राजे मालोजीराजे नाईक निंबाळकर

महाराष्ट्रातील फलटण संस्थानचे शेवटचे राजे मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचा जन्म ११ सप्टेंबर १८९६ रोजी झाला.

शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात ऐतिहासिक जहागिरदार घराण्यांत फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याचे स्थान महत्त्वाचे होते. या घराण्याची राजकीय सत्ता जवळजवळ सातशे वर्षे अबाधित होती. चौऱ्याऐंशी गावांचे हे संस्थान आकाराने लहान असले, तरी मानाने फार मोठे होते. मालोजीराजे उर्फ नानासाहेब यांचा जन्म गणेश चतुर्थीला त्यांच्या आजोळी निभोरे (ता. फलटण) गावी झाला. त्यांचे मूळ नाव नारायण होते. त्यांच्या वडिलांचे नाव रघुनाथराव नाईक निंबाळकर होते, तर आईचे नाव सीतादेवी.

मालोजीराजे यांचे प्राथमिक शिक्षण फलटण येथे मुधोजी हायस्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक आणि संस्कृततज्ज्ञ गोपाळ रघुनाथ भिडे यांच्याकडे सरकारी वाड्यातच झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण कोल्हापूरला कँडीसाहेबांच्या सरदार हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांना राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून प्रशासनाचे धडे मिळाले. मालोजीराजे यांचा विवाह माळेगावचे जहागिरदार राजे शंभुसिंह जाधवराव यांची तृतीय कन्या आबईसाहेब यांच्याशी १८ डिसेंबर १९१३ रोजी झाला. लग्नानंतर मालोजीराजेंच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले.

दुष्काळी प्रदेशात शेतीला पाणी मिळवून देणे ही अतिशय जटील समस्या असते. फलटण संस्थानातील या समस्येचे काही प्रमाणात निराकरण करण्यात मालोजीराजे यशस्वी ठरले. त्यांनी १९२५ पासून भाटगर धरणातील नीरा उजव्या कालव्याचे पाणी फलटण संस्थानातील अनेक गावांना मिळवून दिले. त्यामुळे संस्थानातील एक चतुर्थांश शेतजमीन बागायती बनली. फलटण संस्थानात ऊस या नगदी पिकाचे उत्पादन होऊ लागले आणि ऊस शेतीचे क्षेत्र वाढले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला सातारा येथील आपला बंगला, साडेदहा एकर जमीन आणि पाच हजार रुपयांची देणगी देऊन त्यांच्या शिक्षण प्रसाराच्या कार्याला मदत केली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना फलटण संस्थानामार्फत तहयात सहाशे रुपयांचे वर्षासन सुरू केले होते. १९४१ मध्ये बनारस विश्वविद्यालयाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या फलटण भेटीच्या वेळी त्यांच्या बनारस विश्वविद्यालयाच्या विकासकार्यासाठी दहा हजार रुपयांची देणगी दिली.

१९३१ ते १९३९ या कालावधीत मालोजीराजेंनी सातारा गट संस्थानिकांचा प्रतिनिधी या नात्याने नरेंद्र मंडळावर काम केले. १९३३ च्या मे महिन्यात भरलेल्या तिसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित राहण्याची संधी त्यांना मिळाली.

१९२८ मध्ये मालोजीराजेंनी आपल्या ३२ व्या जन्मदिनी जबाबदार राज्यपद्धती हे आपल्या कारभाराचे अंतिम ध्येय असल्याचे जाहीर केले. १९२९ च्या गणेश चतुर्थीला फलटण संस्थान कायदेमंडळाचे उद्घाटन करण्यात आले. त्याच वेळी माधव संभाजी अहिवळे या मागासवर्गीय गृहस्थाची कायदेमंडळात सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९४२ पर्यंत अनेक सवलती देऊन फलटण लोकसभा, लोकल बोर्ड, नगरपालिका या संस्थांमध्ये लोकनियुक्त सभासदांना प्रतिनिधित्व व अधिकार देण्यात आले.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्रातील आठ दक्षिणी संस्थानांचा गट बनवून संघराज्य स्थापन करण्यात मालोजीराजांनी पुढाकार घेतला होता; परंतु जनमत संघराज्य स्थापनेच्या विरोधी असल्यामुळे दक्षिणी संस्थानांच्या संघराज्याचा प्रयोग अयशस्वी झाला. ८ मार्च १९४८ ला कोल्हापूर संस्थान सोडून बाकी सर्व दक्षिणी संस्थाने मुंबई राज्यात विलीन करण्यात आली. फलटण संस्थान आपल्या खजिन्यातील पासष्ट लाख रुपये शिल्लक रकमेसह मुंबई राज्यात विलीन झाले.

मालोजीराजे यांनी फलटण येथे श्रीराम सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. पुढे १९६७ मध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी पक्षाच्या सभासदत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते राज्याच्या राजकारणातून बाजूला पडले. त्यांचा प्रभाव ओसरला. अखिल भारतीय काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर ते महाराष्ट्र प्रदेश संघटना काँग्रेसचे अध्यक्ष झाले. तसेच ते काहीकाळ जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते.

मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे १४ मे १९७८ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*