शाळेत जाणाऱ्या जगदीश यांनी वर्गातला पहिला नंबर कधीच सोडला नाही. पण, त्या गावातही अभ्यासाला पोषक वातावरण नव्हतं. १९६५ मध्येही गावात वीज नव्हती. पण कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करणं ही डॉक्टरांसाठी कधीच अडचण नव्हती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ते शिकत होते. अभ्यासासोबत त्यांनी क्रिकेटमधली रुचीही जपली होती. ते उत्तम फलंदाज होते. पण मेडिकलला गेल्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला वैद्यकीय सेवेसाठी संपूर्णपणे वाहून घेतलं. एमबीबीएसला प्रवेश घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी पुढे मोठे होण्याचे स्वप्न पाहण्यात रंगलेला असतो, तेव्हा सामंत यांनी रुग्णसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं.

एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच, त्यांनी गरिबांवर मोफत उपचार करण्यास सुरुवात केली. याचं सर्व श्रेय ते आपल्या आईला देतात. त्यांनी कुष्ठरोग्यांना नुसतं बरं केलं नाही, तर त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसनही केलं. गरिबांमध्ये असलेलं कुष्ठरोगाचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन १९७० च्या दशकात त्यांनी अधिक नेटानं कामास सुरुवात केली. त्यांच्या कामाचा झपाटा वाढला. खेडोपाड्यातून रोज ६०-७० रुग्ण तपासणीसाठी येत. पण, डॉक्टर सर्वांना मोफत तपासत.

१९७० मध्ये त्यांनी गोरेगावात दवाखाना उघडला. त्यानंतर अर्नाळ्यात दवाखाना उघडण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले. त्यावेळी लोकांनी आपणहून दोनेक लाख जमा केले आणि त्यांच्या या प्रयत्नातून तिथेही एक दवाखाना उभारला गेला. लोकांची श्रद्धा कामी आली. पुढे अर्नाळा इथे ‘ अर्नाळा मेडिकल ट्रस्ट ‘ चीही स्थापना करून हॉस्पिटल बांधण्यात आलं. तिथे २५ टक्के मोफत औषधोपचार केले जातात. तसंच ३५ टक्के ‘ ना नफा तत्त्वा ‘ वर तर इतरवेळी ५० टक्के फी आकारून उपचार केले जातात.

त्यांच्या कामाची दखल घेऊन १९७३ साली त्यांना सरकारने वालीव इथे ३३ एकर जमीन देऊ केली. यावर त्यांनी ‘ लोकनायक जयप्रकाश नारायण लेप्रसी सेंटर ‘ सुरू केलं.

(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)

Dr Jagdish Samant

# MaTa

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*