आजचा विषय भाकरी

गेले दोन दिवस पिठलं हा विषय झाला,त्यामुळे त्या पाठोपाठ भाकरी हा विषय लगेचच आला पाहिजे.

भाकरी करणे हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर काही राज्यातील अनेक स्त्रियांच्या हातचा मळ आहे. सांजसकाळ भाकऱ्या थापून त्यांच्या हाताला इतकी सवय झालेली असते, कि हातासरशी त्या भाकऱ्यांबरोबर, इतर दोनचार प्रकारही करुन टाकतात. पण तरी ते तंत्र सोपे नाही. नवीन शिकणाऱ्या व्यक्तीस, ते जमणे जरा कठिणच आहे. आपल्याकडे भाकरीसाठी ज्वारी, बाजरी, मका, पटणी, नाचणी, तांदूळ अशी धान्ये वापरली जातात. या सर्व धान्यात ग्लुटेन अगदीच कमी असल्याने, या पिठाला चिकटपणा असा नसतोच, त्यामूळे उकड काढली तरच या भाकऱ्या लाटता येतात, नाहीतर त्या थापूनच कराव्या लागतात. त्यापुर्वी पिठ चांगले मळून घ्यावे लागते, तसेच तव्यावरच्या भाकरीवर नेमक्या वेळी आणि नेमकेच पाणी, फिरवावे लागते. त्यात अजिबात चूक होऊन चालत नाही. भाकरीच्या पिठात थोडे उडीद पिठ किंवा कणीक मिसळून, थोडाफ़ार चिकटपणा आणता येतो, भाकरी करताना नवी व्यक्ती, पुर्ण आकाराची भाकरी करायला जाते. आणि तिथे अनेकदा फसते. ८/९ इंच व्यासाची भाकरी करण्यापेचा ३/४ इंचाची भाकरी करणे, जास्त सोपे जाते. तवा मोठा असेल, अशा २/३ भाकऱ्या एकाचवेळी भाजता येतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काही प्रकार भाकरीचे
ओतलेली भाकरी
हा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक वा इतर पिठे वापरुनही करता येते. एक कांदा व एक भोपळी मिरची अगदी बारीक चिरून घ्या. त्यात मीठ घाला. भोपळी मिरची (सिमला मिरची) जरा तिखट असतेच पण हवी तर यात एखादी हिरवी मिरची चिरून घाला. थोड्या वेळाने हे चुरुन त्यात तांदळाचे (किंवा इतर ) पिठ घालून सरसरीत भिजवा. कणीक सोडून इतर पिठे वापरायची असतील तर नावाप्रमाणेच ओतता येईल, इतपत पाणी घाला. (कणकेसाठी थोडे वेगळे तंत्र वापरावे लागेल, ते लिहितोच) गावठी तांदळाचे किंवा मोदकासाठी खास मिळते ते पिठ वापरले तर जास्त चांगले. आता पिठात चमचाभर तेल टाकून ढवळा. मग बिडाचा किंवा नॉन स्टीक तवा तापत ठेवा. त्यावर तेलाचा पुसटसा थर द्या आणि मग हे पिठ ओता. साधारण अर्धा सेमी जाड असू द्या. झाकण न ठेवता मंद आचेवर दोन्ही बाजूने गुलाबी भाजा. कणीक वापरल्यास, थालिपिठापेक्षा थोडे सैल भिजवा. फॉइलचा एक तूकडा घ्या. त्याला तेलाचा पुसटसा हात लावून, त्यावर पाण्याच्या हाताने हे मिश्रण थापा. मग फ़ॉइलसकट पण भाकरी तव्यावर आणि फ़ॉइल वर येईल, अशी टाका. थोड्याच वेळात फ़ॉइल सुटी होईल, ती काढून घ्या आणि भाकरी भाजा. याच फ़ॉइलवर दुसरी भाकरी थापता येईल. पुढच्या सर्वच प्रकारासाठी हे तंत्र वापरता येईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

गाजराची भाकरी
गाजराचे तूकडे करुन कूकरमधे उकडून मऊ करुन घ्या. त्यातले पाणी बाजूला करुन, गाजरे कुस्करून घ्या. कुसकरून गुठळ्या मोडल्या नाहीत तर एकदा ब्लेंड करुन घ्या. एक वाटी गर झाला तर त्यात लाल मिरच्यांचे बारीक तुकडे (फ़्लेक्स) अर्धा टिस्पून टाका, त्यात मीठ टाका आणि साधारण वाटीभर कुठलेही पिठ मिसळा. पिठ थोडे कमीजास्त लागेल पण पिठ सैलसरच असू द्या. लागल्यास बाजूला ठेवलेले पाणी वापरा. आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. या भाकरीला अप्रतिम रंग येतो, त्यातले चिली फ़्लेक्सही सुंदर दिसतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

कांदा भाकरी
मोठा कांदा किसून घ्या. त्यात थोडे मीठ मिसळा. थोडी जिरेपूड टाका. आणि मग त्यात पिठ भिजवा. आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. कवडी दही, मिरची आणि हि भाकरी, फ़क्कड बेत जमतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बटाटा भाकरी
बटाटा बारीक किसणीने किसून घ्या. त्यात मीठ मिसळा, म्हणजे काळा पडणार नाही. मग एका बटाट्याला, एक टेबलस्पून घट्ट पण आंबट दही, एक टिस्पून जिरे आणि आवडीप्रमाणे हिरवी वा लाल मिरची टाका. (मिरचीचे लोणचे वापरल्यास जास्त चांगले.) त्यात तांदळाचे पिठ मिसळून, सैलसर भिजवा. या पिठाची भाकरी तव्यावर डावेने पिठ पसरुन करता येते. (तितपत पिठ पातळ ठेवा) हि भाकरी कुरकुरीत होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

