नाचणी चे पदार्थ

नाचणी हे सर्वश्रेष्ठ सत्त्वयुक्त धान्य आहे. नाचणीपासून बिस्कीट, लापशी, लाडू, पापड, भाकरी, डोसा, आंबिल, वडी, शेवया असे विविध पदार्थ तयार करता येतात. आरोग्य संवर्धनासाठी रोजच्या आहारात नाचणीच्या पदार्थांचा समावेश आवश्‍यक आहे.

1) नाचणी केक

साहित्य – नाचणी पीठ 200 ग्रॅम, साखर 100 ग्रॅम, लोणी 200 ग्रॅम, अंडी 4, पाणी, थोडे काजू.

कृती – वरील साहित्य वापरून नेहमीच्या केक तयार करण्याच्या पद्धतीने बेकिंग ओव्हनचा वापर करून नाचणीपासून केक तयार करता येईल. तयार केक नाचणीच्या नैसर्गिक चॉकलेटी रंगामुळे आकर्षक दिसतो.

2) नाचणीची बिस्किटे

10-20 टक्के नाचणी पीठ मैद्यात मिसळून त्यापासून बेकिंग ओव्हनमध्ये बिस्किटे तयार करता येतात. नाचणी टाकल्यामुळे बिस्किटांच्या चवीला व रंगाला काहीही फरक न पडता उलट त्यांचा रंग आकर्षक होतो. सध्या बाजारात नाचणीची बिस्किटे मिळतात. ती नेहमीच्या प्रकारच्या बिस्किटांना चांगला पर्याय आहेत.

3) नाचणी बेसन डोसे

साहित्य – नाचणीचे पीठ 2 वाट्या, बेसन 1 वाटी, आलं-लसूण-मिरची पेस्ट, हळद, कोथिंबीर (बारीक चिरून), 2 टोमॅटो (प्युरी करून),
मीठ, तेल.

कृती – तेल वगळून बाकी सगळे साहित्य पाणी घालून एकत्र करावे. डोशाच्या पिठाएवढे पातळ करावे. नॉनस्टिक पॅनवर थोडे तेल टाकून डोसे बनवावेत. चटणी किंवा सॉसबरोबर डोसे खावेत.

4) नाचणीचा डोसा-उत्तप्पा

साहित्य – उडदाची डाळ अर्धी वाटी, नाचणी पीठ दीड वाटी, तांदळाचं पीठ अर्धी वाटी, मेथी दाणे एक चमचा, एक कांदा (बारीक चिरून),
कोथिंबीर, चवीनुसार मीठ, एक चिरलेला टोमॅटो.

कृती – डाळ आणि मेथी दाणे रात्री भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी दोन्हींमधील पाणी काढून मिक्‍सरमधून वाटून घ्यावे. डाळ आणि वाटलेली सर्व पिठं, तांदूळ, नाचणी आणि उडदाची वाटलेली डाळ मिसळून डोशाच्या पिठाप्रमाणे रात्री पीठ भिजवून ठेवावे. सकाळी मीठ, कांदा, कोथिंबीर घालून डोसा किंवा उत्तप्पा करावेत. कांदा, कोथिंबीर न घालता प्लेन डोसे नॉनस्टिक तव्यावर करावेत.

5) नाचणीचे पापड

बाजारात उपलब्ध असणाऱ्या नेहमीच्या प्रकारातील उडीद पापडांप्रमाणे नाचणीपासून पापड तयार करता येतील.

साहित्य – नाचणी पीठ 1 किलो, पापडखार 30 ग्रॅम, हिंग 2 चमचे, मीठ पाऊण वाटी.

कृती – वरील दिलेल्या प्रमाणात साहित्य वापरून नाचणीचे पापड तयार करता येतात. या पापडांना बाजारात चांगली मागणी आहे.

6) नाचणीचे लाडू

साहित्य – नाचणीचे पीठ चार वाट्या, साजूक तूप पाऊण वाटी, पिठीसाखर साडेतीन वाट्या, एक टेबलस्पून कोको पावडर, गरजेनुसार वेलची पावडर, काजूचे तुकडे.

