नागपूर जवळचा रामटेक किल्ला

विदर्भातील नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. या नागपूरच्या ईशान्येला रामटेक तालुका आहे. पेंचच्या अभयारण्यामुळे हा परिसर बराच प्रसिद्धीला आलेला आहे. रामटेक गावामध्ये रामटेकचा गिरीदुर्ग उभा ठाकलेला असला तरी या किल्ल्याची ओळख किल्ला म्हणून कमी आणि धार्मिक स्थळ म्हण्नू जास्त आहे. धार्मिक श्रद्धेमुळे अनेक भाविकांचा किल्ल्याकडे ओढा असतो.

भारताच्या इतिहासामधे गुप्त काळाचा उल्लेख सुवर्णयुग म्हण्नू केला जातो. या गुप्त राजवटींच्या समकालीन असलेल्या वाकाटक राजवटीची सत्ता विदर्भामधे नांदत होती. इ.स.२७० ते ५०० पर्यंत वाकाटकांची सत्ता या भागात होती. नंदीवर्धन, प्रवरपूर, वत्सगुडम ही राजधानीची ठिकाणे त्याकाळी प्रसिद्ध होती. यातील नगरधन ही राजधानी आद्य राजधानी म्हणून मान्यता पावलेली होती.

पुरातत्वीय आधारे इ.स.पूर्व ३ शतकापासून विदर्भात बौध्द धर्माचा प्रसार व प्रचार वाढला हा काळात लेण्या, स्तुप तसेच विहारांची निर्मिती झाली. त्यानंतर बौद्ध धर्माची पिछेहाट सुरु झाली. त्याच दरम्यान वैदिक धर्माची उपासना सुरु झाली. ही कालखंड होता. वाकाटक राजवटीचा.

मौर्य, शुंग, सातवाहन, क्षत्रप, मुंड या राजसत्तांनंतर विदर्भावर वाकाटकांचे प्रभुत्व आले. त्यांनी येथे राज्य स्थापन केले. वंध्यशक्ती हा वाकाटकांचा संस्थापक होता. हे घराणे वैदिक धर्माभिमानी असून सहिष्णू वृत्तीचे होते. याच राजवंशामधील रुद्रसेन (व्दितीय) याची पट्टाराणी प्रभावती होती. ही प्रभावती चंद्रगुप्त (व्दितीय) याची कन्या होती.

प्रभावती वैष्णव भक्त होती. तिने व तिच्या मुलांनी तसेच नातवंडांनी रामगिरीवर नरसिंह, त्रिविक्कम तसेच गुप्तरामाची मंदिरे उभारली. याची साक्ष नरसिंह मंदिरातील ब्राम्ही शिलालेखातून मिळते.

रामगिरी हे प्राचिन काळापासून धर्मस्थान होते. बौद्ध धर्मगुरु नागार्जुन हे येथे काळ वास्तव्य करुन होते असे काही विद्वानांचे मत आहे. प्रभु रामचंद्रही येथे काही काळ राहीले. अगस्ती ऋषीच्या आश्रमात प्रभु रामचंद्रांनी राक्षसांना मारण्याचा संकल्प घेतला म्हणजे टेक घेतला म्हणून या परिसराला रामटेक असे नाव मिळाले. असा धार्मिक समज जनमानसांमधे रुढ आहे.

महाकवी कालीदास यानी मेघदूत हे अजरामर काव्य याच ठिकाणी रचले. राम लक्ष्मणांची मंदिरे यादव काळात उभारली गेली. चक्रधर स्वामीनी याच ठिकाणी धर्मउपदेश केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी याच गडावर ध्यान धारणा केली.

अशी रामटेकची महती फार मोठी आहे. नागपूर जबलपूर मार्गावर मनसर हे गाव आहे. येथून रामटेकला जाण्यासाठी फाटा आहे. येथून पाचसहा किमीवर रामटेक आहे. भंडार्‍याकडुनही रामटेकला येता येते. गाडीमार्गाने उत्तमपैकी जोडलेले असल्यामुळे रामटेकला एस.टी.बसेसने पोहोचणे सोयेचे आहे.

रामटेक गावातून पायर्‍यांच्या मार्गाने गडावर जाता येते. दुसरा मार्ग गाडी रस्त्याचा आहे. या मार्गाने अंबाळा तलावाकडून गडापर्यत जाणारा गाडीमार्ग आहे.

रामटेक किल्ल्याच्या पठारावर कालीदासाचे उत्तम स्मारक केलेले आहे. ते पहाण्यासारखे आहे. अनेक प्रसंगाची चित्रे येथे चितारलेली आहेत.

रामटेक किल्ल्याचे दरवाजे उत्तम असून ते पहाण्या योग्य आहेत. आतमधे एका मंडपात वराहाची मुर्ती आहे. तटबंदीने परिवेष्टीत असलेल्या रामटेक किल्ल्याला बालेकिल्ला असून त्याच्या तटबंदीवर फिरता येते. आतील मंदिरेही पहाण्याजोगी आहेत.

रामटेक किल्ला, कालीदास स्मारक, अंबाळा तलाव परिसर आणि नगरधन चा किल्ला पहाण्यासाठी दिवसभराचा अवधी हाताशी आवश्यक आहे.

‘महान्यूज’च्या सौजन्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*