वंदना सूर्यवंशी

अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘स्पेस फाउंडेशन’च्या एका अंतराळ कार्यक्रमात  पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवर एका मराठी शिक्षिकेची, वंदना सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली! प्रत्येक गोष्टीतील नावीन्य टिपणे, दररोज नवे काही शिकणे हा स्वभावधर्म व प्रत्येक क्षण नवीन आहे, प्रत्येक क्षणात खूप काही सामावलेले आहे.

तो प्रत्येक क्षण ‘जगणे’ हा एक सोहळा आहे, असा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन! यातूनच वंदना सूर्यवंशी घडत गेल्या. त्या माहेरच्या वंदना अहिरे. लहानपण धुळ्याला गेले. गेली वीस वर्षे त्या पुण्यातील ‘विद्या व्हॅली’ शाळेत जीवशास्त्र व भूशास्त्र हे विषय शिकवतात. शिक्षिका व्हायचे हे लहानपणापासूनच ठरवलेले. अशा एखाद्या अंतराळ कार्यक्रमासाठी निवड होणे हे त्यांनी पाहिलेले एक स्वप्न. ते आज सत्यात उतरले.

त्यांना जून २०११ मध्ये मिळालेली ‘हनिवेल’ कंपनीची शिष्यवृत्ती हा त्यांच्या प्रवासातील टर्निग पॉईंट. त्यानंतर अंतराळ विज्ञानासंबंधी ‘नासा’मध्ये झालेल्या प्रशिक्षणाने त्यांना या विषयाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली. मिळालेल्या नवीन ज्ञानाचा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी छान उपयोग करून देता येईल अशा, अगदी हाडाच्या शिक्षिकेला शोभणाऱ्याच उद्देशाने त्यांनी स्पेस फाउंडेशनच्या इ-स्कूलचे सदस्यत्व घेतले. सध्या निवड झालेल्या या अंतराळ कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तींना प्रवेश मिळत नसल्याचे कळल्यावर त्यांनी अगदी अर्जही पूर्ण भरला नव्हता; पण त्यानंतर स्पेस फाउंडेशनकडूनच त्यांना अर्ज भरण्याची विचारणा झाली आणि तज्ज्ञांच्या निवड समितीकडून त्यांची निवडही झाली.

सतत काहीतरी नवीन शिकण्याचा वंदना सूर्यवंशी यांचा उत्साह कुणा विद्यार्थ्यांला लाजवेल असाच आहे. संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्याची त्यांची वृत्ती आहे; मग वयाने खूप लहान असलेले त्यांचे विद्यार्थीही याला अपवाद नाहीत. यामुळेच शिक्षिका म्हणून एवढा मोठा कार्यकाल पूर्ण केल्यानंतरही त्यांची आपल्या पेशाबद्दलची आत्मीयता, अभिमान टिकून आहे व सध्याच्या ‘टेक्नोसॅव्ही’, ‘अपडेटेड’ विद्यार्थ्यांच्या पुढे एक पाऊल राहण्याचे आव्हान त्यांनी सहज पेलले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*