ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

टिटवाळा – कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले. येथे प्राचीन काळात कण्व ऋषींचा आश्रम होता आणि त्या काळी शकुंतलेने या गणपतीची पूजा केली असे म्हटले जाते. म्हणून ह्या गणपतीस विवाहविनायक असेही म्हणतात.
वसई  – उल्हास नदीच्या मुखाजवळ पोर्तुगीजांनी बांधलेला भव्य किल्ला येथे आहे. वसईचा किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनार्‍याशी बांधलेला आहे. चिमाजी अप्पांनी (थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू) हा किल्ला १७३९ साली पोर्तुगिजांकडून हस्तगत केला. या किल्ल्यात चिमाजी अप्पांचे भव्य स्मारक आहे. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला असल्यामुळे या किल्ल्याला नैसर्गिक सुंदरता लाभली आहे. काही ठिकाणी वसईचा उल्लेख ‘बसीन’ असा केला जातो.
वज्रेश्वरी – हे स्थळ तानसा नदीकाठी वसलेले असून येथे श्रीनित्यानंद महाराजांची समाधी आहे. त्रेता युगात वसिष्ठ ऋषींच्या त्रिचंडी यज्ञाच्या वेळी पार्वती वसिष्ठांच्या संरक्षणासाठी आली. तिने इंद्राचे वज्रास्त्र गिळले. म्हणून रामाच्या विनंतीवरून तिला वज्रेश्वरी हे नाव पडले. चिमाजी अप्पांनी बांधलेले येथील वज्रेश्वरी देवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. पोर्तुगिजांच्या विरोधात चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरीदेवीला नवस केला होता. वसईचा किल्ला जिंकल्यामुळे नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती पसरली आणि ती आजही कायम आहे. येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे अकलोली व गणेशपुरीतील गरम पाण्याचे झरे. या झर्‍यांतून औषधी गुणधर्म असलेले गरम पाणी वाहत असल्याचे मानले जाते.
अणजूर – जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात हे गाव असून येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला पारंपरिक महत्त्व आहे. १८ व्या शतकाच्या सुरूवातीला अणजूरच्या गंगोजी नाईक (राणे) या धार्मिक प्रवृत्तीच्या सरदारांनी अणजूर – मोरगाव – चिंचवड (श्री मोरया गोसावी समाधी मंदिर) असा पायी प्रवास केला. या खडतर प्रवासात मोरया गोसावींचे नातू श्री नारायणदेव यांनी आपल्याजवळील गणेशमूर्ती गंगोजी नाईक यांना दिली. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी गंगोजींनी या गणेशाची स्थापना अणजूर येथे आपल्या वाड्यात केली. हीच ती श्री सिद्धिविनायक मूर्ती होय. हे मंदिर आजही सुस्थितीत आहे.
माळशेज घाट – हा मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेतील घाट असून येथील परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. येथे गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो पक्षी ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध व विकसित झाले आहे. प्रामुख्याने पावसाळ्यात पर्यटक येथे गर्दी करतात.
डहाणू – डहाणूला स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. मत्स्यव्यवसायासाठी डहाणू प्रसिद्ध असून येथे लहान होड्या बनवण्याचा उद्योग चालतो. डहाणू तालुक्यातील बोर्डी येथे उदवाडा हे पारशी लोकांचे पवित्र स्थळ आहे. डहाणू आगर येथील केवडावंतीचे मंदिर व हनुमान मंदिर ही मंदिरे प्रसिद्ध आहेत. डहाणू परिसर हा आदिवासी वस्ती असलेला परिसर असल्यामुळे इथल्या परिसरात आदिवासी पारंपरिक सण आणि उत्सव तसेच जग प्रसिद्ध वारली चित्रकला पाहावयास मिळते.
कुंडेश्वर – बदलापूरपासून जवळच डोंगररांगांत, निसर्गरम्य परिसरात कुंडेश्वराचा धबधबा आहे. येथे प्राचीन गिरीजाशंकर मंदिरही आहे.
मलंगगड – हाजी मलंग ह्या नावाने हे स्थान ओळखले जाते. येथे हाजी मलंग ह्या मुस्लीम धर्मीय साधूची कबर (दर्गा) आहे.  येथील किल्ला शिलाहार राजाने बांधला. माघ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते. तसेच येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिरही आहे.
लोनाड – भिवंडीच्या पूर्वेला लोनाड येथे प्राचीन लेण्यांचा समूह आहे. येथे रामेवश्वराचे भव्य पुरातन मंदिर आहे.
विरार – येथे जीवदानी गडावर जीवदानी माता या देवीचे जागृत स्थान आहे. हे एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक स्थान आहे. डोंगरावर सुमारे १४०० पायर्‍या चढून जावे लागते. देवीच्या मूर्तीजवळ सुपारी लावून कौल मागण्याची प्राचीन परंपरा आहे.
अर्नाळा – वैतरणा नदीच्या मुखावर समुद्र किनार्‍यालगत हा किल्ला आहे. आजही याचे बहुतांश बांधकाम सुस्थितीत आहे. चारही बाजूने पाणी असणारा अर्नाळा हा जलदुर्ग गुजरातचा सुलतान महमुद बेगडा याने १५१६ मध्ये बांधला.
जव्हार – ‘ठाणे जिल्ह्यातील महाबळेश्वर’ अशी या थंड हवेच्या ठिकाणाची प्रसिद्धी आहे. तसेच येथील जयविलास राजवाडा प्रेक्षणीय आहे. येथेही पर्यटक मावळतीच्या सूर्याचा देखावा पाहण्यास गर्दी करतात. येथील हनुमान व सनसेट पाँईटस् तसेच भूपतगड आवर्जून पाहाण्याजोगी ठिकाणे आहेत.

Where’s a xerox machine when you need buy descriptive essays one

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*