तेवीस प्रकारचे मोदक

१. पनीरचे मोदक : पनीरमध्ये साखर, काजू, किसमिस, वेलची पावडर भरून हे सारण रवा, मैद्याच्या पोळीमध्ये भरून तळून काढावे. हा मोदकाचा प्रकार मला दिल्लीला एका ठिकाणी खायला मिळाला.

२. खव्याचे मोदक : हा प्रकार तसा सगळीकडे दिसतो. यामध्ये खव्यात साखर, केशर घालून, भाजून साच्यात घालून मोदक करतात.

३. बेक केलेले मोदक : खोबरं, किसमिस, खव्याचे सारण मैद्याच्या सप्तपारीमध्ये भरून बेक करावे.

४. गूळ कोहळ्याचे मोदक : हा प्रकार विदर्भातील आतल्या गावातला. गूळ, लाल कोहळा व तेवढीच कणिक घेऊन एकत्र मळावे. मोदकाचा आकार देऊन मंद आचेवर तळावे.
५. पुरणाचे मोदक : पुरणाचे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मोदक तळून घेतात किंवा वाफवूनसुद्धा घेतात.

६. फ्रुट मोदक : वेगवेगळया प्रकारची फळे मिक्स फ्रुट जॅममध्ये मिसळून हे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळून घ्यावे.

७. संदेश मोदक : पनीर, खवा, साखर, केशर, वेलची एकत्र मिक्सरमध्ये वाटून याचे मोदक साच्यामध्ये बनवून वाफवून घ्यावे.

८. मनुकांचे मोदक : मनुका, काजू एकत्र करून त्यात थोडी दूध पावडर घालून त्याचे मोदक वळावे.

९. तीळगुळाचे मोदक : गुळाचा पाक तयार करून त्यात भाजलेले तीळ घालावे व हे सारण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळावे. किंवा तीळ व गुळाचे जे सारण आहे ते थोडे गरम असतानाच साचामध्ये घालून त्याचे मोदक करावे. हा प्रकार यवतमाळ भागात करतात व तिळी चतुर्थीला याचा नैवेद्य दाखवतात.

१०. खोबरं मैद्याचे मोदक : हा मोदक प्रकार सर्व ठिकाणी आढळून येतो. रवा, खोबरं, खवा, साखर एकत्र करून हे सारण मैद्याच्या वाटीत भरून मंद आचेवर तळावेत.

११. मैद्याचे उकडीचे मोदक : मैद्याची पारी लाटून मध्ये कुठलेही गोड सारण भरून त्याचे वेगळ्या आकाराचे मोदक करावे व वाफवून घ्यावे. थोडक्यात मोमोज म्हणजेच मोदकासारखा एक प्रकार. ते ज्याप्रकारे करतात तसाच हा प्रकार करावा.

१२. कॅरामलचे मोदक : पनीर, खवा, काजू, किसमिस, साखर एकत्र करून त्याला मोदकाचा आकार द्यावा. हा मोदक साखरेच्या कॅरामलमध्ये बुडवून थंड करून सव्र्ह करावा.

१३. काजूचे मोदक : काजू कतलीचे सारण घेऊन या मध्ये खवा, खडीसाखर भरून याला मोदकाचा आकार द्यावा.

१४. फुटाण्यांचे मोदक : फुटाणे बारीक करून त्यात साखर व तूप घालून चांगले मळावे या पिठाला मोदकाचा आकार द्यावा. हा प्रकार गरम न करता चटकन होणारा प्रकार आहे.

१५. तांदळाचे गुलकंदी मोदक : तांदळाच्या उकडीमध्ये गुलकंदाचे सारण भरून हे मोदक मंद आचेवर तळा किंवा वाफवून घ्या.

१६. पोह्यांचे मोदक : पोहे चांगले भिजवून त्याचा गोळा मळावा. त्यामध्ये आपल्याला हवे ते सारण भरून मंद आचेवर तळावे.

१७. चॉकलेटचे मोदक : खवा, खोबरं, दाणे बारीक करून मळून घ्या. त्यानंतर याला मोदकाचा आकार द्यावा. व एकेका मोदकाला हॉट चॉकलेट सॉसमध्ये बुडवून थंड करून सव्र्ह करा.

१८. शेंगदाण्यांचे मोदक : गूळ आणि शेंगदाणे एकत्र करून त्यात काजू, किसमिस घालावे व उकडलेला बटाटा व साबुदाण्याच्या पिठाच्या पारीमध्ये भरून तळून घ्यावे.

१९. बटाटयांचे मोदक : बटाट्यामध्ये खवा, साखर, काजू, किसमिस घालून त्याचा हलवा बनवावा व साच्यामध्ये घालून मोदक करावे. वरून दुधाची पावडर लावावी.

२०. पंचखाद्याचे मोदक : पंचखाद्य एकत्र करून हे सारण मैद्याच्या पारीत भरून डीप फ्राय करा.

२१. बेसनाचे मोदक : बेसनाच्या लाडवाच्या सारणाला साच्यात घालून मोदकाचा आकार द्यावा व मधे एक एक काजू भरावा.

२२. डिंकाचे मोदक : डिंक तळून डिंकाच्या लाडवाचे मिश्रण करावे. हे मिश्रण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळून घ्यावे.

२३. उकडीचे मोदक : तांदळाची उकड तयार करून त्यात ओलं खोबरं व गूळ याचे सारण भरून मोदकाचा छान आकार देऊन वाफवावे. हा प्रकार कोकणात चाखायला मिळतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*