जोशी, (पं.) यशवंतबुवा

Joshi, (Pandit) yashwantbuva

यशवंत जोशी हे भारतीय अभिजात संगीताच्या दुनियेत आद्य घराणे म्हणून ओळखल्या जाणार्‍या ग्वाल्हेर गायकीतील एक नामवंत कलावंत आहेत. ग्वाल्हेरबरोबरच आग्रा या घराण्याचीही त्यांना तालिम मिळालेली असल्यामुळे त्यांच्या भात्यात या दोन्ही घराण्यांच्या सांगितीक चीजांचा भरणा आहे. आग्रा घराण्याची तालीम त्यांनी जगन्नथबुवा पुरोहित यांच्याकडून घेतली.

यशवंत जोशी यांचा जन्म १९२७ साली झाला. त्यांचे बालपण पुण्यात गेले. लहानपणापासून संगीत व गायनाची प्रचंड आवड असल्याने संगीतविषयाशी निगडीत गोष्टींकडे त्यांचे मन सहज वेधले जात. त्याकाळी अनेक दिग्गज गायकांच्या कर्यक्रमांना हजेरी लावल्याने गायक बनण्याच्या त्यांच्या स्वप्नाला नियमीत सराव व आपल्या सुरांना वळण लावण्याची जोड मिळाली. अशा तर्‍हेने त्यांच्यामधील गायक घडत गेला. त्या काळी केवळ गायक होण्याला, आजच्यासारखी सामाजिक प्रतिष्ठा वगैरे अजिबात नव्हती, तर गायक अधिक नट असणार्‍या कलाकारांनाच प्रसिध्दीचे वलय चाखण्याची संधी मिळत असे. पण यशवंतबुवांची साधना व गायननिष्ठा या सर्व भौतिक सुखांच्या पलीकडची असल्याने, त्यांनी आपल्या शास्त्रीय गायनाने व सुरांवरील हुकुमतीने श्रोत्यांना तृप्त करण्याचा निर्णय घेतला, व त्यांच्या गायनप्रवासाची झोकात सुरूवात झाली. यशवंतबुवा मिराशी हे त्यांचे पहिले गुरू होते.

आयुष्यभर विद्यादानात रमलेल्या यशवंतबुवांना लौकिक अर्थाने प्रसिध्दीचे वलय फार उशीराने प्राप्त झाले. यशवंतबुवांची गायनशैली हीदेखील त्यांच्या व्यक्तित्वाप्रमाणेच वेगळी, उठावदार, व बहारदार आहे. इतर नवोदित गायक ज्याप्रमाणे आपल्या गायनशैलीत इतर घराण्यांच्या शैलींचा प्रभाव मिसळून नेहमी एका नव्या व तजेलदार गायनशैलीचा वेध घेण्यास उत्सुक असतात, त्याप्रमाणे यशवंतबुवा हे प्रत्येक शैलीचे वेगळेपण व स्वतंत्र असं अस्तित्व अबाधित ठेवणाचा सचोटीने प्रयत्न करतात. गायला सुरूवात करताच स्वरांवर घट्ट पकड बसविण्याची त्यांची क्षमता असो, किंवा बंदिशीतल्या सौंदर्यपूर्ण जागांना त्यांच्या खास शैलीत सादर करण्याचे त्यांचे कसब असो, या सर्व गोष्टी त्यांच्या सर्जनशील गायकीचा प्रत्यय देत असतात.

आपले गाणे सतत ताजेतवाने ठेवणार्‍या या हाडाच्या कलावंताला हृदयेश आर्ट्स या संस्थेकडून देण्यात येणारा पहिला “हृदयेश संगीत सेवा पुरस्कार” प्राप्त झाला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*