वैद्य, शंकर

“स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला” , “पालखीचे भोई” अशा एकाहून एक सरस तसंच दर्जेदार काव्यरचनांची निर्मिती करणारे प्रसिध्द कवि व साहित्यिक शंकर वैद्य यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूरमध्ये १५ जून १९२८ रोजी झाला. लहानपणापासूनच शंकर वैद्य यांना कवितांची गोडी होती. ही आवड जपत असतानाच त्यांना साहित्य व कवितांची गोडी लागली. “आला क्षण, गेला क्षण” हा वैद्य यांचा पहिला कथासंग्रह, तर “कालस्वर” हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होय.

वैद्य यांचे माध्यमिक शिक्षण पुण्यातील जुन्नर तालुक्यामध्ये झाले. पुढे पुणे विद्यापीठातून बीए आणि एमएचे शिक्षण पूर्ण केल्यावर शंकर वैद्य यांनी सात वर्ष शासनाच्या शेती विभागात नोकरीही केली. या दरम्यान त्यांचे कव्य लेखन सुरुच होते. त्यांचे “सांजगुच्छ”, “दर्शन”, “मैफल”, “पक्षांच्या आठवणी” हे काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध असून, कुसुमाग्रजांच्या ‘रथयात्रा’ आणि ‘प्रवासी पक्षी’ या पुस्तकांचं हिंदी रूपांतर केलं आहे.

काव्यसमीक्षक म्हणूनही वैद्य काम पाहिले आहे. भूपाळी कशी म्हणावी, दिंडी कशी वाचावी, शार्दुलविक्रिडित म्हणताना काय दक्षता घ्यावी, याचं शिक्षण त्यांनी शालेय जीवनातच मिळवलं होतं. याच काळात संत-पंत काव्याचा परिचय देखील त्यांना झाला. त्यामुळेच सर्व तर्‍हेचे काव्यरस शोषून घेत त्यांची स्वत:ची, स्वजाणिवेची कविता प्रकटली आणि ती रसिकमान्यही झाली. अत्यंत सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे मुख्य वैशिष्ट्य होते त्यामुळे, नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा. निसर्गरम्य वातावरणात शंकर वैद्य यांचे बालपण गेल्याने त्यांच्या कवितांमधूनही निसर्गप्रेम प्रगट व्हायचे. शंकर वैद्य यांनी आकाशवाणीवरुन कव्यवाचनही केले व त्यांचा हा कार्यक्रम लोकप्रिय ठरला होता. कवी व साहित्यिक यापलिकडे कुशल वक्ते व सूत्रसंचालक म्हणूनही त्यांची ख्याती होती.

साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल शंकर वैद्य यांना महाराष्ट्र शासन, कोकण मराठी साहित्य परिषद, मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानच्या पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

दिर्घ आजारपणामुळे वयाच्या ८६ व्या वर्षी म्हणजे २३ सप्टेंबर २०१४ या दिचशी पहाटे ३ वाजता शंकर वैद्य यांनी दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)

प्रा. शंकर वैद्य यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

कविवर्य प्रा. शंकर वैद्य (15-Jun-2021)

कविवर्य प्रा. शंकर वैद्य (15-Jun-2018)

कविवर्य प्रा. शंकर वैद्य (3-Oct-2017)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*