कृती – सर्वप्रथम चार वाट्या नाचणीचे पीठ पाऊण वाटी साजूक तुपात मंद आचेवर खमंग भाजावे. साडेतीन वाट्या पिठीसाखर आणि एक टेबलस्पून कोको पावडर एकत्र चाळून त्यात व्हॅनिला इसेन्स तसेच वेलची पावडर मिसळावी. भाजलेले पीठ कोमट असतानाच त्यात ही पिठीसाखर, काजूचे बारीक तुकडे घालून लाडू वळवावेत. हे लाडू पौष्टिक तसेच चविष्ट लागतात. मुख्य म्हणजे ते मुलांना आवडतात. त्यामुळे मुलांसाठी हा पदार्थ महत्त्वाचा ठरतो.

7) नाचणीचा ढोकळा

साहित्य – नाचणी पीठ 1 वाटी, आंबट ताक पाव वाटी, पाणी पाव वाटी, आलं, लसूण व मिरची पेस्ट प्रत्येकी 1 चमचा, तेल 2 चमचा,
चवीप्रमाणे मीठ.

कृती – वरील सर्व साहित्य एकत्र करून भांड्याला तेलाचा हात लावून त्यात हे मिश्रण 15 ते 20 मिनिटं वाफवावे. ढोकळ्यावरून हिंग-मोहरीची फोडणी देऊन खोबरं, कोथिंबिरीने सजवावा.

8) नाचणी आंबिल

आंबिल करण्यासाठी नाचणीचे पीठ रात्री किंवा किमान 12-15 तास भिजवून मग त्याला शिजवितात. शिजविताना मीठ मिसळावे. आवडीप्रमाणे घट्ट वा पातळ ठेवतात. गौरी अथवा महालक्ष्मीच्या वेळेस हा पदार्थ केला जातो. लाकडाने पेटविलेल्या चुलीवर केलेली आंबिल स्वादिष्ट लागते.

साहित्य – नाचणीचे पीठ 100 ग्रॅम, गूळ 100 ग्रॅम, मीठ व पाणी.

कृती – वरील साहित्य वापरून चवीप्रमाणे मीठ व पाणी टाकून आंबिल तयार करता येते.

9) नाचणीची पेज

साहित्य – नाचणी अर्धी वाटी, तांदूळ अर्धी वाटी, भाजलेली मूगडाळ पाव वाटी, 1 चमचा भाजलेला ओवा व चवीपुरते मीठ.

कृती – नाचणी, तांदूळ, मूगडाळ, ओवा हे सगळे जिन्नस कढईमध्ये खरपूस भाजून घ्यावेत. नंतर मिक्‍सरमध्ये जाडसर वाटावेत. नंतर एका पातेल्यात एक कप पाणी गरम करून त्यात मीठ, एक मोठा चमचा वाटलेले पीठ पाण्यात टाकून शिजवून घ्यावे. पेड गरम असतानाच पिण्यासाठी घ्यावी.

10) नाचणीची भाकरी

नाचणीची भाकरी काळसर दिसते म्हणून लोकांना आवडत नाही; पण या भाकरीइतकी दुसरी कोणतीही भाकरी पौष्टिक नसते. अतिस्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी नाचणीची भाकरी व लोणी काढलेले ताक घ्यावे. नाचणीची भाकरी ही पचायला हलकी असल्याने कोणत्याही आजारात चालते.

साहित्य – नाचणीचे पीठ, मीठ व पाणी.

कृती – नाचणीचे पीठ चाळून घेऊन त्यात थोडे मीठ घालून पाण्याने घट्ट भिजवावे. जर पीठ दळून बरेच दिवस झाले असतील किंवा भाकरी चिरायची भीती असेल तर पिठाची उकड काढावी. यासाठी एका कढईत दोन वाट्या पाणी घ्यावे. ते उकळावे. त्यात थोडे मीठ घालावे. त्या उकळत्या पाण्यात नाचणीचे पीठ एक ते दीड वाटी घालावे व चांगले ढवळून झाकून ठेवावे. थोडे गार झाल्यावर पीठ चांगले मळून घ्यावे. त्यातील एक मोठा गोळा घेऊन भाकरी थापावी. नेहमीच्या भाकरीप्रमाणे तव्यावर पिठाची बाजू वर येईल अशी तव्यावर टाकावी. भाकरी थोडी गरम झाली, की पाणी फिरवावे. नेहमीप्रमाणे खालच्या बाजूने चांगली भाजली म्हणजे तव्यावरून काढून विस्तवावर भाजावी. गरमागरम भाकरी रस्सा भाजीबरोबर छान लागते.

