रामकृष्णबुवा वझे तथा वझेबुवा

रामकृष्णबुवांना लहानपणापासून गायक होण्याचाच ध्यास होता. त्यांच्या आईनेही मुलाला गायकीचे शिक्षण देण्यासाठी काबाडकष्ट घेतले. त्यांचा जन्म २८ नोव्हेंबर १८७४ रोजी झाला. लहान वयातच बुवांचा संगीताकडील ओढा स्पष्ट झाल्यावर त्यांनी संस्थानातील राजगायकांकडे संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे दोन वर्षे गाणे शिकल्यावर ते मालवण येथे पुढील संगीत शिक्षणासाठी गेले. घर सोडल्यानंतर रामकृष्णबुवा आधी पुण्याला गेले. तेथून संगीत शिक्षणासाठी मुंबई, इंदूर, उज्जैन, वाराणसी असा त्यांचा प्रवास चालू राहिला. ग्वाल्हेर येथे उस्ताद निसार हुसेन खाँ यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांच्या कारकीर्दीला खरे वळण मिळाले.

वाराणसी येथे त्यांना स्वामी विवेकानंदांच्या सहवासात १५ दिवस राहण्याची संधी मिळाली. नेपाळमध्ये दरबारगायक म्हणून त्यांनी वर्षभर सेवा केली. गायक नट कै. केशवराव भोसले यांच्या आग्रहावरून बुवांनी ललितकलादर्श या कंपनीच्या नाटकांना चाली दिल्या.

स्वातंत्रवीर सावरकर लिखित रणदुंदुभी आणि सन्यस्त खड्ग ह्या संगीत नाटकातली पदे वझे बुवांनी स्वरबद्ध केली होती. वधुपरीक्षा, संन्यासाचा संसार, शहा शिवाजी, श्री, रणदुंदुभी, नेकजात मराठा, सोन्याचा कळस अशा अनेक नाटकांतील त्यांनी संगीत दिलेली पदे लोकांच्या विशेष पसंतीस उतरली. त्यांनी देशभर भ्रमंती करून अनेक मैफली गाजविल्या.

गोव्यात तसेच महाराष्ट्रात दीनानाथ मंगेशकर, केसरबाई केरकर, व्ही.ए. कागलकरबुवा, तानीबाई, केशवराव भोसले, भास्करराव जोशी, बापुराव पेंढारकर, भार्गवराम आचरेकर, हरिभाऊ घांग्रेकर, भालचंद पेंढारकर, गुरुराव देशपांडे, दिनकरपंत फाटक, गजाननबुवा जोशी, शिवरामबुवा वझे, लक्ष्मणराव वझे, मोहनबुवा कर्वे, विनायकराव पटवर्धन अशा पुढे नावारूपाला आलेल्या कलाकारांना रामकृष्णबुवांनी गायनाचे शिक्षण दिले. रामकृष्णबुवा वझे यांचे निधन ५ मे १९४५ रोजी झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*