वांग्याची भाकरी
भरताचे वांगे, भरतासाठी भाजतो तसेच भाजून घ्या. मग ते सोलून त्या गरात हिरवी मिरची, एखादा कांदा घालून, मिक्सरमधून एकजीव करुन घ्या. मीठ व तेल घालून त्यात पिठ ( ज्वारीच्या पिठाने चांगली चव येते, पण बाकीची पिठे चालतात.) मिसळा. हे पिठ मात्र चपातीच्या पिठाप्रमाणे घट्टसर हवे. याच्या लाटूनही भाकऱ्या करता येतात. लसणाच्या चटणीसोबत सुंदर लागतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

लसणाच्या पातीची भाकरी
मुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाहीतरी या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच. अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी करवंटीचा उपयोग केला, तरी चालतो. १०/१५ दिवसात वीतभर पाती वाढतात. यासाठी तांदळाची उकड काढावी लागते. एक वाटी पिठ मोजून तयार ठेवावे. वरच्या पाती कात्रीने बारीक कापून घ्या. एक वाटी पाणी उकळत ठेवा, त्यात मीठ, थोडा हिंग आणि एक टिस्पून तेल टाका. पाण्याला उकळी आली कि त्यात तांदळाचे पिठ पसरुन टाका.
झाकण ठेवून एक वाफ़ येऊ द्या. मग गॅस बंद करा. दोन मिनिटाने त्यात लसणाच्या पाती (त्या कमी असल्या तर, थोडा लसूण बारीक चिरुन) टाका. पाण्याचा हात लावून मळून घ्या. मग फॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. साजूक तूपासोबत छान लागतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

फ़णसाची भाकरी
८/१० फ़णसाच्या गऱ्यातील बिया काढून घ्या. रसाळ (बरका) फ़णस असेल तर गरे मिक्सर मधून काढा, कापा असेल तर गरे वाफ़वून घ्या आणि मग मिक्सरमधून काढा. मग त्यात मिठाचा कण आणि तांदळाचे पिठ मिसळा. यात थोडे नारळाचे दूध घातले तर छान. मग वरच्या तंत्रानेच भाकऱ्या करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

शेपूची भाकरी
वरच्या लसणाच्या पातीच्या तंत्राने शेपूच्या भाजीच्या भाकऱ्या चांगल्या होतात. भाजी अगदी बारीक कापायची नाही, म्हणजे भाकरीवर छान नक्षी दिसते. या भाकरीवर कच्चे तेल घालून खाल्ले तर चांगले लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

उसाच्या रसातली भाकरी (दशमी)
उसाचा रस एक वाटी ( रसात आले, लिंबू घातलेले नसावे ) पाव वाटी नारळाचे दूध, असे एकत्र करावे त्यात ज्वारीचे किंवा तांदळाचे पिठ मिसळावे. मिठाचा कण टाकावा. हे पिठ जरा पातळच भिजवावे. पारंपारीक प्रकारात केळ्याच्या पानावर थापून दशम्या करतात. खालीवर केळीचे पान ठेवून तव्यावर ठेवायची. थोड्या वेळाने परतायची. दशमी तयार झाली, कि पान सुटे होते. जाड फॉइल वापरुनही करता येते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

गुळाची भाकरी
अर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी पाण्यात कुस्करून विरघळवून घ्यावा. मग ते पाणी गाळून घ्यावे. त्यात थोडे तेल टाकून, नाचणीचे किंवा बाजरीचे पिठ भिजवावे. या भाकऱ्या थापायला सोप्या जातात, पण भाजताना काळजी घ्यावी लागते, कारण त्या लवकर करपतात. या भाकरीसोबत साजूक तूप चांगले लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

सोया चंक्सची भाकरी
एक वाटी सोया चंक्स किंवा मीन्स कोमट पाण्यात अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालावेत, मग ते पिळून घ्यावेत. त्याला १ टिस्पून आले लसूण पेस्ट लावावी. थोड्या तेलावर एक कांदा बारीक चिरून परतून घ्यावा. त्यावर १ टिस्पून टोमॅटो प्यूरे किंवा २ टिस्पून केचप टाकावा. मग त्यावर मिन्स किंवा चंक्स बारीक करून घालावेत व वाफ़ येऊ द्यावी. आवडीप्रमाणे, तिखट व गरम मसाला घालावा. मग ते मिश्रण थंड झाले कि त्यात कणीक घालून मळावे.
याच्या छोट्या छोट्या भाकऱ्या कराव्यात. डब्यात न्यायला या सोयीच्या आहेत. मुलांना पण देता येतील.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

केळ्याची भाकरी
जास्त पिकलेले केळे किंवा उकडलेले राजेळी केळे यांचा गर वापरुन, फ़णसाच्या भाकरीप्रमाणेच भाकरी करता येते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*