थालीपीठ

साहित्य: १ कप थालिपीठाची भाजणी, १ कप पाणी, चवीपुरते मिठ, १ टिस्पून लाल तिखट, १/२ टिस्पून जिरे, २ चिमूट हिंग, १/४ टिस्पून हळद, १ टेस्पून तेल, १/४ कप चिरलेली कोथिंबीर, १/२ कप बारीक चिरलेला कांदा, १/४ कप तेल थालिपीठ भाजताना तव्यावर सोडण्यासाठी.

कृती: प्रथम भाजणीची उकड काढून घ्यावी त्यासाठी, १ कप पाणी नॉनस्टिक भांड्यात उकळवण्यास ठेवावे. त्यात तिखट, मिठ, हिंग, हळद, जिरे, १ टेस्पून तेल घालून मिक्स करावे. पाणी उकळले कि गॅस मंद करून पाण्यात भाजणी घालावी आणि लगेच चमच्याने ढवळावे. थोडे मिक्स करून वरती झाकण ठेवून ५ मिनीटे मंद आचेवर वाफ काढावी. गॅस बंद करून वाफ अजून ५ मिनीटे मुरू द्यावे. उकड थोडी कोमट झाली कि पाण्याचा हात लावून मळून घ्यावे. मळतानाच चिरलेला कांदा आणि कोथिंबीर त्यात घालून एकत्र करावे. थोडावेळ झाकून ठेवावे. नंतर ४ ते ५ मध्यम आकाराचे सारखे गोळे करून घ्यावे. जाडसर प्लास्टिकचा तुकडा घ्यावा (२ फुट x १ फुट). लांबड्या बाजूकडून बरोबर अर्धा असा दुमडून घ्यावा. त्याला अगदी थोडा पाण्याचा हात लावावा. मधे १ भाजणीचा गोळा ठेवून वरती अर्धा प्लास्टीकच्या भागाने कव्हर करून लाटावे. कडेला जर भेगा पडत असतील तर बोटांनी जरा आत ढकलून सारख्या करून घ्याव्यात. मध्यम लाटावे. तवा गरम करून तेल घालून त्यावर थालिपीठ घालून मध्यम आचेवर झाकण ठेवून दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्यावे. (प्रत्येक बाजू साधारण २ ते ३ मिनीटे) फक्त दह्याबरोबर किंवा दही-मिरची लोणच्याबरोबर आणि कैरी लोणच्याबरोबर थालिपीठ अप्रतिम लागते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*