मास्टर दत्ताराम

मराठी अभिनेते व नाट्यदिग्दर्शक मास्टर दत्ताराम म्हणजेच दत्ताराम वळवईकर. त्यांचा जन्म १० जून १९१६ रोजी वळवई (गोवा) येथे झाला.

विष्णूपंत बोरकर त्या काळी वळवई येथे नाटके करीत. त्यांनी दत्तारामांना नट म्हणून व माणूस म्हणून घडवले. दत्तारामांचे ते मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक होते आणि दत्तारामबापूंनीही त्यांना अखेरपर्यंत पित्याचा मान दिला.

वयाच्या ९व्या वर्षी मास्टर दत्ताराम यांनी नाटकांच्या ओढीने घर सोडले, आणि ’कुंजविहारी’ नाटकात पेंद्याची विनोदी भूमिका करून रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. ते गोव्यामधील प्रभात संगीत मंडळी’मध्ये पोहोचले. तेव्हा तिथे जुन्या मराठी संगीत नाटकांचा जमाना चालू होता. पण म्हणावी तशी नाटके चालत नव्हती.

मास्टर गंगाराम व दत्ताराम हे दोन वळवई येथील अभिनेते रंगभूमी गाजवू लागले.जुन्या तालीममास्तरांचा पगडा दत्तारामांवर अधिक असला तरी, नव्या अभिनयशैली त्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला.

सखारामपंत बर्व्यांपासून ते पुरुषोत्तम दारव्हेकर आणि केशवराव दातेपासून ते चिंतामणराव कोल्हटकरांपर्यंतच्या दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनाखाली काम करून तेवढ्याच ताकदीचा अभिनय त्यांनी करून दाखवला. उमेदीच्या काळात गोव्यातील नाटकांत अभिनय करून वयाच्या २२ व्या वर्षी मास्टर दत्ताराम मुंबईत लालबागला वास्तव्यास आले. लालबागमधील गणेशगल्लीतील हरदास मथुरादास चाळ नं. ४२, खोली नं. २२ हा त्यांचा पत्ता. तेव्हा दत्तारामच ख‍ऱ्या अर्थाने’लालबागचा राजा’ होते. त्यांच्या अभिनयामुळे सर्व लालबाग त्यांच्या प्रेमात होते.

साहित्यसंघाच्या ’कौन्तेय’, ’दुसरा पेशवा’, ’भाऊबंदकी’ , ’वैजयंती’ , ’राजकुमार’ यांसारख्या नाटकांत नटवर्य नानासाहेब फाटक, दुर्गा खोटे, मामा पेंडसे यांसारख्या बुजुर्ग अभिनेत्यांबरोबर तोडीस तोड भूमिका करून दत्तारामांनी ‘नटवर्य’ हे बिरुद मिळवले. पुढे ‘ललितकलादर्श’ च्या’दुरितांचे तिमिर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘पडछाया’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.

रंगभूमी पवित्र आहे व तिचे पावित्र्य आपणाकडून राखले पाहिजे असे ते म्हणायचे. आणि म्हणूनच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकातील एक प्रमुख नट दारू पिऊन रंगमंचावर अभिनय करायला लागला, तेव्हा दत्तारामांनी नाटकाच्या निर्मात्याला सांगून त्या प्रमुख नटाला काढून दुसऱ्या नटाला त्याच्या जागी उभे केले, पण दत्तारामांना नाटकातून सोडले नाही. दत्तारामांसारख्या व्रतस्थ माणसांच्या शब्दांना तेव्हाच्या रंगभूमीवर मान होता.

दत्ताराम यांचे १२ जून १९८४ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*