आजचा विषय मशरूम भाग एक

मशरूमला ‘व्हेजिटेरियन्स मीट’ असं म्हटलं जातं. मशरूम हा शाकाहारी की मांसाहारी पदार्थ आहे याबाबत नेहमी चर्चा केली जाते. मात्र मशरूम हा शाकाहारी पदार्थ आहे. मटणाप्रमाणे चव असलेले मशरूम खाण्यासाठी आता पूर्वीप्रमाणे पावसाळा येण्याची वाट पाहावी लागत नाही. कारण वर्षभर मशरूम मार्केटमध्ये उपलब्ध असतात. ते विकत आणले तर ते साफ करण्यावरून कटकट होणारच असते. मशरूम शिजायला फार तर पाच मिनिटं लागतील, पण साफ करणं म्हणजे दिव्यच. त्यामुळे अनेकदा मशरूम हे हॉटेल किंवा रेस्तराँमध्येच खाल्ले जातात. आपल्याकडे इंग्रजीत ‘मशरूम’ किंवा मराठीत ‘कुत्र्याची छत्री’ आणि हिंदीत कुकुरमुत्ता असं म्हटलं जातं. याची लागवड विशेषत: जमिनीवर किंवा अन्न स्रेतावर एका बुरशीच्या रूपाने होत असते. या मशरूमची वाढ एका रात्रीतही वेगाने होऊ शकते. भारतात मशरूमचा अधिक वापर केला जात नाही. पण हल्ली चायनिजसारख्या पदार्थामध्ये याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. त्यामुळे हल्ली मशरूमची लोकप्रियता वाढलेली दिसतेय. मशरूमचे अनेक प्रकार असून भारतात प्रामुख्याने तपकिरी मशरूम, पांढरा मशरूम असे प्रकार असून त्याला टेबल मशरूम किंवा इटालियन मशरूम किंवा पांढरं बटण म्हणूनही प्रसिद्ध आहे. याचा आकार छत्रीप्रमाणे असून त्यावर काळ्या रंगांचे ठिपके दिसतात.

खाण्यास योग्य जातींपैकी बटन अळिंबी, धिंगरी अळिंबी, भाताच्या काडावरील अळिंबी या तीन ते चार जातींची व्यापारी तत्त्वावर लागवड करता येते. त्यातील धिंगरी अळिंबीच्या जातीपैकी महाराष्ट्रात प्ल्युरोट्‌स साजोर काजू, प्ल्युरोट्‌स फ्लोरिडा, प्ल्युरोट्‌स डवोस, प्ल्युरोट्‌स प्लॅबीलॅट्‌स, हिपसिझायगस अलमॅरीस या जातीचे उत्पादन घेतले जाते. अळिंबी या हरितद्रव्यविरहित असल्यामुळे अन्नासाठी तिला इतर सेंद्रिय पदार्थांवर अवलंबून राहावे लागते. अनेक ठिकाणी हे मशरूम सुकवून बाजारात विकले जातात. यापासून लोणचं, सूप पावडर, मुरंबा, बिस्किटं, चॉकेलट आदी पदार्थ केले जातात. सॅलड पासून ते अगदी चमचमीत डिशपर्यंत घरच्याघरी अगदी सहजपणे मशरूमच्या अनेक रेसिपी बनवता येतात.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काही मशरूमचे पदार्थ
क्रीम ऑफ मशरूम सूप प्रकार एक
साहित्य : पंधरा-सोळा मशरूम्स, १ छोटासा कांदा, १ टेबल स्पून बारीक चिरलेला लसूण, बटर, मीठ, मीरपूड, १ वाटी तयार व्हाइट सॉस, अर्धी वाटी क्रीम, चीज क्यूछब.
कृती : दोन मशरूम्स वगळून उरलेल्या मशरूम्सचे पातळ काप करावे. कांदा चिरून घ्यावा. कढईत १ टेबल स्पून बटरवर कांदा परतून घ्यावा. कांदा पारदर्शक झाला की मशरूम्सचे काप आणि अर्धा लसूण परतावा. मशरूम्स मऊ झाले की गॅस बंद करावा. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सररवर त्याची अगदी बारीक पेस्ट करून घ्यावी. त्यात तीन ते साडेतीन वाट्या पाणी घालून मिश्रण उकळावे. त्यात मीठ, उरलेला लसूण, पातळसर व्हाइट सॉस घालून व्यवस्थित मिक्स करावे. सूप सतत ढवळत राहावे. अर्धे किसलेले चीज घालावे. सूप व्यवस्थित उकळले की त्यात अर्ध क्रीम घालून ढवळावे. सूप बाऊलमध्ये काढून वरून थोडं फ्रेश क्रीम आणि किसलेले चीज घालून प्यायला द्यावे. हे थिक आणि क्रिमी सूप अगदी पोटभरीचे होते. याच्याबरोबर गार्लिक टोस्ट किंवा चिज चिली टोस्ट मस्त लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