11) नाचणीचा उपमा

साहित्य – नाचणी 1 वाटी, मेथी 1 टीस्पून, मोडाचे मूग 1 टेबलस्पून, गाजर-टोमॅटो प्रत्येकी 1 टेबलस्पून, 2 बारीक चिरून मिरच्या, हिंग,
मोहरी, आलं-लसूण पेस्ट, तेल, जिरे, हळद, कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबूरस.

कृती – नाचणीला भिजवून मोड आणून वाफवावे. थोड्या तेलात मोहरी, जिरे घालून फोडणी घालावी. यात मिरच्या, कढीपत्ता घालावा. आलं-लसूण पेस्ट घालावी. गाजर किसून, टोमॅटो चिरून, मूग, मेथ्या सर्व घालून पाच मिनिटे शिजवावे. दोन-तीन वाफा आल्या की नाचणी घालावी. मीठ व लिंबूरस घालून ढवळून परत दोन मिनिटे गॅसवर ठेवावे. गरम-गरम उपम्यावर कोथिंबीर व शेव घालून खायला द्यावे.

12) नाचणी वडा

साहित्य – नाचणी पीठ दीड कप, कढीपत्ता अर्धा कप, 2-3 मिरच्या, चवीपुरते मीठ, 1 कांदा.

कृती – वरील सर्व साहित्य एकत्र करून पाण्यासोबत मिसळून त्याची कणीक तयार करावी. कणकेचे बारीक गोळे थापून ते तेलात तळावेत. हे नाचणी वडे केचपसोबत खावेत.

13) नाचणीचे आप्पे

साहित्य – नाचणी धुऊन जाडसर रव्याप्रमाणे दळावी. हे पीठ एक वाटी, बारीक रवा एक चमचा, गूळ (किसून) अर्धी वाटी, वेलची पूड एक चमचा, काजू तुकडे अर्धा वाटी, चिमूटभर खायचा सोडा, नारळाचं घट्ट दूध एक वाटी.

कृती – सर्व साहित्य मिसळून भिजवावं. आप्पे पात्र बाजारात मिळेल. या आप्पेपात्रात प्रत्येक वाटीत एक एक चमचा तूप घालून त्यात दोन चमचे पिठाचं मिश्रण घालावं. झाकण ठेवून पाच मिनिटांनी कडेने पीठ सुटू लागेल. मग सुरीने सोडवून घ्यावं. उलटून जरा दोन मिनिटं भाजून काढावेत. हे खुसखुशीत आप्पे न्याहारीला उत्तम.

14) नाचणी सत्त्वाची लापशी

नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात “अ’ जीवनसत्त्व आणि लोह असते. लापशी प्यायल्याने शरीराला आलेली मरगळ निघून जाते. लापशी लहान मुलांसाठी तर खूपच उत्तम आहे.

कृती – एकदम सहज सोपी आहे. ताकामध्ये दोन चमचे नाचणी सत्त्व आणि चवीपुरते मीठ मिसळून उकळी येईपर्यंत किंवा ताक गाढे होईपर्यंत उकळावे. गरमच खाल्लेले छान लागते.

15) नाचणीची खीर

साहित्य – एक वाटी नाचणीचे पीठ, साजूक तूप, कोमट पाणी किंवा दूध, साखर किंवा गूळ, मीठ.

कृती – प्रथम थोडे तूप घेऊन नाचणीचे पीठ भाजून घ्यावे. त्यात कोमट पाणी किंवा दूध पातळ खिरीसारखे होईल असे मिश्रण करावे. नंतर त्यात आपल्याला किती गोड हवे या प्रमाणात साखर किंवा गूळ घालावा. चवीपुरते मीठ टाकावे. मधे-मधे चमच्याने हलवावे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.

एक उकळी आल्यानंतर बंद करावे. वरून हवे असल्यास दोन चमचे साजूक तूप टाकून 10 मिनिटांनंतर पिण्यास द्यावे. अशी ही नाचणीची खीर बनविण्यास सोपी, लवकर तयार होणारी, आरोग्यदायक व उत्साह आणणारी आहे. थंड असल्यामुळे पित्त प्रकृतीच्या माणसांनी घेतल्यास जळजळ, दाह हे लक्षण कमी होते. सहा महिन्यांपुढील लहान मुलांना दिल्यास त्यामध्ये असलेल्या प्रोटिन, कॅल्शिअम या घटकांचा बालकांच्या वाढीस फायदा होतो.

