जोशी, लीलाताई

वृत्तीने आणि मनानेही समाजसेवक म्हणून तसेच शिक्षिका आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या म्हणून लीला जोशी महाराष्ट्राला परिचित आहेत. अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा मराठी माध्यमातील शाळांमध्ये इंग्रजी हा विषय शिकणं ज्यांना अवघड वाटत असे, अशा विद्यार्थ्यांसाठी लीलाताई जोशी यांनी १९७४ मध्ये अभय कोचिंग क्लासेस सुरु केले. केवळ शालेय अभ्यासक्रम या अनुषंगाने न शिकवता विद्यार्थ्यांना जीवनात या भाषेचा उपयोग कसा होईल याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. त्याचबरोबर स्त्रीयांच्या प्रश्नांसाठी व हक्कांसाठीही त्या आजवर लढल्या. अनेक महिलांनी आपल्या प्रापंचिक समस्या व तक्रारी लीलाताईंना सांगितल्या. या सर्व समस्या समजून घेत आणि आलेल्या महिलांना धीर देत प्रसंगी त्यांच्या सासरकडच्या मंडळींचे समुपदेशन त्या करत. पती जर का व्यसनाच्या पूर्णत: आहारी गेला असेल किंवा अल्कोहोलिक असल्यास अॅनोनिमस सारख्या संस्थेतून त्या कायमच्या पाठीराख्या राहिल्या. अट्टल व्यसनाधिन माणसांना व्यसनाकडे पाठ फिरवायला भाग पाडले. त्यांच्या याच व्यक्तीत्वाचा परिणाम अनेक पुर्वाश्रमीच्या व्यसनींवर झाला व त्यांनी सुध्दा लीलाताईंच्या कार्यात सक्रीय सहभाग नोंदवला. स्त्रीमुक्ती या शब्दाचा ज्यावेळी उदयही झाला नव्हता त्यावेळपासून लीला जोशी यांनी तळागाळातील स्त्रीयांबरोबरच कमावणार्‍या नोकरदार महिलांना एकत्रित करुन अनेक उपक्रम सुरु केले. यामध्ये मनसुबा अकादमी या नावाची संस्था स्थापन करुन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या सबलीकरणासाठीसुध्दा त्या प्रयत्नशील होत्या. नोकरी करणार्‍या महिलांसाठी शनिवारी दुपारी मिळवती मंडळही त्यांनी सुरु केलं. आयुष्यातील तब्बल ५० वर्षे त्यांनी समाजकार्यासाठी स्वत:ला झोकून दिलं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*