भालचंद्र नीळकंठ पुरंदरे

स्त्रीरोगतज्ज्ञ भालचंद्र नीळकंठ पुरंदरे यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९११ रोजी मुंबई येथे झाला.

डॉ.भालचंद्र पुरंदरे यांचे वडील डॉ.नीळकंठ अनंत पुरंदरे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ होते व त्यांचे गिरगाव चौपाटीला स्वत:चे रुग्णालय होते. डॉ.भालचंद्र पुरंदरे यांना वैद्यकीय शिक्षणाचे बाळकडू घरातच मिळाले होते. साहजिकच, त्यांचा कल प्रसूती व स्त्री-रोगविज्ञानाकडे होता.

१९३७ साली त्यांना प्रसूति विज्ञान व स्त्री-रोगविज्ञान या विषयांत एम.डी. पदवी मिळाली. १९३९ साली इंग्लंड मधील एडिंबरा येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची एफ.आर.सी.एस. पदवी मिळाली. मुंबईत परत आल्यावर कॉलेज ऑफ फिजिशियन्स व सर्जन यांची अभिछात्रवृत्ती मिळवून ते एफ.सी.पी.एस. झाले. मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात १९४१ ते १९४५ स्त्री-रोगशास्त्र व प्रसूतिशास्त्र या विभागात साहाय्यक सन्माननीय विशेषज्ञ म्हणून त्यांनी काम केले. १९५७ साली त्यांनी त्याच विभागाचे प्रमुख म्हणून काम केले.

१९६९ साली निवृत्त होईपर्यंत ते विभागप्रमुख व संशोधन केंद्र संचालक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जननमार्गासंबंधी अनुप्रयुक्त जीवविज्ञानाच्या एम.डी. व पीएचडी. या पदव्युत्तर परीक्षांच्या अभ्यासाची सोय करण्यात आली. ते वाडिया रुग्णालयाचे प्रमुख अधिकारी होते. याशिवाय बॉम्बे रुग्णालय व पश्चिम रेल्वेचे जगजीवनराम रुग्णालय यांचे सन्माननीय विशेषज्ञही होते.

कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया योनिमार्गे करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. या पद्धतीत फॅलोपियन बीजवाहिनी योनिमार्गे छोट्या छिद्रातून काढायची व ती दुमडून, तिला टाके मारून पुन: पोटात ठेवायची. या पद्धतीमुळे स्त्रीचे रुग्णालयातील वास्तव्य कमी झाले व नंतर मूल हवे असल्यास ते टाके काढून बीजवाहिनी मोकळ्या करू शकतात. याला ‘पुरंदरे तंत्र’ म्हणतात.

डॉ. पुरंदरेंनी कुटुंबनियोजनासाठी विशेष कामगिरी बजावली आहे. गर्भपातविषयक कायद्यासंबंधी नेमलेल्या ‘शांतिलाल शाह समिती’चे ते सभासद होते. डॉ.पुरंदरेंच्या कार्याबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देण्यात आला.

स्त्री-रोगविज्ञान व प्रसूतिविद्या या विषयांवर त्यांचे बरेच संशोधन असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांतून त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झालेले आहेत. ते सहलेखक असलेल्या पुस्तकाच्या दहा आवृत्त्या निघाल्या आहेत. त्यांना संगीतात खूप रस होता व ते उत्तम तबलावादक होते. त्यांचे आत्मचरित्रही प्रकाशित झाले आहे.

डॉ.भालचंद्र नीळकंठ पुरंदरे यांचे निधन १० नोव्हेंबर १९९० रोजी झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*