शंकर पुरूषोत्तम आघारकर

Agharkar, Shankar Purushottam

भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ. त्यांनी वनस्पतिशास्त्राबरोबर प्राणिशास्त्र, भूगर्भशास्त्र यांचाही अभ्यास केला. त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर १८८४ रोजी मालवण येथे झाला. त्यांनी मुंबई आणि कोलकाता येथे महाविद्यालय पातळीवर अध्यापन केले. ‘भारतीय कोरडवाहू भागात उगवणार्‍या वनस्पतींचा स्वप्रसार व त्यांचे मूळ स्थान’ या विषयावर संशोधन करून त्यांनी बर्लिन विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली, तसेच आंबा, केळी, भाताचे पीक इत्यादींविषयी संशोधनही केले. १९४६ साली वनस्पती शास्त्राच्या विशेष अध्ययनासाठी त्यांनी पुणे येथे ‘महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस’ ही संस्था स्थापन केली. आता ही संस्था ‘आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट’ या नावाने ओळखली जाते आणि येथे इतर शास्त्रांचेही संशोधन चालते.

वनस्पतींवर अपार प्रेम करणारा बंडखोर वैज्ञानिक हे वाक्य आले तर पुढील नाव हे आघारकरांचे आले पाहिजे इतकी या जंगलवेड्या निसर्गमित्राला, आजुबाजूच्या झाडा झुडूपांची, पाना फुलांची, पाखरा प्राण्यांची व वनस्पती वेलींची विलक्षण आवड होती. पश्चिम घाट पालथा घालून तिथल्या श्रीमंत वन्य जीवनाच नुसतं नेत्र सौंदर्यच न्याहाळायच नाही, तर प्रत्येक झाडाची ओळख करून घ्यायची, त्याचे विशेष गुण, दोष, व औषधी उपयुक्तता पारखून घ्यायची, नव्या वनस्पती शोधून त्यांची मनात नोंद करून ठेवायची हा त्यांचा बालपणातील आवडता उद्योग होता. तरूणपणी ते वनस्पतींबरोबरच अनेक प्राण्यांचसुध्दा आभ्यासपुर्ण संशोधन, व बारकाईने निरीक्षण करू लागले. आपल्या जंगल सफरींवर टिपणं काढायला लागले. अशीच त्यांची विवीध ‘निसर्गपुत्रांवरची’ शोधयात्रा चालू असताना त्यांना एका नव्या जातीच्या जेली फिश चा शोध लागला. या प्राण्याने तर आघारकरांच जीवनच बदलून टाकलं व जागतिक स्तरावर त्यांना विशेष किर्ती व संशोधकाची ओळख मिळवून दिली. आघारकरांच्या माहितीमधील सुसुत्रता, मुद्देसूदपणा, व निरीक्षणांमधील अचुकता पाहून त्यांच्यामधील अतिशय प्रतिभावान व गहिर्‍या अशा शास्त्रज्ञाचा छडा कलकत्त्याच्या ‘इंडियन म्युझियम’ ला लागला व तिथे त्यांची नेमणूक वरिष्ठ संशोधक म्हणून करण्यात आली. आपल्या या गौरवास्पद कारकीर्दीत त्यांनी अनेक वनस्पतींचा, तसेच पुढे भविष्यामध्ये वैद्यकियदृष्ट्या वरदान ठरलेल्या झाडांचा शोध व उत्खननशील वेध घेतला. कुठलीही ठोस पदवी हाताशी नसताना इंडियन म्युझियमने आघारकरांच्या कर्तुत्वावर दाखवलेला विश्वास त्यांनी निश्चीतच सार्थ ठरविला.

अतिशय कल्पकतेने केलेले संशोधन, निसर्गाचे सर्व कायदे काटेकोरपणे पाळून व विवीधांगी विचार करून विचारपुर्वक बनविलेले तपशीलवार अहवाल, व जगातील वैज्ञानिक मंडळींकडून दुर्लक्षित राहिलेल्या वनसंपत्तीला व पर्यायाने निसार्गाला न्याय देणारे विषय चोखंदळल्यामुळे त्यांच्या नावाभोवती वेगळेच वलय प्राप्त झाले. त्यांनी शोधून काढलेल्या विपुल प्राणी व वनस्पतींच्या प्रजातींची दुर्मिळता लक्षात घेवून सी. व्ही. रामन यांनी कोलकत्ता विद्यापीठातील घोष प्राध्यापक पदासाठी त्यांची शिफारीस केली. याच काळात अधिक संशोधनासाठी जर्मनीला गेले असताना पहिल महायुध्द पेटल्याने त्यांना तुरूंगात डांबण्यात आलं. पण या माणसाची चिकाटीच एवढी प्रचंड होती की त्यांनी कारावासातही संशोधन पुरं करून डॉक्टरेट ही सनद प्राप्त केली.

भारतीय विज्ञान व वैज्ञानिक यांच्यातील हितसंबंध जोपासण्यासाठी त्यांनी प्रसंगी शासनकर्त्यांबरोबरही दोन हात करायला मागे पुढे बघितले नाही. त्यांच्या प्रयत्नांमुळे सिबलपुरच्या वनस्पती संग्रहालयातले दुर्मीळ नमुने इंग्लंडमध्ये हलवण्याचा डाव हाणून पाडण्यात आला. त्याचबरोबर भारतात विज्ञानवादी अस्मितेचा प्रसार करण्यासाठी लागणार्‍या वैज्ञानिक संस्थांची मुळे घट्ट करण्यात देखील आघारकरांचा सिंहाचा वाटा होता.

त्यांचा मृत्यू २ सप्टेंबर १९६० रोजी झाला.

(माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष आणि इंटरनेटवरील विविध उपलब्ध साहित्य)

संकलन आणि लेखन : अनिकेत जोशी, अलिबाग

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*