रूपाली शिरोडे

मनात जिद्दीचा अंकुर जपून ठेवून त्याला सातत्यपूर्ण मेहनतीची जोड दिली तर अडीअडचणींच्या वादळवार्‍यांतही यशाचा वटवृक्ष बहरू शकतो, हे धुळ्याच्या रूपाली शिरोडेने दाखवून दिले आहे. एमपीएससीने २०११ मध्ये घेतलेल्या विक्रीकर निरीक्षकपदाच्या परीक्षेत रूपालीने राज्यात मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

धुळ्यातील कमलाबाई गर्ल्स स्कूलमधून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतलेली रूपाली एसएसव्हीपीएस कॉलेजमधून कम्प्यूटर सायन्समध्ये बी.एस्सी. झाली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एम.एस्सी. केले. घराला हातभार लावण्यासाठी तिने खासगी शिकवण्या घेतल्या. सरकारी तंत्रनिकेतनमध्ये लेक्चररशीपही केली. दरम्यान तिचे लग्न झाले. पण, बहिणीचे अपूर्ण स्वप्न आणि स्वत:ची जिद्द रूपालीने मनात ठेवली होती.

तिने जळगावचे ‘दीपस्तंभ फाऊंडेशन’ गाठले. दर शनिवारी-रविवारी ती तिथे जात असे. मात्र, धुळ्याहून जळगावला जाणे आणि दोन दिवस तिथे राहणे यासाठी घरची मंडळी फारशी तयार नव्हती. रूपालीने त्यांची समजूत घातली. ‘दीपस्तंभ’मध्ये रूपालीला चार मैत्रिणी मिळाल्या. या पाचजणींचा ग्रुप झोकून देऊन तयारी करू लागला. तीन तास लेक्चर आणि नऊ तास लायब्ररी वर्क अशी मेहनत त्या घेऊ लागल्या. शिवाय दीड तास ग्रुप डिस्कशनचीही जोड होतीच. अखेर मंत्रालयात सहाय्यक म्हणून निवड झाल्यावर रुपालीच्या मेहनतीला पहिले फळ आले. ती नोकरी सुरू झाल्यानंतर रुपाली पनवेल येथे राहण्यास गेली आणि तिथून दररोज तिचे मंत्रालयात जाणे-येणे सुरू झाले. प्रवासाचा हा वेळ रूपाली एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासासाठी करत होती. महत्त्वाचे लेक्चर अथवा वर्कशॉप असेल तेव्हा ती जळगावला येई. ध्येयाचा असा चिकाटीने पाठलाग केल्यानंतर रूपाली आज अपेक्षित ठिकाणी पोहोचली आहे. तिच्या इतर चार मैत्रिणीही परीक्षेत यशस्वी झाल्या आहेत. रूपालीच्या या यशावर ‘दीपस्तंभ’च्या यजुर्वेंद महाजन म्हणतात, ‘प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत, घराच्या जबाबदार्‍या सांभाळून यशच नव्हे तर त्याच्या अत्युच्च शिखरावर पोहोचणारी रूपाली तमाम तरुणांसाठी आदर्शच आहे.

रुपालीच्या वडिलांचे जुन्या धुळ्यात किराणा मालाचे दुकान आहे. त्यांना रूपालीशिवाय आणखी एक मुलगी, एक मुलगा. शिक्षण देण्यासाठी त्यांनी केलेल्या धडपडीला मुलांनीही चांगला प्रतिसाद दिला. रूपालीच्या मोठ्या बहिणीने विद्यापीठात गोल्ड मेडल मिळवले होते.

(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*