जळगाव जिल्हा

पूर्वी खानदेश या नावाने संबोधला जाणारा जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून जळगावचे नाव अग्रस्थानी येते. केळी व तेलबियांसाठी आघाडीवर असलेला हा जिल्हा उद्योगव्यवसाय आणि शिक्षणक्षेत्र या क्षेत्रांमध्येही भरघोस कामगिरी बजावत आहे. प्रसिध्द कवी बालकवी व ज्यांच्या ओव्यांनी संबंध महाराष्ट्राला वेड लावलं त्या बहिणाबाई चौधरी यांचा हा जळगाव जिल्हा. तर महाराष्ट्राच्या भावशक्तीचे प्रतीक असलेला राष्ट्रभक्त व जनतेसाठी अंत:करण पिळून लिहिणारा एकमेवाद्वितीय साहित्यिक असे ज्यांचे वर्णन केले जाते ते साने गुरुजी यांची ही कर्मभूमी.