आज काही ड्रायफ्रूट्ची माहिती भाग दोन

दिवाळीला भेटीदाखल दिल्या जाणाऱ्या ड्रायफ्रूट् मध्ये खजुराचा समावेश नसला तरी तो आरोग्याच्या दृष्टीने बहुगुणी आहे. हृदयासाठी खजूर चांगला. मधुमेहातही नुसता किंवा लिंबूपाणी वा ताकाबरोबर खजूर खाता येतो. पोटातील अल्सरमध्ये फायदेशीर ठरतात, तसेच त्यात कर्करोगविरोधी गुणही आहेत. परंतु प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असल्यामुळे मधुमेही व्यक्तींनी किंवा इतर आजार असलेल्यांनी आहारात खजूर किंवा इतर सुक्यामेव्याचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

जर्दाळूमधून (अॅाप्रिकॉट) तंतुमय पदार्थ व ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व तसेच लोह मिळते. मनुकांना तर नैसर्गिक कँडीच म्हणतात. मनुकात सोडियमचे प्रमाण कमी असून तंतुमय पदार्थ भरपूर आहेत. रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने तसेच रक्ताभिसरण नीट होण्यासाठी मनुके चांगले. पंडुरोग (अॅळनिमिया) असलेल्या व्यक्तींना मनुके आणि खजुरांनी फायदा होऊ शकतो. भिजवून ठेवलेले मनुके आणि खजूर सकाळी खाता येतील. काविळीच्या उपचारांमध्ये तसेच मधुमेहातही सुके अंजीर वापरले जातात. पाचक आणि रेचक म्हणूनही ते चांगले. तेही रात्रभर भिजवून ठेवून सकाळी खातात. लगेच शक्ती देणारी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही मदत करणारी ही ड्रायफ्रूट्स मिठाई, आइस्क्रीम किंवा खिरींमध्ये घालून खाण्यापेक्षा शक्यतो नुसतीच खाल्लेली चांगली. अंजीर, जर्दाळू, बेदाणे, खजूर हा सुकामेवा बद्धकोष्ठ न होण्यासाठी मदत करतो. थंडीत अनेकांना बद्धकोष्ठ होत असल्याने हा सुकामेवा जरूर खावा. (काजू, बदाम, पिस्ते वजन वाढवणारे असल्याने ते टाळलेलेच बरे.)

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

खजूर
पिस्ता
मनुका/ बेदाणे
सुके अंजीर
जर्दाळू

वरील सर्व सुक्यामेव्याचे मिश्रण लहान मुले अशक्त असल्यास त्यांना दररोज खायला दिल्याने फायदा होतो. सुक्यामेव्याच्या एकत्र मिश्रणाने शरीराचे सम्यक पोषण होते. सुक्यामेव्याचे दहा ग्रॅम मिश्रण जरी खाल्ले तरी ‘इन्स्टंट एनर्जी’ मिळते. मेंदूला तरतरी मिळते. विशेषत: पोटऱ्यांवर या मिश्रणाच्या सेवनाचा चांगला परिणाम दिसतो. पोटऱ्या आणि पाय दुखणे थांबते. दिवसभराच्या धावपळीचा थकवा आणि कंटाळा जायलाही मदत होते. ५ ते ८ वर्षे या वयोगटातील कृश आणि अशक्त बालकांचे पोषण कमी असते. त्यामुळे ती लगेच दमतात. खाली दिलेल्या सुक्यामेव्याच्या मिश्रणाचा या बालकांना विशेष फायदा होऊ शकतो. हे मिश्रण घरच्या घरी तयार करून ते या मुलांना रोज थोडे- थोडे खायला देता येईल.
साहित्य:- अक्रोड गर (५० ग्रॅम), सुके अंजीर (५० ग्रॅम), काजू (१०० ग्रॅम), खारीक (१०० ग्रॅम), खोबरे (१०० ग्रॅम), जरदाळू (५० ग्रॅम), पिस्ता (५० ग्रॅम), बदाम (५० ग्रॅम), बेदाणा (५० ग्रॅम), मनुका (१०० ग्रॅम), शेंगदाणे भाजून (१०० ग्रॅम).
टीप:- काजू गोमंतक, कोकण किंवा कारवारजवळील असावेत. खारीक किंचित मऊ, साखरी खारीक वापरावी. बदाम अमेरिकन तुलनेने स्वस्त मिळतात. ममरा बदाम खूपच महाग आहेत. काही ठिकाणी गंधकमिश्रित पाण्याचे संस्कार द्राक्षांवर करून मनुका व बेदाणे बनवले जातात. ते वापरू नयेत. दिलेल्या सर्व पदार्थाचे बारीक- बारीक तुकडे करावेत. ते एकत्र करून त्यांत अल्प प्रमाणात रावळगावच्या खडीसाखरेचे छोटे- छोटे खडे मिसळावेत. खडीसाखरेचे खडे साधारणपणे हरभराडाळीएवढे असावेत. त्यांच्या मिश्रणाने सुकामेवा खाताना कोरडे- कोरडे वाटत नाही.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.वैद्य खडीवाले

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*