प्रमोद नवलकर

अभ्यासू राजकारणी, शिवसेनेचे धुरंधर नेते व ज्येष्ठ साहित्यिक नेते, माजी सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर यांचा जन्म २३ जानेवारी १९३५ रोजी मुंबई येथे झाला.

प्रमोद सच्चिदानंद नवलकर हे त्यांचे पूर्ण नाव. राजकीय पुढारी असले तरी प्रमोद नवलकरांची ओळख महाराष्ट्राला होती ती सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व म्हणून. रेकॉर्डब्रेक स्तंभलेखक , खुशखुशीत वक्ता, बातमी राहणारा सामाजिक कार्यकर्ता, मराठीतल्या स्टिंग ऑपरेशनचा जनक आणि मुंबईचा ज्ञानकोष अशी त्यांची चतुरस्त्र ओळख होती.

’भटक्याची भ्रमंती’ हे नवशक्तीच्या रविवारच्या आवृत्तीचं एक खास आकर्षण असे. प्रमोद नवलकर ५२ वर्ष सातत्यानं हा स्तंभ लिहित होते. या स्तंभातून त्यांनी वाचकांसमोर मुंबईतलं रात्रीचं आयुष्य उभं केलं. स्मगलिंग, वेश्या व्यवसाय, मटक्यांचे अड्डे, सर्व थरातील भ्रष्टाचार यावर त्यांनी जीव धोक्यात घालून लिहिलं.

प्रमोद नवलकर यांनी मिड-डे, महाराष्ट्र टाईम्स, मार्मिक, सामना, नवशक्तीसाठी ते लिखाण केले होते. प्रमोद नवलकर यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले होते.

शिवसेनेच्या स्थापनेपासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होते. शिवसेनेच्या उदयानंतर ते अनेक मुंबईकर मराठी माणसांप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंकडे ओढले गेले. तोपर्यंत ते शैलीदार लेखक आणि धडपडणारे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होतेच. सेनेच्या स्थापनेनंतरची मुंबई महापालिकेची पहिली निवडणूक त्यांनी लढवली. ६८ साली ते नगरसेवक झाले. दोन वर्षांत मानाच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष बनले.

प्रमोद नवलकर १९८० मध्ये विधानसभा सदस्यांद्वारा आणि १९८८, १९९४ व २००० असे सलग तीन वेळा मुंबई पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषदेवर तर १९७२ मध्ये मुंबईतील गिरगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे त्यांना १९९९-२००० चा विधानपरिषदेतील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही मिळाला होता.

प्रमोद नवलकर यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट, रमाधाम वृध्दाश्रमाचे विश्वस्त, फायर ब्रिगेड ऑफिसर्स असोसिएशन, बी.ई.एस.टी. ऑफिसर्स असोसिएशन, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय व महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डचे अध्यक्ष, तसेच, गिरगाव युवक सभेचे संस्थापक व मुंबई विद्यापीठ एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य म्हणून काम केले होते.

प्रमोद नवलकर यांचे निधन २० नोव्हेंबर २००७ रोजी झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*