भास्कर सोमण

स्वतंत्र भारताचे दुसरे नौदलप्रमुख. वयाच्या अठराव्या वर्षी सोमण यांची रॉयल इंडियन मरिनसाठी निवड झाली आणि त्यांना प्रशिक्षणासाठी ग्रेट ब्रिटनला पाठविण्यात आले. अडीच वर्षांच्या प्रशिक्षणानंतर ऑगस्ट १९३४ ला सब लेफ्टनंट म्हणून ते तत्कालीन भारतीय नौदलात प्रविष्ट झाले. १९३९-४० दरम्यान दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते फर्स्ट लेफ्टनंट होते.

दक्षिणेत रामेश्वरजवळील मंडपम येथे कार्यरत असलेल्या ‘हमला’ या भारतीय नौसेनेच्या प्रशिक्षण केंद्रावर त्यांची वरिष्ठ निदेशक व प्रशिक्षक म्हणून निवड झाली (१९४३). तिचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भूसेना व नौसेना यांच्या संयुक्त कारवाईचे प्रशिक्षण देणे. २६ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांची मुंबईतील ड्राफ्टिंग ऑफिसमध्ये ड्राफ्टिंग कमांडर या पदावर नियुक्ती झाली.

विशाखापटनम् येथील आय्. एन्. एस्. ‘सिरकर्स’ या नौदलाच्या प्रशिक्षण केंद्राची ११ डिसेंबर १९५१ रोजी त्यांनी अधिकारसूत्रे स्विकारली. तसेच ऑफिसर-इन-चार्ज ईस्ट कोस्ट ही भारताच्या पूर्व समुद्रतटाच्या प्रमुखाची जबाबदारीही त्यांनी स्विकारली.

भारतीय नौदलाच्या वेंडुतुथी (कोचीन) येथील सर्वांत मोठ्या प्रशिक्षण केंद्रावर सोमणांची कमोडोर-इन-चार्ज (कॉमचिन) या नौदलातील पहिली ‘फ्लॅग रँक’ असलेल्या पदावर नियुक्ती झाली (१९५४). त्यानंतर १९५६-५७ मध्ये त्यांची मुंबई बंदराचे कमोडोर-इन-चार्ज (कॉम्बे) या पदावर नियुक्ती झाली. या पदावर त्यांनी दीड वर्षे काम केले. त्यानंतर त्यांना रिअर या पदावर पदोन्नती मिळाली.

सोमण निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाले. त्यांना भारत सरकारने निवृत्तीनंतर भारतातील एका छोट्या राज्याचे राज्यपालपद व परदेशात भारताचे राजदूतपद या दोन उच्चपदाचे प्रस्ताव पाठविले; परंतु ती दोन्हीही पदे त्यांनी नाकारली आणि आपले उर्वरित आयुष्य सामाजिक कार्यात व्यतीत केले. सोमण यांचे निधन ८ फेब्रुवारी १९९५ रोजी झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*