Web
Analytics
पेंढारकर, भालजी – profiles

पेंढारकर, भालजी

पेंढारकर, भालजी

भालचंद्र गोपाल पेंढारकर म्हणजेच भालजी पेंढारकर यांचा जन्म ३ मे १८९८ रोजी कोल्हापुरात झाला. त्यांचे वडील कोल्हापुरातील नामांकित डॉक्‍टर होते. भालजींची लहानपणापासुनच अलिप्तपणे जीवनाचा विचार करण्याची वॄती होती. तळ्यात जाऊन पोहणे, मैदानी खेळात अग्रभागी असणे हेच सारे करण्यात बालपणी भालजी आघाडीवर असत अभ्यासापेक्षा भालजींचे लक्ष इतर विषयाकडेच जास्त होते. शिक्षणाला महत्त्व देणारा तो काळत असल्यामुळे सहावीला शिक्षण सोडल्याबद्दल बाबांना घर सोडावे लागले होते. घर सोडल्यावर बाबांनी काही काळ पुण्यातील केसरी वृत्तपत्रात नोकरीही केली. त्यानंतर ते कोल्हापूरला आले. काही काळ मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये नोकरीही केली. त्यानंतर ते नाटकाकडे वळले व जवळ जवळ सहा नाटके त्यांनी लिहिली तसंच नाटकात कामही केले. याच दरम्यान बाबांनी कोल्हापूर येथील महाराष्ट्र फिल्म कंपनीसाठी काम सुरू केले.एका चित्रपटासाठी त्यांनी लेखनही केले; पण दुर्दैवाने तो चित्रपट पडद्यावर आला नाही. तेथून ते बाहेर पडले. तोरणे आणि पै यांच्यासोबत त्यांनी “पृथ्वीवल्लभ’ चित्रपटाची योजना आखली. याचे पटकथालेखन आणि रंगभूषा व अभिनयही केला. हा चित्रपट लोकप्रिय झाला आणि बाबांना पटकथा लेखनाचे काम वाढले. पण बाबांना दिग्दर्शक व्हायचे होते. दादासाहेब तोरणे यांच्याबरोबर त्यांनी श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित ‘श्‍यामसुंदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट बंगाली आणि हिंदी भाषेत तयार केला गेला होता. पंचवीस आठवडे चालण्याचे भाग्य या चित्रपटाला मिळाले. यानंतर बाबांनी मागे वळून पाहिले नाही. महारथी कर्ण, कालियामर्दन, सावित्री, नेताजी पालकर, जयभवानी, पावनखिंड यांसारखे एकापेक्षा एक सरस चित्रपट बाबांनी दिले. १९४८ मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये भालजींचा को

्हापूरस्थित ‘जयप्रभा’ स्टुडिओ जाळला गेला. चित्रपटांची संपूर्ण आघाडी सांभाळणारे भालजी पेंढारकर यांची वाटचाल अगदी सहजसोपी अशी झाली नाही. नव्याने तयार केलेला ‘मीठभाकर’ , ‘मेरे लाल’ हे चित्रपट आगीत भक्षस्थानी पडले. दीडशे ते दोनशे कामगार बेकार झाले.पण भालजींनी पुन्हा लाखो रुपये खर्चून ‘जयप्रभा’ स परत उभे केले. जिद्दीतून ‘मीठभाकर’ व ‘मेरे लाल’ ची पुनर्निर्मिती केली व मीठभाकरने चांगला व्यवसाय देखील केला. भालजींनी कोल्हापुरात मराठी चित्रनिर्मितीस वेग मिळवून दिला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभक्तीच्या भावनेतून , स्वातंत्र्याचा संदेश भालजींनी आपल्या चित्रपटांतून दिला. बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, मोहित्यांची मंजुळा यांतून दुबळेपणा व लाचारीविरुद्ध शाद्बिक आसूड संवादातून ओढले. स्वातंत्र्य मिळाले असले तरी सुध्दा सुराज्य निर्माण करण्याच्या हेतूने त्याग, निष्ठा, औदार्य, संयमी वृत्तीची, खंबीरपणा आणि आत्मविश्र्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी चित्रपटांची निर्मिती केली. ‘शिवकाळ’ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. समृद्ध आशयासह कला व तंत्रिक या दोन्ही दृष्टीकोनातून उत्कृष्ट हे भालजींच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यांचे काही प्रमुख व उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “थोरातांची कमळा”, “तांबडी माती”, “साधी माणसं”, “मराठा तितुका मेळवावा”, “छत्रपती शिवाजी’, “मोहित्यांची मंजुळा”, “घरची राणी’, “स्वराज्याचा शिलेदार”, “कांचनगंगा” ,”महाराणी येसुबाई” ,”बाल शिवाजी”, “प्रीत तुझी माझी” आणि “शिलंगणाचे सोने’. भालजींच्या “तांबडी माती” व “साधी माणसं’ या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार म्हणजेच ‘ रजत्त कमळ ‘ ने सन्मानित करण्यात आले होते. तर याच चित्रपटांनी राज्य शासनाच्या नऊ वेग वेगळ्या विभागांमध्ये सर्वोत्कृष्टतेची मोहोर उमटवली.

भालजीं पेंढारकारांचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी संसथाच होती जणु. या माध्यमातून भालजींनी सुलोचनादीदी, चंद्रकांत, सूर्यकांत, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले. भालजी पेंढारकरांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानासाठी अनेक पुरस्कारांने त्यांना सन्मानीत करण्यात आलं यामध्ये ‘तांबडी माती’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद या विभागात राष्ट्रीय पारितोषिक, चित्रभूषणजीवन गौरव, ग.दि.मा. पुरस्कार, तसंच १९९१ साली भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा व सर्वोच्च अश्या दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो स्वीकारण्यासाठी त्यांना दिल्लीला जाता येणे शक्य नव्हते, म्हणून तत्कालीन माहिती व प्रसारणमंत्री अजित पांजा आणि मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी खास कोल्हापूरमध्ये येऊन जयप्रभा स्टुडिओमध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान केला होता.
मराठी सह हिंदी, गुजराती, बंगाली, तमिळ अश्या बहूभाषिक चित्रपटांची निर्मिती भालजींनी केली. तसंच कलेची साधना अगदी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम निभावली आणि “साधा माणूस” ही स्वत:ची ओळख नेहमी जपली; अश्या या गुणी कलाकार म्हणजे भालजी पेंढारकरांनी २६ नोव्हेंबर १९९४ रोजी जगाचा निरोप घेतला.
( लेखन व संशोधन -: सागर मालाडकर )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*