भारतीय खाद्यसंस्कृती या विषयावर डॉ. वर्षा जोशी यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिलेला प्रदिर्घ लेख क्रमश: स्वरुपात प्रकाशित करत आहोत.
ऋग्वेद्कालात आर्यांच्या अन्नपदार्थांमधे बार्ली, दूध, दही, तूप, मांस यांचा समावेश केलेला होता. मीठ ही त्याकाळी अत्यंत महाग अशी गोष्ट होती. सोन्यापेक्षा दुर्लभ असं त्याचं वर्णन उपनिषदांमधे केलेलं आहे. त्यामुळेच कदाचित गोड पदार्थ जास्त खाल्ले जात असावेत.
पण उसाचा उल्लेख ऋग्वेदात नाही. त्याकाळी गोड पदार्थांसाठी प्रामुख्याने मधाचा वापर केला जाई.
त्या काळी विशेष प्रचारात असलेला आणि भारताचे सर्वात प्राचीन मिष्टान्न म्हणून गणला जाणारा पदार्थ म्हणजे अपूप. कणकेची लोळी बनवून भट्टीत भाजलेल्या अपूपाच्या प्रकाराला भ्राष्ट्र असे म्हणत. अपूपाचा दुसरा प्रकार म्हणजे कौंभ. चण्याच्या डाळीचं मसाला घालून सारण बनवून कणकेची पारी करून त्यात भरत. एका मोठ्या कलशात पाणी घालून त्यात एक प्रकारच्या गवताचे तुकडे घालून ते पाण्याच्या वर येतील असे ठेवीत. मग त्यावर हे गोळे ठेवून उकडले जात. अभ्यूष नावाच्या गूळ घालून केलेल्या अपूपाचा उल्लेख पाणिनीने केला आहे. आजही आपण नागपंचमीला जी दिंडे करतो ती म्हणजे अपूपाचा प्रकारच म्हटला पाहिजे. बार्ली आणि गव्हाच्या पिठापासून पुर्या करून त्या तुपात तळून त्यावर मध पसरून पदार्थ बनविला जाई.
भोज्य, मस्य, चोष्य, लेह्य व पेय असे आहाराचे पाच भाग मानले जात. भोज्य म्हणजे भात, डाळ, भाजी यासारखे पदार्थ, मस्य म्हणजे लाडू, मोदक यासारखे पदार्थ, हे दोन्ही प्रकारचे पदार्थ चावून तोंडात घोळवून मग गिळण्याचे असत. चोष्य म्हणजे उसासारखे चोखून खाण्याचे पदार्थ, लेह्य म्हणजे चाटून खाण्यासारखे चटणी लोणच्यासारखे पदार्थ आणि पेय म्हणजे पाणी, सरबतासारखे पिण्याचे पदार्थ असे ते पाच भाग होते. व याप्रमाणे अन्न सिद्धी केली जात असे.
स्मृती, वृत्ती आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी शुद्ध आणि सात्विक आहाराचे महत्व त्याकाळीही लोकांना कळले होते.
— डॉ. वर्षा जोशी
## भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ३
Leave a Reply