आरोग्यदायी नाचणी –

1) नाचणीचा रस शीत, पित्त व रक्तशामक आहे.

2) प्रथिने, खनिजे शिवाय अ, ब-1 आणि निकोटिनिक आम्ल ही जीवनसत्त्वे असतात.

3) कॅल्शिअम, फॉस्फरस आणि लोह, आयोडीन व गंधक असते.

4) तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात तर स्निग्ध पदार्थ कमी प्रमाणात असतात.

नाचणीतील प्रमुख पोषकद्रव्यांचे प्रमाण
अ.क्र. +पोषकद्रव्य +प्रमाण
1 +ऊर्जा (कॅलरी) +336
2 +कर्बोदके (ग्रॅम) +72
3 +प्रथिने (ग्रॅम) +7.7
4 +स्निग्ध पदार्थ (ग्रॅम) +1.3
5 +तंतुमय पदार्थ (फायबर) (ग्रॅम) +344
6 +कॅल्शिअम (मि.ग्रॅ.) +344
7 +फॉस्फरस (मि.ग्रॅ.) +283
8 +लोह (मि.ग्रॅ.) +6.4
संदर्भ – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, हैदराबाद

मधुमेही, खेळाडूंसाठी नाचणी आवश्‍यक –

1) नाचणीमध्ये प्रथिनांचे प्रमाण 7 ते 10 टक्के असते. नाचणी हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त आहे.

यात तंतुमय पदार्थाचे (फायबर) प्रमाण मुबलक असल्याने बद्धकोष्ठता होत नाही, तसेच धाग्यांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहींसाठी नाचणी फायदेशीर आहे.

2) स्निग्ध पदार्थ व कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असल्याने हृदय रोग्यांसाठी उपयुक्त आहे. शीतल असल्याने शरीरातील उष्णता कमी होते.यामध्ये नैसर्गिक लोह असते. त्यामुळे लोहाच्या कमतरतेमुळे होणारा “ऍनिमिया’आजार टाळण्यासाठी नाचणीचे पदार्थ आहारात आवश्‍यक आहेत.

3) नाचणी पचण्यास हलकी असल्याने आजारातून उठलेल्यांना नाचणीची पेज, आंबिल, भाकरी आरोग्यदायी ठरते. नाचणी ही काटकपणा आणते. यामुळे खेळाडूंच्या आहारात नाचणी असलीच पाहिजे.

4) नाचणीचे साजूक तुपातले लाडू, नाचणी शिरा, नाचणीची पेज हे खेळाडूंसाठी चांगले पौष्टिक पदार्थ आहेत.

पित्ताचे विकार, अजीर्ण, अल्सर, ग्लुटेन ऍलर्जी, पचनसंस्थेची शस्त्रक्रिया झालेल्यांना नाचणी पथ्यकारक आहे.
नाचणीला मोड आणल्यानंतर वाळवून नंतर त्याचे पीठ केल्यास त्याचे पोषणमूल्य वाढते.

5) नाचणीला मोड आणल्यानंतर त्यातील लोहाचा बाधक ठरणारा घटक (टॅनिन) कमी होतो. लोहाचे शोषण होऊ शकते.
नाचणीत इतर धान्यांच्या तुलनेत मुबलक कॅल्शिअम (कॅल्शिअमचे प्रमाण 344 मि.ग्रॅ./ 100 ग्रॅम) असल्याने हाडे व स्नायू बळकट होतात त्यामुळे याचे प्रक्रियायुक्त पदार्थ लहान मुले, अशक्त व आजारी व्यक्ती, गर्भवती माता यांसाठी उपयुक्त असतात.

6) नाचणीत विविध प्रकारची शरीरोपयोगी अमिनो आम्ले उपलब्ध असतात. ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल नाचणीमध्ये अधिक प्रमाणात असल्याने भूक कमी करण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी नाचणी उपयुक्त आहे.

7) वॅलीन हे आम्ल चयापचयासाठी उपयुक्त आहे. शरीराची झीज भरून काढते, मानसिक थकवा कमी करते.

मिथीऑनीन हे आम्ल केसाचे व त्वचेचे आरोग्य चांगले ठेवते. लेसिथीन या अमिनो आम्लामुळे पित्त कमी होण्यास मदत होते.