क्रिम ऑफ मशरूम सूप प्रकार दोन
साहित्य: चार चमचे तेल, एक चमचा आले लसूण पेस्ट, चार हिरव्या मिरच्या, 200 ग्रॅम मशरूम, करी पावडर, मीठ, साखर, मिरेपूड, ४५० ग्रॅम नारळाचे दूध, तीन चमचे लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : एका पसरट भांड्यात चार चमचे तेल गरम करा. त्यात आले,लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्यांचे लांब काप करून परता. मशरूमच्या पातळ काचऱ्या करून पाच मिनिटे गॅस मोठा ठेवून ढवळा. आता त्यात दोन चमचे करी पावडर, एक चमचा मीठ, एक चमचा साखर, काळे मिरेपूड आणि नारळाचे दूध घालून ढवळत राहा. आठ ते दहा मिनिटे गॅसवरच ठेवून सतत ढवळत राहा. आता पातेले गॅसवरून खाली उतरवून त्यात लिंबाचा रस घाला. मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा व सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मशरूम सॅलड
एक वाटी मशरूम स्वच्छ करून घ्या. घेवडा आणि गाजर बारीक चिरून वाफवून घ्या. एक सिमला मिरची चिरून घ्या. दोन लसणाच्या पाकळ्या वाटून एक चमचा गरम तेलात घाला. मीठ आणि मिरपूड घाला आणि एकत्र केलं की झालं सॅलड तयार.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मशरूम मसाला
साहित्य: पाव किलो मशरूम, पाव किलो मटार, तेल आणि थोडं लोणी, फोडणीसाठी जिरं, दोन कांदे, दोन चमचे आलं, दोन चमचे लसणाची पेस्ट, एक चमचा तिखट, दोन चमचे धनेपूड, एक चमचा कसूरी मेथी, दोन टोमॅटो, ताजं क्रीम आणि कोथंबीर.
कृती: तेल आणि लोणी एकत्र तापवा. त्याला जिऱ्याची फोडणी द्या. कांदे बारीक चिरून परता. त्यात आलं, लसूण पेस्ट, तिखट, धने टाकून परतून घ्या. बारीक चिरलेले टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. कसूरी मेथी थोडी तव्यावर गरम करून मसल्यात टाका. त्यात मटार, मशरूम घाला. पाणी घालून शिजवून घ्या. मशरूम लवकर शिजतात. त्यामानाने मटारला वेळ लागतो. त्यानुसार शिजवा. फ्रेश क्रीम घालून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीसह वाढा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मशरूम मॅजेस्टिक कबाब
साहित्य : बटन मशरूम आणि फ्रेश मशरूम- दोन्ही मिळून १२० ग्रॅ (बारीक चिरलेले), काळे मशरूम (असल्यास) ३० ग्रॅम, भाजलेले बेसन ३० ग्रॅम, घट्ट दही ४० ग्रॅम, तेल २० ग्रॅम, हिरवी चटणी ८० ग्रॅम, चिरलेले आलं १० ग्रॅम, लसूण ५ ग्रॅम, काळी मिरी भरडलेली चिमूटभर, बारीक चिरलेल पुदिना १ टीस्पून, बारीक चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून, गरम मसाला १ टीस्पून, मीठ चवीनुसार, ब्रेडक्रम्स २० ग्रॅम
कृती : कढई किंवा फ्राय पॅनमध्ये निम्मं तेल घ्या. ते गरम करा आणि त्यावर फ्रेश मशरूम परतून घ्या. मग त्यामध्ये बटन मशरूम्स आणि काळे मशरूम्स घालून परता. व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करा आणि मशरूम थंड होऊ द्या. बेसनमध्ये सगळं साहित्य एकत्र करून (तेल वगळता) मळून घ्या. परतून ठेवलेले मशरूम्स मिक्स करून घट्ट गोळा करून घ्या. एक-दोन तास बाजूला झाकून ठेवा. त्यानंतर त्या गोळ्याचे कबाब बनवा. तळहाताला थोडे तेल लावून हव्या त्या आकाराचे कबाब बनवा आणि मध्यम आचेवर तव्यावर किंवा फ्राय पॅनमध्ये ग्रिल करा. (८ ते १० मिनिटे लागतील). हिरव्या चटणीसोबत स्नॅक्स म्हणून गरमागरम सव्‍‌र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on आजचा विषय मशरूम भाग एक

  1. आपला “आजचा विषय मशरूम भाग एक ” वाचला सुंदर लेख होता,
    शिरीष पांडे
    9766172757

Leave a Reply

Your email address will not be published.


*