नागपूर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र असून अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढल्यामुळे येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे. २००४ साली नागपुरात रु. ५,००० कोटी इतकी गुंतवणूक झाली आहे. नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मालसामान व प्रवासी केंद्राची (मल्टिमॉडेल इंटरनॅशनल हब एरपोर्ट ऍट नागपूर-MIHAN) निर्मिती होत आहे,हा प्रकल्प आग्नेय व मध्य-पूर्व आशियातील सामान-वाहतुकीकरिता महत्त्वाचा थांबा (break of bulk) बनणार आहे. विमाने बनवणा-या जगप्रसिद्ध बोइंग कंपनीने नागपुरात १८.५ कोटी डॉलर भांडवलाचा प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. क्षेत्रफळानुसार बुटिबोरी आशियातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत आहे. मुंबई-ठाणे-पुणे औद्योगिक पट्ट्याची क्षमता जवळजवळ संपल्यामुळे बुटिबोरी वसाहतीत अनेक उद्योग येत आहेत.बुटिबोरीतील सर्वांत महत्त्वाची संस्था म्हणजे इंडो-रामा सिंथेटिक्स आहे तर केईसी, ह्युंदाई, एसीसी निहोन कास्टिंग्ज, अनेक टेक्सटाइल उद्योग, विडियोकॉन हे इतर मुख्य प्रकल्प येथे आहेत. अनेक मध्यम आकाराचे उद्योग व महाराष्ट्रातील पहिले फूड पार्क येथे आहे.

शहरातील पश्चिम भागातील हिंगणा औद्योगिक वसाहतीत जवळजवळ ९०० लहान व मध्यम आकाराचे उद्योग आहेत. महिंद्र आणि महिंद्र, नेको कास्टिंग, बजाज ऑटो ग्रुप, कॅंडिगो, अजंता टुथब्रशेस, सन्विजय ग्रुप, विको लेब्रॉरेटरीज, दिनशा, हल्दीराम हे उद्योग विशेष उल्लेखनीय. शहराचे भौगोलिक स्थान, सोयी-सुविधा, कुशल मनुष्यबळ यामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात पुणे-मुंबई नंतर नागपूरलाच पसंती दिली जाते. नागपुरात १०,००० कोटी रुपये गुंतवणूक असलेले विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*