वाघ ही भारताची राष्ट्रीय संपत्ती आहे. या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने व्याघ्र प्रकल्पाची संकल्पना अमलात आणली. देशात २६ व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात तीन ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत आणि ते विदर्भातच आहेत. यामध्ये मेळघाट, चंद्रपूरचा ताडोबा आणि नागपूरचा पेंच प्रकल्पाचा समावेश आहे. वाघांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी या प्रकल्पात काम केले जाते. पर्यटक मोठ्या संख्येने या प्रकल्पांना भेटी देतात.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प चंद्रपूरच्या वैदर्भीय भूमीवर आहे. १९५५ पासून अस्तित्वात असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि त्यात १९८६ मध्ये समाविष्ट करण्यात आलेले अंधारी अभयारण्य मिळून हा व्याघ्रप्रकल्प तयार झाला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र ६२५.४० चौ.कि.मी.चे असून त्याचे कोअर झोन म्हणजे अतिसंरक्षित क्षेत्र व बफर झोन म्हणजे कोअर सभोवताली असलेले जैविक दबाव सहन करणारे क्षेत्र असे विभाजन करण्यात आले आहे. व्याघ्रप्रकल्पात एकूण ६ गावे आहेत. प्रकल्प क्षेत्रात पाण्याची पुरेशी व्यवस्था असून, त्यात १७ तलाव, ९ ऍनीकट, ३७ नैसर्गिक पाणवठे तसेच ४४ कृत्रिम पाणवठे आहेत.
आज भारतातच नव्हे, तर जगभरात वाघांची प्रजनन भूमी म्हणून हा प्रकल्प प्रसिध्द आहे. बांबूची दाट राजी असलेल्या या जंगलात वाघांची संख्या फार मोठी आहे. या प्रकल्पात तब्बल ७२ वाघ आहेत, तर प्रकल्पाबाहेरील जंगलात ४८ – म्हणजे एकटया चंद्रपूर जिल्ह्यात एक-दोन नव्हे, तर १२० वाघ आहेत. शिवाय येथील प्रत्येक १०० चौरस कि.मी. क्षेत्रात पाच बिबटयांचे वास्तव्य आहे. म्हणूनच अतिशय देखण्या अशा वाघ-बिबटयांचे दर्शन या व्याघ्रप्रकल्पात हमखास होते.
Leave a Reply