नाचणी शिशू आहार – रागीना

नाचणीला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. पाणी काढून नाचणीला एका थाळीत पसरवून त्यावर एका ओल्या कापडाने झाकून त्याला मोड येण्यास एक दिवस ठेवा. मोड आलेल्या नाचणीला उन्हात वाळवून भाजवून घ्या.
साहित्य – नाचणी 45 ग्रॅम, भाजलेली चणाडाळ 10 ग्रॅम, साखर 30 ग्रॅम.
कृती -वर दिलेले साहित्य पूड करून, मिसळून हवाबंद डब्यात घालून ठेवा.

नाचणीची गोड वडी

नाचणीच्या रंगामुळे बरेच जण ती खायचे टाळतात. नाचणी वड्यांचा रंग कोकोसारखा दिसतो म्हणून कोणीही आवडीने खाऊ शकेल.

साहित्य – नाचणी पीठ एक वाटी, खोबरे अर्धा वाटी, साखर दीड वाटी, थोडी वेलची पूड, एक चमचा तूप.

कृती – प्रथम तुपावर नाचणी पीठ व खोबरे भाजून घ्यावे. साखरेत थोडेसे पाणी घालून घट्टसा पाक करावा. पाकात वेलची पूड, भाजलेले पीठ व खोबरे घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवावे. ताटाला तुपाचा हात फिरवून मिश्रण ओतावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

मेथी नाचणी सूप

साहित्य – एक टेबलस्पून नाचणीचे पीठ, एक कप बारीक चिरलेली मेथी, थोडा बारीक किसलेला लसूण, प्रत्येकी एक टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट किंवा बदामपूड आणि तूप, 2-3 कप पाणी, एक टीस्पून ओवा, चवीपुरते मीठ, मिरेपूड, सजावटीसाठी किसलेले खोबरे.

कृती – सगळ्यात आधी एक कप पाण्यात नाचणीचे पीठ कालवून पातळ पेस्ट तयार करावी. एका भांड्यामध्ये तूप गरम करून त्यात लसणाची फोडणी करून ओवा, थोडे मीठ आणि मेथी टाकावी. मेथी थोडी हलवा आणि दोन-तीन मिनिटे शिजू द्यावी. नंतर त्यात उरलेले पाणी, थोडे मीठ, मिरेपूड, शेंगदाण्याचा कूट किंवा बदामपूड घाला. सूप गार झाले की थोडे घट्ट होते, त्यामुळे पाणी जरा जास्तच घालावे. पाणी चांगले उकळले की त्यात नाचणीची पेस्ट टाकून थोड्या-थोड्या वेळाने हलवत राहावी. चार-पाच मिनिटे सूप चांगला शिजू द्यावे. गरमागरम सूप वाटीमध्ये काढून त्यावर खोबरे टाकून खायला द्यावे.

नाचणीची कढी

साहित्य- गोड आंबट ताक एक वाटी, नाचणीचे पीठ 3 ते 4 चमचे, साजूक तूप अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, चिमूटभर हिंग, हिरवी मिरची,
धने-जिरे पावडर एक चमचा, मीठ आणि कोथिंबीर.

कृती – तूप गरम करून त्यात जिरे व बारीक केलेली हिरवी मिरची टाका. दोन मिनिटांनंतर नाचणीचे पीठ टाकून त्यात ताक टाका. मिश्रण पुन्हा पुन्हा ढवळत राहा. नंतर त्यामध्ये हिंग, धने-जिरे पावडर टाका. चवीपुरते मीठ टाकून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून, मिश्रण चमच्याने हलवत राहा. एक उकळी आल्यानंतर नागलीची कढी भाताबरोबर/ खिचडीसोबत खाण्यास तयार होते.

पाककृती गृप

Avatar
About खाद्यपदार्थ WhatsApp ग्रुप 71 Articles
श्री. संजीव वेलणकरांच्या ”मराठी खाद्यपदार्थ” या WhatsApp ग्रुपवरील पाककृती...

1 Comment on नाचणी चे पदार्थ

  1. आमच्याकडे भरपूर प्रमाणात स्वतःच्या शेतात पिकवलेली नाचणी आहे कोणाला पाहिजे असल्यास कृपया संपर्क करा दत्ताराम शिंदे 9892266368

Leave a Reply

Your email address will not be published.


*