नाशिक जिल्ह्याचा इतिहास

रामायण काळात जिल्ह्याचा परिसर एक ठळक स्थान होता. कारण वनवासात असताना श्रीराम,लक्ष्मण व सीतामाई हे त्रिकूट या परिसरात निवासाला होते असे मानले जाते. रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापल्याने या शहराला नाशिक असे नाव पडल्याचे (नाक-नासिका-नाशिक या संगतीने) सांगितले जाते.
या भागावर मौर्य व सातवाहन घराण्याची सत्ता असल्याचे दाखले इतिहासात आढळतात. नाशिकच्या सौंदर्यामुळे भुरळ पडलेल्या मोगलांनी नाशिकचे नाव गुलशनाबाद असे ठेवले होते. पुढे पेशव्यांनी मूळचेच नाशिक असे नामकरण केले. नाशिक म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहूती देणार्‍या क्रांतिकारकांचे तीर्थक्षेत्रच होय. येथील विजयानंद थिएटरमध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीचे शारदा हे नाटक पाहण्यास आलेल्या नाशिकच्या तत्कालीन कलेक्टर जॅक्सनचा अनंत कान्हेरे यांनी वध केला. या प्रकरणी अनंत कान्हेरे यांना फाशी (१९ एप्रिल, १९१०) देण्यात आली. कान्हेरे यांच्यासह कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे यांनाही फाशी देण्यात आले. कलेक्टर जॅक्सन, बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासास कारणीभूत होता, तसेच त्याचे जनतेवरील अन्याय वाढत होते. अन्यायाविरुद्ध पेटून उठून या तरुणांनी जॅक्सनचा वध केला. या प्रकरणी नाशिकच्याच शंकर सोमण व वामनराव जोशी यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. वामनराव जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा अंदमानात भोगली. हे सर्व जण केवळ १८ ते २१ वर्षे वयोगटातील तरुण होते. यांनी संपूर्ण भारतातल्या युवकांना प्रेरणा दिली, एक इतिहास घडवला. अंदमानातील सेल्युलर जेल येथे ३०० कैद्यांची यादी आहे. यातील तीन नावे महाराष्ट्रीय नावे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर व वामनराव जोशी! ही तिन्ही नावे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातीलच आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या मैदानी लढायांपैकी एक महत्त्वाची लढाई दिंडोरी येथे झाली. सुरतेच्या यशस्वी मोहिमेवरून परत येत असताना येथे मोगलांनी महाराजांना कोंडीत पकडले. १६७० साली हे युद्ध झाले. यात छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले. मित्रमेळा, अभिनव भारत या संस्थांच्या माध्यमातून स्वा. सावरकरांनी आपल्या कार्याची सुरुवात याच जिल्ह्यातून केली. नाशिकमधील काळाराम मंदिरात तत्कालीन अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३० मध्ये “मंदिर प्रवेश सत्याग्रह” केला. हा सत्याग्रह डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक जीवनातील एक प्रमुख घटना होय. जिल्ह्यातील येवले येथेच एका परिषदेत डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा प्रथम (१९३५) केली होती.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*